प्रसव | मराठी भयकथा | Prasav | Marathi Horror Story | Yogesh Borse

 

  प्रसव :- मराठी भयकथा

                  प्रसव :- आगामी  मराठी भयकथा –

Sample : – 

 

लेखक :- श्री . योगेश वसंत बोरसे

   रात्र मग ती कुठली ही असो ,बऱ्याचदा थरकाप उडवते . अशीच एक रात्र . म्हटलं तर चांगली .म्हटलं तर वाईट !

 चांगली यासाठी कि पौर्णिमा होती . आणि वाईट यासाठी कि पौर्णिमा असूनही चंद्र दिसत नव्हता .

 कारण आकाश पूर्ण  काळ्या ढगानी व्यापलं होत. पाऊसाचे दिवस नव्हतेच .पण त्याने जर यायचं ठरवलं तर त्याला कोण रोखणार ?

कोण बांध घालणार ?

त्यात हवामान खात्याने वादळाचे संकेत दिले होते . अर्थात त्यावर कोण विश्वास ठेवणार ?

 पण वातावरण तयार झालं होत आणि काही क्षणात सोसाट्याचा वारा सुटला . आणि मुसळधार पावसाला सुरवात झाली . 

      वारा इतका होता की  घराची छप्पर उडतील कि काय असं वाटत होतं . पण ज्यांच्या झोपड्या असतात त्यांनी काय करायचं ?

अशाच एका झोपडीत एक बाई अडली होती . अडली होती म्हणजे गरोदर होती आणि दिवस भरलेले होते . प्रसूती कधी ही  होईल अशी चिन्हे होती .

 ती आनंदात होती पण अचानक या बदलेल्या वातावरणाने भयभीत झाली होती . पोटात कळा उठत होत्या . आणि जीव कासावीस होत होता . तशी सुईण जवळ होती . कारण दूर दूर पर्यंत दवाखाने नव्हते . व अजून दहा वीस वर्षात होतील अशी शक्यता ही  नव्हती . 

     झोपडी वाऱ्याने गदागदा हलायला लागली . तशी ही घाबरली .

नांव काय होत तीचं ?

कांता !

एकटीच राहत होती त्या झोपडीत . बाळाचा बाप कोण होता हे तिलाच माहित ! पण तिला कोणी विचारणार ही नव्हतं . आणि तो आपला विषय ही  नाही .

 नारळाच्या झावळ्या आणि काड्या कामट्या वापरून वरून ताडपत्री टाकली होती . पावसासाठी . अर्थात ताडपत्री आता उडून गेली होती . आणि परिस्थिती अशी होती कि झोपडी ही  जायची . सुईणीला विचार पडला झोपडी  सांभाळावी कि हिला सांभाळावं ? 

       कांता च्या कळा प्रचंड भीतीने वाढत गेल्या . आणि इकडे झोपडीचं  होत नव्हतं ते छप्पर उडालं . मुसळधार पाऊस आणि वारा याने होत नव्हतं ते अस्ताव्यस्त करून टाकलं .

 कांता आणि सुईण पूर्ण भिजल्या . खाट हि गोधड्यांसकट ओली झाली ! पण कळा थांबत नव्हत्या . आणि प्रसूती होत नव्हती . 

“कांते आता काय करायचं ग ? या अवस्थेत कुठे घेऊन जाऊ तुला !” 

“मावशे मी जगल असं वाटत नाही . पण जर मला पोर बाळ झालं आन ते वाचलं  तर तू सांभाळ त्याला ! सांभाळशील ना ?” 

“आई ग ! …..”

“आ आ आ SSSSS “

 एक किंकाळी उठली लागोपाठ एक टाहो फुटला !

एका नवीन जिवाने जन्म घेतला आणि एक जीव वाऱ्यासारखाच आसमंतात विलीन झाला …..

 कांता ,….

…. आता या जगात नव्हती !

पण तीचं  पोरगं  जगलं होतं . मावशीने पोराला जवळ घेतलं . आणि पाऊस थांबायची वाट पाहत बसली . पावसाने वादळाने बहुतेक त्याचं  काम केलं होत . तो कांता सारखे किती निष्पाप जीव घेऊन गेला होता कुणास ठाऊक ?

 की कांताला तिच्या पापांपासून मुक्ती देण्या करता हा सगळा व्याप होता ?

 तीचं पाप अक्षरशः  धूऊन  निघालं होत . ती गेली होती पण तो निष्पाप जीव मागे राहिला होता .  

  थोड्या वेळाने पाऊस थांबला . मावशी कांता ला  आवाज देऊ लागली . पण ती निचेष्ट पडून होती . मावशीला समजलं ,कांता ने आपला शब्द खरा केला . ती पोराला तिच्या हवाली करून गेली होती .

 ‘ याचं आता काय करायचं ? इथे आपलाच ठिकाण नाही ,तिथे पोराला कसं सांभाळणार ? नाही याची जबाबदारी आपण घेऊ शकत नाही ! काय करावं ? ‘

To Be Continued …. 

ALL RIGHTS RESERVED AT YOGESH BORSE & BGSM PRODUCTION , BHUTATMA PUBLICATION 

BHUTATMA PUBLICATION

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top