येडा – मराठी भयकथा –
आगामी मराठी भयकथा

लेखक :- योगेश वसंत बोरसे .
Sample :-
तो हातवारे करत असंबद्ध बडबड करत पुढे जात होता . आणि गावातील लहान लहान आगाऊ मुलं त्याच्या मागे पळत त्याला चिडवत होती . ज्याचा त्याला राग येत होता . मग तो उसळून मागे फिरायचा . आणि त्यांच्या आय बहिणीचा उद्धार करायचा . तशी मुलं अजून चेकाळायची .
तसा तो एखादा दगड भिरकावायचा . त्याची समज किती होती देव जाणे ! पण त्याचा दगड कधी कुणाला लागला नाही .
पण … त्या दिवशी ….
भर उन्हाळा …
तापमान ४२ ते ४४ अंश !
कदाचित त्यापेक्षा जास्तच !
अंगाची लाही लाही होत होती ! तोंड कोरडं पडत होतं . पम्या अर्थात प्रमोद आपल्या घरी जात होता . सावली पाहून मधेच थांबत होता . आजू बाजूला उत्सुकतेने बघत … वय ते काय ६ ते ७ वर्षांचं …. त्यात या येड्याला बघितलं की त्याला भीती वाटायची …. हा असा का वागतो मुलं याच्या मागे का लागतात ?
त्याने शिव्या दिल्यावर का हसतात …. त्याची टिंगल टवाळी का करतात … काही काही समजत नव्हतं … त्या येड्याला बघितलं की पम्या पळून जायचा …
आज सकाळी ….त्याने बापाला सांगितलं होतं ….
” दादा ..चप्पल घ्यायचीय …”
” पम्या ,जाऊ संध्याकाळी … “
” आओ काय संध्याकाळी …? “
आतून पम्याची आई डाफरली …
” ऊन बघितलं केवढंय … पोराचे पाय भाजतात ना … त्याला घेऊन जा .. चप्पल घेऊन द्या मग जा तुमच्या कामाला … जाय रे पम्या …. “
बापाचं काही चालत नव्हतं घरात ! त्याने मोटर सायकल काढली पम्या मागे बसला … आनंदाने आणि फटफट करत मोटर सायकल निघाली . … तालुक्याचं गांव चार पाच किलोमीटर होतं आणि आज बुधवार चा बाजार होता .
भरपूर दुकानं लागली होती … कपड्यांची … चपलांची … भाजीपाल्याची … खाद्य पदार्थांची … मसाल्यांची … मिरच्यांची .. एक ना अनेक ….
खाऊ ची दुकानं बघून पम्याच्या तोंडाला पाणी सुटलं … गोड शेव चा लाल बुंद रंग बघून पम्याच्या तोंडाला पाणी सुटलं …
” दादा शेव घ्यायची ..”
” बरं … “
” आणि पापडी पण .. “
” पम्या … अगोदर चप्पल घेऊ … मग शेव पापडी घेऊन जाऊ तू घरी जा ,मी कामाला जातो … “
” नाई दादा .. पहिले शेव खायची … “
” पम्या ,तुझी माय ऐकत नाई … तू तर ऐकत जा … “
पम्या काही बोलला नाही …. त्याला कधी हट्ट करणं माहित नव्हतं . पण आज … तो शांत बसला . त्याचा शांतपणा दादांना सहन झाला नाही . पोरगं कधी काही लवकर मागत नाही आज म्हणतय तर …. त्यांनी गाडी जागा पाहून उभी केली .
” थांब इथं … मी आलो गोडाची शेव घेऊन … “
” आणि पापडी पण …”
” हो रे बाबा … पापडी पण आणतो बस …. ?”
थोड्याच वेळात दादा शेव पापडी घेऊन आले .
” घे … ” बांधलेल्या पुड्या बघून पम्या नाराज झाला .
” अरे पम्या उशीर झाला तर मुकादम कामावर घेणार नाई . घरी जाऊन तूआणि सुमी खा … “
सुमी त्याची बहीण ,पम्याहुन दोन वर्षाने मोठी ….
” दादा एक दोन काड्या खाऊ … ?”
त्याचा केविलवाणा चेहेरा बघून दादांना राहवलं नाही . त्यांनी गोड शेव ची पुडी उघडली . त्याच्या हातात दिली . गाडीवर बसून गाडीला किक मारली . तोवर पम्याने दोन तीन शेवच्या काड्या हातात घेतल्या होत्या .
” जायचं … ? “
” हो दादा … “
थोडं पुढं एक ओळखीचा चप्पल वाला होता .
” राम राम दादा … “
” राम राम मालक काय म्हणता ..?”
” काही नाही ,पोराला चप्पल घ्यायची होती … “
” मालक घ्या की ! दुकान तुमचंच आहे ! कालच नवीन माल आलाय . मस्त नवीन शो च्या चप्पल आहेत . हा छोटा वाटतं … “
” हो ! पोरगी यांच्याहून मोठी आहे .. “
” बरं बरं ..”
ऋणानुबंधाच्या गोष्टी झाल्यावर दुकानदाराने पम्याच्या मापाच्या दोन तीन चपलांचे जोड दाखवले .
” दादा ही भारी आहे … “
” ही आवडली ….. ?”
” हो .”
थोडा कमी जास्त भाव करून दादांनी पटकन चप्पल घेतली आणि निघाले .
” पम्या बस ..”
पम्या खुशीत होता . नवीन चप्पल ,खायला खाऊ … लहान मुलांना आणखी काय हवं …?
तो बापाला घट्ट बिलगून बसला . त्याच्या स्पर्शातील आनंद बापाच्या काळजाला भिडला . दादाला धन्य वाटलं ….
मुलाच्या सुखात ,कुटुंबाच्या सुखात सुख मानणारा दादा भविष्यातील आपत्तीपासून अनभिज्ञ होता .
ऊन वाढत चाललं होतं .चटके बसायला लागले होते . थोड्याच वेळात गाडी गावात पोहोचली . आणि दादा थांबले .
” पम्या … उतर … उशीर झालाय … मुकादम बोंबलत असल तिकडे … “
पम्या पटकन उतरला आणि दादांची गाडी भुर्रकन निघून गेली . पम्या आपल्या बापाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे प्रेमाने बघत राहिला . दादा दिसेनासे झाल्यावर तो घराकडे निघाला …
उड्या मारत … ऊन मी म्हणत होतं …. उन्हाचे चटके बसत होते . पम्याला कधी घरी जाऊन शेव पापडी खातो असं झालं होतं .
पण समोरून ते येडं वादळ घोंगावत आलं आणि पोरांचा गलका ही ऐकू आला . त्याला पाहून पम्या घाबरलाआणि घरी जायचं विसरून स्वतःचा बचाव करण्यासाठी आडोसा शोधू लागला . जवळ एक जनावरांना पाणी पिण्यासाठी मोठा हौद होता . . पम्या तिकडे पळाला आणि हौदाच्या मागे लपला .
पण आज येडा ही वेगळ्याच धुंदीत होता . तो सरळ पुढे निघून गेला . तसा धोका टळला असं समजून पम्या हौदाच्या मागून बाहेर निघाला . त्याची नवीन चप्पल चिखलाने भरली होती . ती धुण्यासाठी त्याने हौदात पाय घातला .
तसा पाण्याचा थंडगार स्पर्श झाला . पम्या सुखावला त्याला मोह आवरला नाही त्याने एक पाय बाहेर काढून परत दुसरा पाय हौदात बुडवला . आणि तिथेच रेंगाळला … पुन्हा मुलांचा गलका ऐकू आला आणि पाठोपाठ येड्याने उच्चारलेल्या शिव्या ऐकू आल्या ….
तसा पम्या घाबरला आणि जीव खाऊन घराच्या दिशेने पळाला . पोरांचा गलका त्याच्या मागे येऊ लागला आणि येड्याचा आवाज ही जवळून यायला लागला . पम्या अजून जोरात पाळायला लागला … आणि तेवढ्यात ….
काही तरी येऊन त्याच्या डोक्यावर आदळलं … तसं डोकं गरगरलं आणि पम्या खाली कोसळला !
येड्याने फेकलेला दगड आज पम्याचा घात करून गेला ….
इतका वेळ त्या येड्याची मजा घेणारी टवाळ पोरं चपापली !
अचानक वातावरण गंभीर झालं . आजू बाजूला असलेल्या पैकी काही जण पम्या कडे पळाली .. …. कुणीतरी पाणी आणून पम्याच्या तोंडावर मारलं . रक्ताच्या धारा वाहत होत्या .
डोक्यातून कानातून रक्त येत होतं …. रक्त थांबेना ,तसं त्याला कुणी उचललं … शेव पापडी रस्त्यावर विखुरली होती . ते येडं लांब उभं राहून बघत होतं . त्याच्या हातात अजून ही दगड होता … त्याला पाहून एकाचं डोकं फिरलं ..
” मादरचोद … पोराचं डोकं फोडलं …”
त्याने ही एक दगड उचलला आणि येड्याला मारून फेकला .तसं येडं अजून खवळलं आणि हातातील दगड याच्या दिशेने भिरकावला .
” अरे काय करताय ..? त्या पोराला अगोदर दवाखान्यात न्या ! रक्त थांबत नाहीए ! पोरगं जाईल हातातून .. “
ज्याने उचललं तो पटकन एका रिक्षात बसला आणि रिक्षा दवाखान्याच्या दिशेने गेली . इकडे जमाव वाढत गेला आणि हातात दगड येवो कि विट ,की विटेचा तुकडा … हातात येईल ते येड्याला मारू लागले !
एकाने सरळ दुकानातून सोड्याची बाटली आणली आणि येड्याकडे भिरकावली . दुसऱ्याने त्याचंच अनुकरण केलं . बाटल्यांमागून बाटल्या फुटल्या आणि येडा खाली कोलमडला ,तशी काही जवान पोरं त्याच्या दिशेने पळाली आणि त्याला लाथा बुक्क्यांनी तुडवलं …
किती तरी वेळ हा तमाशा सुरु होता .. येडं ओरडत राहिलं ,किंचाळत राहिलं ,शिव्या देत राहिलं … मार खात राहिलं …. आणि त्याची बडबड अचानक बंद झाली . हळूहळू हालचाल थंडावली . तसा मारणाऱ्यांचा जोर कमी झाला .
” ए बस करा … च्यायचं … मरायचं नाहीतर ….. “
मारणारी पोरं अलगद जमावात सामील झाली आणि नंतर इतरत्र पांगली . जमाव ही हळू हळू यड्याची हालत बघून पसार झाला .
दुपारच्या भयाण उन्हात … येडं … रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं होतं . … कुणीतरी पोलिसांना सांगितलं असावं ….
व्हाय व्हाय करत पोलीस व्हॅन घटनास्थळी दाखल झाली . आजूबाजूला सर्वत्र सामसूम झाली होती . लोकांनी चौकशीच्या भीतीने दुकानं बंद केली होती …. रस्त्यावर कुणीही नव्हतं …. पोलिसांनी विचार विनिमय केला .
येडं निपचित पडलं होतं . रक्त बहुतेक थांबलं होतं किंवा शरीरातील सगळं रक्त वाहून गेलं होत. उन्हामध्ये सुकलं होतं , सूकत होतं !…
एकाने हात लावून बघितलं ,” सायेब थोडी धुगधुग आहे अजून ,दवाखान्यात न्यायचं का ?”
‘ उचला लवकर ,टाका गाडीत … ” दोन चार शिपाई पुढे आले आणि उचलून व्हॅन मध्ये टाकला . आणि व्हॅन निघून गेली .
इकडे पम्याने जीव सोडला आणि तिकडे येड्याने !
….. दोघांचं काय नातं होतं काय माहित ?
पण दोघांनी न केलेल्या चुकीची शिक्षा भोगली होती .
हो ! न केलेल्या चुकीची शिक्षा !
येड्याने काही पम्याला ठरवून दगड मारला नव्हता . तो या रोजच्या त्रासाला कंटाळला होता . त्यात ऊन मरणाचं ! डोकं तापवत होतं !
त्याचं ही डोकं तापलं आणि लोकांचं ही ! वाढलेलं तापमान त्याला मारूनच गेलं आणि पम्याला ही …
बघता बघता बातमी गांवात पसरली आणि आणि पम्याच्या आईने हंबरडा फोडला !
पम्याच्या बापाला कुणी तरी बातमी दिली तो हतबद्ध झाला . त्याच्या पायातील त्राण नाहीसं झालं . दादा तिथंच बसून राहिला …. कसं तरी समजावून दादाला दोघं तिघांनी घरी आणलं .
समोर बायको बेभान झाली होती … आपल्या पोराची काही चूक नसताना पोराचा बळी गेलेला त्या माउलीला सहन झालं नाही ती शिव्यांची लाखोली वाहत होती …..
चटका देणारं ऊन बघता बघता कमी झालं आणि संध्याकाळचा उष्मा जाणवायला लागला . आधीच गरमीने हैराण झालेले गांवकरी या अनाहूत प्रसंगाने गांगरले होते .
संध्याकाळी पोलीस व्हॅन आली आणि गावकऱ्यांना धडकी भरली ……
To Be Continued …..



![]()
ALL RIGHTS RESERVED AT YOGESH BORSE & BGSM PODUCTION ,BHUTATMA PUBLICATION



