present
Rakh – Ash Of Body
राख – भस्म शरीराचे | मराठी भयकथा
लेखक :-
श्री .योगेश वसंत बोरसे यांची आगामी कादंबरी { दीर्घ भयकथा }
{ पहिला भाग प्रकाशित – ३ oct २०२५ यात १४:०७ }

राख – भस्म शरीराचे |

मराठी भयकथा :- लेखक – श्री . योगेश वसंत बोरसे .
{ १ }
रात्री कवटी फुटली . स्मशान भूमीत आलेली मंडळी काही क्षणात निघून गेली . गेलेली व्यक्ती कशी होती याचं प्रत्येक जण वर्णन करत होता . कुणी चांगलं ,कुणी वाईट . रात्र बरीच झाली होती त्यामुळे कुणी मागे थांबणं शक्य नव्हतं .
तरी सुद्धामागे काही होतं . जे जाणिवांच्या पलीकडचं होतं . आणि ते म्हणजे त्या शरीरातील आत्मा !
त्याची काही इच्छा अपूर्ण राहिली असावी . मोक्ष मिळाला नाही . तो आपल्या जळत्या शरीराकडे बघत राहिला . आपल्या शरीराची होणारी राख रांगोळी हतबल पणे बघण्यापलीकडे तो आत्मा काही करू शकला नाही .
‘ आता ही राख उद्या पाण्याला लावतील . आणि आपलं अस्तित्व संपून जाईल ! मग आपण असेच भटकत राहू ! काय करावं ? कुणाची मदत घ्यावी ? ‘
बराच वेळ गेला . मध्यरात्र झाली .
आणि …. एका व्यक्तीने स्मशानात प्रवेश केला . त्या गरम राखेत हात घातला . कवटीचा काही भाग हातात आला . ती कवटी घेऊन बराच वेळ तो काहीतरी बडबडत राहिला .
” थांब , पुढे काही बोलू नकोस ! ” प्रचंड आवाज दुमदुमला . तसा कधी ही न घाबरणारा तो मांत्रिक भीतीने थरथर करायला लागला .
” कोण ?”
” अरे कोण काय विचारतोस ? ज्याची कवटी हातात घेतलीय तोच मी ! ”
मांत्रिक प्रचंड घाबरला . त्याला हा अनुभव नवीन होता .
” माझं एक काम कर ! “
पुन्हा आवाज आला . नाही म्हणायचं प्रश्नच नव्हता .
” काय करायचं ?”
” मला पुन्हा जिवंत कर ! “
” ते शक्य नाही ! “
” शक्य नाही म्हणूनच सांगतोय कर ! नाही तर इथून मांत्रिक म्हणून परत जाणार नाहीस ! सहस्त्रबुद्धे म्हणून परत जाशील ! “
” कोण सहस्त्रबुद्धे ? “
” तोच ज्याची कवटी घेऊन तू फिरतो आहेस ! ”
मांत्रिकाच्या हातातून कवटी खाली पडली .
” मूर्खा पुन्हा असली चूक करू नकोस . उचल ! लवकर उचल ! “
मांत्रिक यांत्रिक पणे वाकला आणि कवटी पुन्हा हातात घेतली .
” सर्व अस्थी एकत्र कर . “
” पण तुम्ही म्हणता ते मला शक्य नाही ! मी पोटभरू मांत्रिक आहे . कवटी आणि एखादं हाड पाहूनच लोक मला पैसे देतात . त्यावर मी पोट भरतो . “
” मग आता मंत्र काय पुटपुटत होतास ? ” मांत्रिक काही बोलला नाही .
” अरे बोल ! “
” तो मंत्र नव्हता . ” मांत्रिक हळूच म्हणाला .
” मग ?”
” भीती वाटत होती म्हणून देवाचं नांव घेत होतो …. “
काही क्षण शांतता पसरली . आणि नंतर प्रचंड हास्याचा गडगडाट झाला . मांत्रिकाची भीतीने गाळण उडाली .हळू हळू हास्याचा आवाज कमी झाला . आणि त्याजागी एक अद्भुत ध्वनी निनादला ,
” बरं .. बरं … म्हणजे तुला अगोदर ज्ञानवंत करावं लागेल ,मग तू काम करशील . त्यासाठी एकच पर्याय आहे मी तुझ्या शरीरात प्रदेश करतो आणि माझं कार्य पूर्ण करतो . “
” नाही ! मी हे होऊ देणार नाही ! ” मांत्रिक ठाम पणे म्हणाला .
” एकदा तू या शरीराचा ताबा घेतलास की पुन्हा सोडणार नाहीस ! मी तुला बाहेर ही काढू शकणार नाही !”
” तुझ्या घाणेरड्या शरीरात जास्त काळ राहायची माझी इच्छा नाही ! मी असं करतो ,तुझ्या शरीरात प्रवेश करून माझ्या शरीराला नवीन आकार देतो . नवीन रंगरूप देतो . आणि मग त्यात प्रवेश करतो . “
” आणि तसं नाही झालं तर ? “
” का होणार नाही ? हा सहस्त्रबुद्धे कोण होता हे तुला माहित नाही ! म्हणून तू असं बोलतोयस . आणि तुला सांगण्यात मला वेळ घालवायचा नाही . तू जर माझी मदत केलीस तर एवढा पैसे देईन की तुला पुन्हा मांत्रिक बनून पोट भरावं लागणार नाही . बोल तयार आहेस ?”
मांत्रिकाचा नाईलाज झाला .नाही म्हणण्यात अर्थ नव्हता . विद्या अपूर्ण होती आणि पैसा ? तो कधी पुरेसा नव्हताच ! नेहमी दुष्काळ !
‘ याने जर याचा शब्द पाळला तर आयुष्याची चणचण थांबून जाईल . पण याने फसवलं तर ? ‘
उत्तर त्याच्याकडे नव्हतंच . निदान आता तरी नव्हतं .
काही तरी घडलं ! जे समजण्या पलीकडचं होतं . मांत्रिकाला झटका बसला तसा तो खाली कोसळला . बराच वेळ गेला आणि ते मांत्रिकाचे शरीर झोपेतून उठल्या सारखं उठून बसलं .
तो मांत्रिक आता मांत्रिक राहिला नव्हता !
त्याची नजर हालचाल सर्व काही बदललं होतं .
लक्ष्मण सहस्रबुद्धे !
आपल्या शरीराची झालेली राख रांगोळी पाहून लक्ष्मण सहस्रबुद्धे क्षणभर हताश झाले . पण काही क्षण ! हार मानेल तो सहस्रबुद्धे कसला ?
त्यांनी एकदाच फक्त आपल्या कवटीकडे बघितलं ! पुन्हा त्या गरम राखेत हात घालून भराभर मिळतील ती हाडं बाहेर काढू लागले .
‘ काय हे मानवी शरीर ? कुठे कुठे काय काय असतं काय माहित ? एवढ्याने काम होईल ? ‘ खात्री नव्हती . अजिबात नव्हती .
‘ आज चावदस ! उद्या अमावस्या ! काही थोडं फार होईल ते आत्ताच करावं लागेल . ‘
ते खाली ठाण मांडून बसले . पद्मासन घातलं . डोळे बंद केले आणि मंत्रोच्चाराला सुरुवात केली . आणि … अघटित घडलं ! … तो सापळा उभा राहिला आणि पुन्हा कोलमडून पडला . सहस्त्रबुद्धे अस्वस्थ झाले . दोन तीनदा प्रयत्न केला पण यश आलं नाही .
वेळ घालवण्यात अर्थ नव्हता . त्यांनी भराभर आपल्या अस्थी उचलल्या .
‘राख ? राख कशात भरावी ? ‘ आजूबाजूला बघितलं .
मांत्रिकाची झोळी दिसली . ती घेतली आणि भराभर राख त्यात भरायला लागले ,तशी ती कापडी झोळी जळायला लागली . गरम राख ! झोळीतून खाली पडायला लागली . पण नाईलाज होता . जेवढी राहील तेवढी राहील ! ते भरत राहिले लक्ष दिलं नाही !
तोंडाने मंत्रोच्चार सुरूच होते . कदाचित त्याचा परिणाम असावा . झोळी पूर्ण जळाली नाही . जेवढी राहिली तेवढी गुंडाळून स्वारी निघाली !
स्वतःच्या अस्थी ,स्वतःची राख घेऊन सहस्त्रबुद्धे निघाले !
चेहेरा असा होता की हसले तरी कुणाला कळणार नाही !
आणि डोळे असे की कुणी नजर मिळवायची हिम्मत करणार नाही ! त्या स्मशानातुन बाहेर निघाले .चारी बाजूला नजर फिरवली समोर दोन चार कुत्री सोडली तर दुसरी काही हालचाल नव्हती .
शांतता ! चिडीचूप शांतता ! कुत्री ही यांच्याकडे पाहून शांत उभी होती . नजरा नजर झाली . काय संदेश गेला कुणास ठाऊक ? एक काळं कुत्रं त्यांच्या पुढे चालायला लागलं . सहस्त्रबुद्धे त्याच्या मागे !
क्रमशः- …..
पुढील भाग प्रकाशित – २४ ऑगस्ट २०२६ at ११:३१ am
{ २ }
मांत्रिकाच्या रूपातील सहस्रबुद्धे आपल्या घराजवळ पोहोचले . आपल्या घराकडे एक नजर टाकली . घर गाढ झोपेत होतं ! निदान बाहेरून तरी तसं वाटत होतं .
‘ कमाल आहे ! आपल्याला मरून अजून एक दिवस ही झाला नाही आणि हे लोक डाराडूर झोपले ? यांना काहीच ….. ‘
वरच्या मजल्याच्या गॅलरीत हालचाल जाणवली . बाहेरचा लाईट लागला . एक स्त्री बाहेर आली .
” कोण …? कोण आहे …? “
सहस्र्बुद्धेच्या डोळ्यात क्षणभर आनंद तरळला . समोर उभी असलेली त्यांची पत्नी होती . सहस्र्बुद्धेच्या चेहेऱ्यावर क्षणभर आनंद उमटला आणि नंतर वेदना !
‘ही आपल्याशिवाय राहील ? जगेल ? कशी ? हिला तर आपल्याशिवाय एक क्षण ही चैन पडत नाही ! आपण हिचं सर्वस्व होतो ! ‘
.. त्यांनी पुहा विचारलं ,
” कोण ? कोण ए तिकडे …?”
आवाजात वेदना होती . ती खूप थकल्यासारखी वाटत होती . सहस्त्रबुद्धे काही बोलणार इतक्यात त्याना आपल्या अवस्थेचं भान आलं . आपण जरी सहस्रबुद्धे असलो तरी हे शरीर एका मांत्रिकाचे आहे . आपण कितीही सांगितलं तरी कुणी मान्य करणार नाही . जे काही करायचं ते या शरीराची ओळख ग्राह्य धरूनच करावं लागेल .
सहस्रबुद्धे आज लौकिक अर्थाने संपलाय . त्याला जिवंत करणं म्हणजे नुसतं शरीर जिवंत करून चालणार नाही . प्रथम आपल्या जवळच्या लोकांच्या मनात आपलं काय स्थान आहे / ते आपल्याला स्वीकारतील की नाही ,हे बघावं लागेल .
” मी विचारलं कोण आहे ?”
मिसेस सहस्रबुद्धेनी पुन्हा प्रेमाने विचारलं . आणि निरखून पाहिलं .
‘ रात्रीच्या अंधारात कुणी काळे वस्त्र धारण केलेला आणि डोक्याला कफनी बांधलेला ,दाढी वाढलेला हा आहे तरी कोण ? कुणी तांत्रिक ,मांत्रिक वाटतोय ! हा यावेळी इथे काय करतोय ? काही अभद्र ……. ‘ मिसेस सहस्रबुद्धेच्या मणक्यातून थंडगार लहर गेली .
” त्या लगबगीने आत गेल्या आणि घाबरून मुलांना आवाज देऊ लागल्या .
” विलास ,जयदीप ssss ,सुषमा sssss अरे उठा रे ! अरे विलास sssss …”
विलास त्याच्या बेडरूम मधून डोळे चोळत बाहेर आला .
” आई काय झालं ? “
” अरे बाहेर बघ ना … कुणी आलंय .. ! ”
” तुला कसं समजलं ? “
” अरे मी बघितलं बाल्कनीतून … ”
” आई रात्रीचे तीन वाजतायेत ! तू बाल्कनीत कशाला गेली होतीस ?”
” अरे मला वाटलं तुझे बाबा ….. ” मिसेस सहस्रबुद्धेनी पुढील शब्द आवरले . त्यांच्या डोळ्यात पाणी दाटून आलं . तसा विलास आई जवळ गेला .
” आई … अगं सकाळपासून रडतेस ! बाबा सोडून गेलेत आपल्याला ! स्वीकार करणं सोपं नाही हे मला ही समजतंय पण आपण तरी काय करणार ?”
” अरे पण … “
तेवढ्यात दारावरची बेल वाजली . दोघे ही दचकले . आणि तेवढ्यात जयदीप सुषमा ही बाहेर आले . काही पाहुणे हॉल मध्ये झोपले होते ते ही उठुन बसले .
” आता यावेळी कोण असेल ? आपण काही पाहुण्यांची व्यवस्था जोशींच्या बंगल्यात केली होती ,त्यांना तर काही लागत नसेल ?”
जयदीप म्हणाला आणि पुढे जाऊन दरवाजा उघडला .
समोर उभा असलेला मांत्रिक पाहून त्याला भयंकर दचकायला झालं . तसा तो थोडा मागे सरकला आणि मांत्रिक पुढे सरसावला . सरळ घरात !
अर्थात सहस्त्र बुधे आपल्याच घरात ,आपल्याच लोकांत अपरिचित होते . त्यांचा अवतार पाहून सुषमाला ही घाम फुटला होता . ती तिच्या सासूकडे सरकली .
” अहो असं घरात काय घुसताय ? कोण हवंय तुम्हाला ? “
” सहस्रबुद्धे ! ” आवाज कडाडला . ” लक्ष्मण सहस्रबुद्धे ! “
“सॉरी ,पण त्यांचं आज सकाळीच देहावसान झालं . “
” माहितीय मला ! “
” माहितीय ? तरी विचारताय /”
” हो ! कारण देहावसान शरीराचं होतं ,आत्म्याचं नाही ! त्यांचा आत्मा इथेच घुटमळतोय ! “
जयादिप ला राहवलं नाही . त्याला मांत्रिकाची अधिकार वाणी सहन होत नव्हती .
” काही ही शेंड्या लावू नका ! अर्ध्या रात्री कुणाच्या घरात घुसून त्रास द्यायला लाज वाटत नाही ?”
” जयदीप ! तोंडाला आवार जरा ! लाज तर तुम्हाला वाटली पाहिजे . घरातला कर्ता माणूस गेला आणि तुम्ही डाराडूर झोप काढताय ?”
आपलं नाव मांत्रिकाच्या तोंडून ऐकून जयदीप हादरला .
” तुम्हाला माझं नांव कसं माहित ?”
“अरे तुझच काय ? मला तुझ्या पूर्ण खानदानाची कुंडली माहिती आहे ! तुझा बाप का मेला ? कसा मेला ? हे ही मी जाणून आहे ! “
नातेवाईक ही आता भेदरले होते .थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही .विलास पुढे झाला .
” माफ करा महाराज ! पण असं चुकीच्या वेळी कुणाच्या ही घरात घुसणं योग्य आहे का ?”
” विलास , ज्याच्या अस्थी माझ्या सोबत आहेत ,त्याच्याच घरात मी आहे !”
” काय ? ” विलास आणि जयदीप दोघे किंचाळले . दोघांना ही राग आला .
” अरे अजून राख गार झाली ही नसेल . आणि तू आमच्या वडिलांच्या अस्थी घेऊन फिरतो आहेस ? काही लाज ? काही शरम ?”
” बसा ! समोर बसा ! सुषमा ,तू ही बस ! ”
मांत्रिकाने मिसेस सहस्रबुद्धे ना ही बसायला सांगितलं . आवाज असा होता की कुणी विरोध करू शकलं नाही .
” ही राख थंड व्हायच्या आत मला माझं काम पूर्ण करावं लागणार आहे ! नंतर ते शक्य नाही ! अगदी सूर्योदयाच्या आधी ! “
” कुठलं काम ? “कुणालाच काही कळत नव्हतं . जयदीप नेच विचारलं .
” लक्ष्मण सहस्र्बुद्धेना पुन्हा मूर्त रूपात आणण्याचं काम ! “
” म्हणजे ?”
” म्हणजे मी लक्ष्मण सहस्र्बुद्धेना पुन्हा जिवंत करणार आहे ! “
” काय ? ” पाहुण्यांसकट सगळ्यांची भीतीने गाळण उडाली .
” अहो पण कसं शक्य आहे ?”
” या जगात काही ही अशक्य नाही ! फक्त त्यासाठी करणारा हवा ! त्याच्यात क्षमता हवी ! त्यातील पूर्ण ज्ञान हवं ! आणि करायची तयारी हवी ! “
” अहो पण तुम्हाला हे नसते उपदव्याप करायला कुणी सांगितलं ? जे निसर्ग विरुद्ध आहे त्याचे परिणाम किती भयानक होतील याची जाणीव आहे का ? ”
” परिणामांची पर्वा भ्याड लोक करतात ! आणि लक्ष्मण सहस्त्रबुद्धे भ्याड नाही ! भ्याड नाही ! त्यांनीच मला हे सांगितलं . “
” कधी ? आणि ते कधी भेटले तुम्हाला ? आम्ही तर कित्येक दिवस त्यांच्या जवळ होतो . आज तर सकाळ पासून जवळ बसून होतो ! “
” जयदीप ,अरे नुसतं जवळ बसल्याने काही होत नाही . माणूस मनाने जवळ हवा . एकमेकांच्या मनातील कळायला हवं . ओळखायला हवं ! तू मनाने बापाच्या किती जवळ होतास ? अरे तूच काय ,हा विलास ,तुझी आई ,तुझी बायको ? अरे कुणी तरी कधी प्रयत्न केला का ? की आपलं माणूस आहे , याच्या मनात काय आहे ? याची काय अपेक्षा आहे ? “
” जाऊ दे वेळ घालवण्यात अर्थ नाही आता ! आणि निदान तुझ्या पुढे डोकं फोडून तरी उपयोग नाही ! “
जयदीप खाली मानेने सर्व काही ऐकत होता आणि सर्वांची नजर त्याच्या कडे होती . एक तिऱ्हाईत माणूस यावेळी येऊन चार गोष्टी ऐकवून जातो ज्यातील शब्द नी शब्द खरा आहे . पण याउलट परिणाम सुषमा वर झाला .
‘ कोण कुठला दीड दमडीचा मांत्रिक याला बोलतोय आणि हा खाली मानेने ऐकून घेतोय ? यानेच तर काही केलं नसेल ? ‘
तिने रागाने जयदीप कडे आणि मांत्रिकाकडे पाहिलं .
” शामल , तुझ्या नवऱ्याचे कपडे दे ! “
मिसेस सहस्रबुद्धे मांत्रिकाच्या तोंडून आपलं नांव ऐकून दचकला आणि सावरल्या ही !
” हे बघा ,मला नावाने हाक मारायचा अधिकार फक्त यांचा होता ! तुम्ही मिसेस सहस्रबुद्धे म्हणा . “
सहस्रबुद्धे गालातल्या गालात हसले . जे कुणाला कळणं शक्य नव्हतं !
” ठीक आहे माझी चूक मी मान्य करतो . पण तुम्ही वेळ नका घालवू . त्यांचा एखादा कपडा द्या . “
” हे बघा तुम्हाला कपडेच हवे असतील तर मी नवीन घेऊन देईन . पण ह्यांची एक ही वस्तू मी तुम्हालाच काय कुणालाच देणार नाही ! “
शामल ने आपल्या मुलांवर आणि सुनेवर ,नातेवाईकांवर नजर फिरवत उत्तर दिलं .
” का ? “
” का म्हणजे ? अहो तीस वर्ष संसार केला आम्ही ! प्रत्येक वस्तूमध्ये आमच्या आठवणी आहेत ! त्याच देऊन टाकायच्या ? त्या माणसाला आपल्या पासून दूर करायचं ?”
” ह्याला काही अर्थ आहे का ? मग त्याच्या सोबत का नाही गेलात ? जो मुळातच तुमच्या पासून दूर गेलाय त्याचे कपडे ,वस्तू ,मालमत्ता सांभाळताय ? त्यापेक्षा त्यांना सांभाळायचं होतं ! आणि हे सर्व सांभाळण्याने ते परत येणार आहेत का ?”
” का नाही ? तुम्हीच म्हणालात ना की देहावसान देहाचं होतं ,आत्म्याचं नाही म्हणून ? “
” म्हणजे तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवलात ?”
” आई ? काय तू पण ? याच्या नादी लागतेस ? हे लोक पोट भरण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात . आणि बाबा काही साधे आसामी नव्हते ! प्रसिद्ध व्यक्तिमत्व होतं ! बोलण्याच्या ओघात कुठे बोलले असतील . “
” नाही ! मी यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाहीए . तुझ्या बाबांना अनेक सिद्धी प्राप्त होत्या ! ज्यांचा सामान्य माणूस विचार ही करू शकत नाही ! “
” मग तरी ही असं व्हावं ?” सुषमाचा प्रश्न सर्वांना अचंबित करून गेला .
” असं म्हणजे ?”शामल च्या जिव्हारी लागलं . पण सुषमा काही बोलणार इतक्यात मांत्रिकाने विचारलं ,
” मला सांगा ,मी थांबू की जाऊ ? लक्ष्मण ने मला ही जबाबदारी सोपवली होती . पण तुम्ही साधा एक कापड द्यायला ही तयार नाही ! मग ती वस्तू कशी द्याल ? जाऊ द्या ! त्याचं तो बघेल कसं परत यायचं ते ! मी जातो ! “
मांत्रिक रूपातील सहस्रबुद्धे तडक उठले . आणि चालायला लागले .
” थांबा महाराज ! ” शामल पटकन म्हणाली . आणि त्यांच्या रूमकडे गेली . येताना तिच्या हातात छोटी बाटली होती . सहस्त्रबुद्धे ना बायकोचं कौतुक वाटलं . आणि आनंद ही झाला ती बाटली पाहून .
” हे घ्या एवढी एकच वस्तू मी तुम्हाला देऊ शकते . “
” हरकत नाही ,चला निघतो मी ! “
” थांबा ! मी सुद्धा येते ! मला यांना पुन्हा मूर्त रूपात येताना बघायचंय ! “
” नाही ! मी तुम्हाला सोबत नेऊ शकत नाही ! लोक काय म्हणतील ? सहस्रबुद्धेची बायको एका मांत्रिक सोबत गेली ? आणि तसं ही सहस्रबुद्धे आले की येतीलच इकडं ! “
” काय ?”
सुषमा आणि जयदीप हादरले !
” हो सहस्त्रबुद्धे परतले की इथे नक्की येतील ! कुठल्या वेशात ,कुठल्या रूपात ते नाही सांगता येणार ! मिसेस सहस्रबुद्धे त्यांना नक्की ओळखतील ! पण तोवर याची वाच्यता कुणीही कुठे ही करायची नाही ! इथे आत्ता काय झालं हे बोलायचं नाही ! नाही तर परिणाम भोगायला तयार राहायचं ! “
सहस्रबुद्धेची करडी नजर सर्वांवरून फिरली . जे नातेवाईक तिथे झोपले होते त्यांना सुरुवातीला उत्सुकता होती की काय चाललंय म्हणून ! म्हणजे ते सर्वांना तिखटमीठ लावून सांगायला मोकळे ! पण आता पश्चाताप होत होता ! सांगायचं नाही म्हणजे काय ? आम्ही तर …… “
सहस्रबुद्धे निघून गेले ,तसा सर्वांचा जीव भांड्यात पडला .
” आई ,अगं काय होतं त्या बाटलीत ? आणि हा सर्व काय अघोरी प्रकार चालवलाय ? आम्ही इथे राहायचं की नाही ? “
जयदीपचं उतावीळ स्वभाव उफाळून आला .
” आई मी काय विचारतोय ? त्या बाटलीत काय होतं ?”
” काही नाही ! “
” हे बघ तुला सांगावंच लागेल ! काय लपवतेस आणि का ? तुमच्या आयुष्याची अशी कोणती बाजू आहे जी आमच्या पुढे तू उघडू शकत नाहीस ? “
शामल ला खूप थकवा आला होता . ती अलगद सोफ्यावर बसली . जयदीप आणि विलास तिच्या पायाशी बसले . सुषमा तिच्याजवळ सोफ्यावर . शामल आता भूतकाळात हरवली होती . तिला आता नातेवाइकांची पर्वा नव्हती . ना मुलांची फिकीर . …..
इकडे सहस्त्रबुद्धे ती बाटली हातात मिळाल्या पासून निश्चिन्त झाले होते . आता त्यांच्या जवळ वेळच वेळ होता ! ……
➣➣➣➣➣
{ ३ }
हे शरीर पंच महा भूतानी बनलेलं असतं . जल ,अग्नी ,पृथ्वी ,वायू ,आकाश ! आपण मेल्यानंतर आपला अंत्यसंस्कार होतो . शरीराची राख होते . आणि ती राख आणि अस्थी पाण्याला लावल्या की शरीराचे चक्र पूर्ण होते ! शरीर अनंतात विलीन होतेच पण आत्मा ही मोक्ष पावतो . पुढील दहा दिवसात पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये मुक्त होतात नंतर मन आणि बुद्धी !
पण हे सामान्यांसाठी ! काही लोक याला अपवाद असतात . अपवाद ठरतात . त्यांना स्वतःला निसर्ग चक्रात अडकून राहायचं नसतं . स्वतःचं अस्तित्व स्वतःचं वेगळेपण सिद्ध करायचं असतं ! अर्थात काही जण जन्मताच वेगळे असतात . त्यांचा जन्म काही वेगळ्या कारणांसाठी झालेला असतो .
सहस्त्रबुद्धे असेच ! सामान्य असले तरी जगावेगळे ! स्वतःचं वेगळेपण माहित असणारे ,जपणारे ,वृद्धिंगत करणारे !
लक्ष्मणचं वय वर्ष ६ असतानाची ही घटना ! …….
आपल्या आई सोबत लक्ष्मण आजोळी गेला होता ! तसा तो दरवर्षी जायचा . पण आता समजायला लागलं होतं . त्यामुळे मजा वाटायची . आजोळ कोकणातलं ! नारळी पोफळीच्या बागांनी समृद्ध आजोळ ! सावकारी होतीच सोबतीला !
आजोबांना गावात मान होताच ! कुणाकडे काही कार्य असलं की आजोबांना मानाने बोलावलं जायचं . आजोबा ही उदार स्वभावाचे होते . मोकळ्या मनाने मदत करायला नेहमी तत्पर असायचे . मोबदला म्हणा किंवा व्यवहार म्हणा , नावाला व्याज घ्यायचे .
मामा ला सहन व्हायचं नाही . पण वडिलांचा आदरयुक्त दरारा असल्याने काही बोलता यायचं नाही . तशीही कोणत्या गोष्टीची कमतरता नव्हती ,सर्व सुरळीत चाललं होतं .
मामाचं लग्न करायचं होतं . त्यामुळे स्थळ बघायचं काम चालू होतं . मामा ला काही केल्या मुलगी पसंत पडत नव्हती .
तेव्हा एक दिवस आजोबांनी मामाला विचारलंच ‘
” दिवाकर ,अरे कशी मुलगी हवी तुला ? नीट सांगत का नाहीस ? नाहीतर तूच बघ बाबा ! मी लोकांना नकार देऊन आता कंटाळलोय . तुझ्या कुणी पाहण्यात आहे का ?”
दिवाकर काही बोलला नाही . तो विषय तिथेच थांबला .
संध्याकाळ झाली . कुणीतरी दाराशी आलं आणि नोकराच्या कानात कुजबुजलं . त्याने जाऊन आजोबांना सांगितलं ,
” अगं ऐकतेस का ?”
लक्ष्मण च्या आजोबानी म्हणजे रामदास शेठ नी आपल्या पत्नीला आवाज दिला , तशा त्या पदर सावरत बाहेर आल्या ,
” मला जरा काम आहे , यायला उशीर होईल , तुम्ही जेऊन घ्या ! सखा चल ! “
रामदास शेठ ने नोकराला निघायला सांगितलं . बैलगाडी निघाली .
” बाबा ,मी येऊ ? ” लक्ष्मण ने विचारलं .
” बाळा ,रात्रीची वेळ आहे ! त्यात पावसाचं वातावरण ! आम्ही येतोच ! “
” अहो पण कुठं …… ?”
रामदास शेठ च्या पत्नीला म्हणजे तुळजा बाई ला राहवलं नाही . पण विचारायची सोय नव्हती आणि पद्धत ही नव्हती .
ते गेल्यावर काही वेळाने दिवाकर घरी आला .
” आई ,बाबा …. ”
” अरे त्यांना काही काम होतं , बाहेर गेलेत ते ! ”
” कुठे ? “
” मला नाही सांगितलं रे बाबा .. जेव आणि झोप मुकाट …. ! “
कधी नव्हे त्या तुळजा बाई चिडल्या .
” शारदा , तू आणि बाळा पण जेऊन घ्या . “
तुळजाबाईनी लक्ष्मण ला आणि त्याच्या आईला शारदाला सांगितलं .
” आणि तू ?”
” मी ते आल्यावर बसेन …”
” आग आई बाबा सांगून गेलेत ना तुम्ही जेऊन घ्या म्हणून मग …. ” शारदा आईला समजावत म्हणाली .
” अगं त्यांना समजायला नको ? कुठं जातात ,काय करतात ? कधी सांगत नाहीत ! बाप तसला आणि पोरगा असला , एक पोरगी पसंत करत नाही मेला ! मी किती दिवस खपायचं अजून ? “
” आई बाबांचा राग माझ्यावर काय काढतेस ? मला नाही जेवायचं ! “
एवढं बोलून दिवाकर उठला आणि बाहेर निघून गेला .
” अरे … अरे पोरा ….. ” पण तो थांबला नाही .
” पाहिलंस शारदे ! कसं बाप बेटे हैराण करतात … आता हा स्वयंपाक कुणाच्या मढ्यावर घालू ….? “
शारदेला वाईट वाटलं . आपलं इथं येणं आता योग्य नाही . आईला ही आपला त्रास होतो . दिवाकर तर नीट बोलत ही नाही . ”
” आई ,मी उद्या जाते परत … “
” का गं …. तुला काय कमी पडलं इथं ? आठ दिवस राहणार होतीस ना ? मग राहा की ? नवरा काय म्हणेल तुझा ? बापाच्या घरी खायला नव्हतं ? ”
” आई ते काही बोलत नाहीत . उगीच त्यांना मध्ये आणू नकोस . “
” हो का ! बराच पुळका आहे गं नवऱ्याचा ! मग कशाला येतेस इथं …. “
” आई … ” शारदा कडाडली ! तिला कळत नव्हतं आज आईला काय झालं ते . अशी का वागतेय ?
” बाळा .. चल … आपण जाऊयात ….. ” शारदा ने लक्ष्मण चा हात धरला आणि निघाली .
” जा … जा तू ही जा …. मला एकटीला मरू द्या या एवढ्या मोठ्या घरात ….. ”
असं म्हणून तुळजाबाई रडायला लागली .
” आई अगं काय झालंय ? तू अशी का वागतेय ?”
” अगं .मी काय करू मग ? कंटाळलेय या एकटे पणाला ! एवढं मोठं घर खायला उठतं मला ! तू दोन दिवस राहतेस ,चालली जातेस . ना दिवाकर घरी असतो ना तुझे बाबा ! ”
” अगं आई पण या घरात तू तीस पस्तीस वर्ष काढली . मग आता काय झालं ? ”
” काही कळत नाही गं पोरी ! कुणीतरी सतत आपल्यावर पाळत ठेऊन आहे असं वाटतं ! कुणी मागोवा घेतय ,मागे मागे फिरतंय ,रोखून बघतय असं वाटतं . “
” मग बाबांना का सांगितलं नाहीस ?”
“ते मला वेडी समजतात ,मला भास होतात म्हणे …. “
” मला का नाही सांगितलंस कधी ?”
” तुला काय सांगणार ? तू तुझ्या संसारात रममाण …. दोन दिवस येतेस आणि जातेस … कधी विचारलंस आईला कशी आहेस म्हणून ….? मला सगळ्यांनी गृहीत धरलंय ! आहे एक जण घरात ! करते सगळ्यांचं …. मी करते पण गं आणि मरेपर्यंत करेल ! पण हे मानगुटीवर कोण बसलय ते तर कळायला हवं …. “
” आजी …. एक लहान मूल आहे …. आणि सोबत एक बाई …… “
लक्ष्मण क्षणार्धात बोलून गेला . या दोघी अवाक झाल्या .
” काय ? ….. “
” आजी ,एक लहान मूल आहे आणि एक बाई …. ”
तुळजा बाई भानावर आल्या . त्यांना गहिवरून आलं . आपली चूक समजली . निदान या लहान मुलं समोर तरी विषय नव्हता काढायचा आपण …..
” अरे बाळा …. काही नाही रे …. माझ्या मेलीचं काय ऐकतोस ? वेड लागलंय मला …. “
” नाही आजी … तू वेडी नाहीस … तू म्हणतेस ते खरं आहे ! अजून ही ती बाई तुझ्या मागेच उभी आहे ! “
” काय …. ? “
तुळजा बाई आणि शारदा घाबरून उठल्या ,उभ्या राहिल्या . शारदा ने लक्ष्मण ला ओढून जवळ घेतलं .
आणि बाहेर व्हरांड्यात आली .
” आई ,आजीला आपली गरज आहे . आपण थांबू इथे ! नाहीतर ….. “
” नाहीतर काय ? “
” नाहीतर आजी मरून जाईल …. “
” लक्ष्मण ….. ” शारदा ने खाडकन त्याच्या मुस्काटात मारली .
” अगं त्याला कशाला मारतेस ? लहान आहे तो ….. कदाचित .. कदाचित खरं सांगत असेल … तर …. “
तुळजाबाई आता शांत झाल्या होत्या . त्यांच्या डोक्यावरचं मोठं ओझं उतरलं होतं . शारदाच्या अंगावर सरसरून काटा आला .
” खरं सांगत असेल म्हणजे … आई तुला काय म्हणायचंय ? याला ते कसे दिसतात ? मला तर कुणी दिसलं नाही . मला ही एक दोनदा तसं वाटलं पण म्हटलं भास असेल …. आणि हे सर्व कधी पासून सुरु आहे …? “
” मला ही नेमकं समजत नव्हतं तरी वर्ष ,सहा महिने झाले असतील …. म्हणजे बघ … मागच्या वेळेस तू येऊन गेलीस ना तोवर तर काही नव्हतं . त्याच्या नंतरच ….. “
” आई याचा अर्थ मागच्या काही दिवसात असं काही घडलंय जे आपल्याला माहित नाही ! “
” बाई ,असं काय घडलं असेल ..?”
” आई ,कदाचित दिवाकर किंवा …… किंवा बाबा आपल्या पासून काही लपवून तर ठेवत नसतील …? दिवाकर लग्न करायला तयार नाही . बाबांचा पाय घरात थांबत नाही याला कारण काय ?”
” दिवाकर चं मला माहित नाही ! पण तुझे बाबा असलं काही करणार नाहीत …”
” असलं काही म्हणजे ….. “
शारदा गूढ आवाजात बोलली .
” शारदे ….. ज्या अर्थी लक्ष्मण काही दिसतंय आणि मला जाणवतंय ,तुला ही एक दोन दा जाणवलं म्हणतेस ,याचा अर्थ काही तरी अनर्थ घडलाय ….. कुणीतरी ….. कुणीतरी अनैसर्गिक रित्या मेलंय ….. ते जीव आपल्या घरात वावरतायेत …… “
” पण आपल्याच घरात का …? तुला असं तर नाही म्हणायचं की आपल्या घरातील कुणी कारणीभूत आहे ? “
” मी तरी काय सांगू पोरी ? आणि कसं कुणाला विचारणार ? दिवाकर एकुलता एक ! लाडात वाढलेला वंशाचा दिवा ..
.. तुझ्या बाबानी साधं बोट लावलं नाही कधी त्याला … आता आता थोडं चिडायला लागले .. पण कधी कोणत्या गोष्टीचा जाब नाही विचारला …. त्यामुळे असेल …. कदाचित …… “
” आई याचा अर्थ तुला दिवाकर चा संशय आहे ! “
” पोरी ,हा विषय इथंच बंद कर ! तू जात होतीस ना ,तू जा सकाळी ! मला मेलीला मरू दे ! माझ्या पोराच्या आयुष्य पेक्षा माझा जीव मोठा नाही ! “
” आजी आणि तसं नसेल तर …?”
लक्ष्मण पुन्हा बोलला …. दोघी अवाक झाल्या . हा एवढासा जीव ! असं अगम्य ,गूढ का आणि कसं बोलतोय ?
” बाळा ,हे बघ तू अजून लहान आहेस ! मी काय सांगते ते ऐक …. ” तुळजाबाई नि त्याला प्रेमाने जवळ घेतलं आणि समजाऊ लागल्या .
” शिक ,खूप मोठा हो ! पण पुन्हा या घरात पाय ठेऊ नकोस ! तुझ्या आईला सुद्धा इथे येऊ देऊ नकोस . बाबांना सांग तसं . आजी आणि आई चं भांडण झालं म्हणून ! … ”
लक्ष्मण वेगळ्याच विश्वात वावरत होता ,तो वेगळाच बोलून गेला ….
” आजी यात मामाची काही चूक नाही …. त्यांनी तर मदतच केली होती … पण तरी ही यांचा बळी गेला . यांना आपल्याकडून ,मामा कडून मदतीची आस आहे ! म्हणून इथे आहेत ! “
” काय …?” दोघीही गांगरल्या .
तेवढ्यात दिवाकर आला . तशा या शांत बसल्या .
तो समजला ,काही तरी झालंय !
” आई ,ताई .. काय झालं .. तुम्ही इथे बाहेर काय करताय ….. ?”
शारदा विषय टाळत म्हणाली ,
“काही नाही रे ! तुमचीच वाट बघत होतो . बाबा अजून आले नाहीत …. ! “
दिवाकर ला समजत होतं की काहीतरी झालंय पण ….
” मामा , … ती दोघं घरात आहेत ! ” लक्ष्मण उद्गारला .
” कोण ?” दिवाकरला कळेना .
तो आत गेला , पूर्ण घर पाहून आला .
“इथे तर कुणी नाही ! हा कुणाबद्दल सांगतोय ?”
दिवाकर ने विचारलं .
” मामा ,एक बाई आणि एक लहान मूल आहे ! “
” कुठे ..?”
” घरात ! “
” लहान मूल ? मग ! तू तर खूप मोठा झालास बाळा ! “
दिवाकर कौतुकाने म्हणाला .
” मामा आजीला घरात भीती वाटते ! “
” काय … ? मग मला का नाही सांगितलंस ? कधी पासून होतंय असं ? “
” वर्ष सहा महिने झाले ! ” तुळजाबाई हळूच बोलल्या .
” अगं मग मला सांगायचं ना ! ”
” काय सांगू तुला ? तुझ्या बाबांना सांगितलं एक दोनदा तर म्हणाले तुला भास होतायेत … एकदा तर चिडले ही माझ्यावर . वेड लागलंय म्हणे मला . …. “
” आई ,अगं काय हे ? मी असताना तू सर्व सहन करते आहेस ? एक शब्द सांगायचं तरी ? मी तर पूर्ण घर बघितलं , मला कुणी दिसलं नाही ! काल परवा एका बाईला घरातून जाताना पाहिलं , म्हटलं तुला भेटायला ,काही घ्यायला आली असेल . नंतर मी ही लक्ष दिलं नाही . कदाचित तीच असेल ! “
” कशी दिसत होती ?”
” एवढं लक्ष नव्हतं माझं ! डोक्यावर पदर होता . तोंड झाकलेलं होतं . पण कडेवर एक मूल असावं बहुतेक …. “
” दिवाकर जाऊ दे तो विषय … चला जेवण करू . तुझे बाबा काही यायचे नाहीत ! कुठे राहिले काय माहित ? “
” आई बाबा असे न सांगता का जातात ? कुठे जातात … ? “
” काय माहित पोरा , त्यांना सवयच नाही सांगून जायची . आपण फक्त वाट बघत बसायचं . “
“आई ,हे चांगलं नाही . मी असं ऐकलंय की बाबांच्या जीवाला धोका आहे . काही लोक त्यांचा घात करायला टपून बसलेत . कधी काय होईल सांगता येत नाही ! उद्या काही कमी जास्त झालं तर आपण कुठे शोधणार ? “
” अरे मग तू का जरा कामात लक्ष घालत नाहीस ? नुसता हुंदडतोस दिवस भर ! “
” आई त्यांना माझं लक्ष घालणं मान्य नाही ! आपलाच पैसा आणि आपणच चारदा लोकांपुढे हात जोडायचे कधी देतोस म्हणून ! हे पडले दानशूर ! कुणाला काही बोललं की तोच मला ऐकवतो की बाप कसा नी पोरगा कसा ! शिवाय बाबांना जाऊन सांगतात . बाबा अजून मोठे पणाचा आव आणतात . पोरकट बुद्धी आहे म्हणे माझी ! आता तर गावात कुणाला बोलायची सोय राहिली नाही . काय करतात देव जाणे ! “
विषयाला वेगळं वळण लागलं होतं . मुख्य विषय बाजूलाच राहिला . सर्व जण जेवायला बसले . आणि ते बुभुक्षित आत्मे वखवखलेल्या नजरांनी त्यांच्या ताटांकडे आणि तोंडाकडे बघत राहिले ….
” आजी …. “
” काय रे बाळा …. ?”
” त्यांना ही जेवायला दे ना ….. “
” कुणाला ..? ” तुळजा बाई घाबरल्या ,त्यांना अर्थ समजला . तशा पुन्हा उठल्या .
” पोरी ,तू जा इथून … पुन्हा फिरकू नकोस इकडे ! काही झालं तरी फिरकू नकोस . … “
” आई काय झालं परत …?”
दिवाकर वैतागला .
” मामा ,त्या मावशीला जेवायला पाहिजे . “
” कोण मावशी ..?”
” ती घरात आहे . तिच्या बाळाला ही भूक लागलीय . “
” तुला कसं माहिती ?”
” ते जेवायला मागतात रोज माझ्याकडे ! “
” काय …?”
आता शारदा ही थरारली .
” अरे कधी बोलला नाहीस ?”
” नाही ! मागतात आणि निघून जातात ,पण आज जात नाहीत ! हे कोण आहेत …? मामा ,तुझी मदत पाहिजे यांना ! त्यांची मदत करशील ना ….. “
दिवाकरला समजेना . तो पुरता गांगरला होता . एवढयाशा पोराला काय सांगणार ? काय उत्तर देणार ? त्याच्या बोलण्याला नकार ही देता येत नव्हता . नाकारता येत नव्हतं . त्याला काय सांगणार ? भास होतायेत म्हणून ? त्याला काय भास कळणार ?
” ठीक ए बाळा , मी बघतो काय ते … तू झोप आता … बरीच रात्र झाली . “
मध्य रात्र उलटून गेली होती तरी रामदास शेठ चा पत्ता नव्हता .
शारदा ने लक्ष्मण ला पुढे घालून झोपवलं . तो थोड्याच वेळात झोपी गेला , तशी शारदा ,आई आणि भावा जवळ येऊन बसली .
” शारदे , याला काय झालंय ? हा घरी असाच करतो का ?”
” असं म्हणजे कसं ?”
” अगं इथे कोणीच नसताना याला बरी बाई दिसते ….. “
” दिवा , आईनेच सांगितलं मगाशी आम्हाला ,की तिला भास होतात म्हणून . बिचारी दिवस भर एकटी असते घरात ! घर खायला उठतं तिला ! भास होतात म्हणे आपल्यावर कुणाचं लक्ष आहे ,कुणी बघतंय एक सारखं म्हणून ! तुम्ही तिच्याकडे लक्ष देत नाहीत . तू लग्न करत नाहीस ,ती एकटी किती दिवस सहन करणार ?
राहिली गोष्ट माझ्या बाळाची ,त्याला काही झालेलं नाही ! उलट त्याने आई समोर तुझी बाजू घेऊन सांगितलं की यात मामाची काही चूक नाही म्हणून ,त्यांचा हकनाक बळी गेलाय ! त्या मदतीसाठी मामाकडे आल्यात . आता त्याला हे कसं समजलं , दिसलं हे मला ही समजत नाहीए . कुणाला तरी विचारावं लागेल . मी एक काम करते . उद्या आईला माझ्या सोबत घेऊन जाते . काही दिवस माझ्या कडे राहील तर बरं वाटेल . पण मला एक सांग ,तू लग्न का करत नाहीस ? काही अडचण आहे का ?”
” आई ,अगं काय अडचण असणार ? हाताला काम नाही . हातात पैसे नाही . सर्व व्यवहार अजून ही बाबा सांभाळतात . लोक तोंडावर नाही पण मागे बोलतात की पोरगा बसून खातो म्हणून . अगं कुठे कामाला जावं तर तिथे ही यांचं नांव आड येतं . माझाच बाप माझा वैरी ठरतोय ! “
” दिवाकर ,अरे काय बोलतोयस …?”
” अगं मग काय करू ? तूच सांग ना ? उद्या बायको आल्यावर खर्च वाढणार ! काही लागलं तर बाबांकडे हात पसरवायचा का ? मला योग्य वाटत नाही . त्यापेक्षा मी अगोदर काही तरी काम धंदा बघेन नाहीतर बाहेर जाईन कामाला . एक दोन ठिकाणी प्रयत्न करतोय मी ….”
दिवाकर ची आई आणि बहीण सुन्न झाली. आपण याचा कधी विचारच केला नाही . आपल्या बुद्धीने अर्थ काढत बसलो . तुळजा बाईंनी मायेने पोराच्या डोक्यावरून हात फिरवला .
” पोरा कुठं जायची गरज नाही . मी बोलते ह्यांच्याशी . एकुलता एक आहेस तू ! हे सगळं तुझंच आहे . काळजी करू नकोस . झोप आता . “
➣➣➣➣➣➣
{ ४ }
सकाळ झाली तरी रामदास शेठ परत आले नाहीत .
” पोरा ,अरे कुठे गेले हे ? काहीच समजत नाही . “
” आई सोबत कुणी होतं का ? ”
“हो सखा गेला होता त्यांच्या सोबत ,पण तो ही आला नाही … “
तेवढ्यात समोरून कुणीतरी पळत आलं ,
” प्रभाकर काय झालं ? “
” दिवा …. घात झाला ! “
” अरे काय झालं …. ” तुळजाबाईची ,धडधड वाढली .
” मालकांवर कुणीतरी हल्ला केला रात्री ! तिकडं मळ्यात धड आणि मुंडकं वेगळं पडलंय . आणि सखा ….. “
” त्याचं काय ..? “
” त्याला झाडाला उलटं टांगलंय , डोळे काढलेत त्याचे ! तो ही मेलाय ! “
” काय …. ?”
दिवाकर अंतर्बाह्य थरारला . लगेच प्रभाकर सोबत रवाना झाला . सोबत चार पाच लोक आले . गाव जमा व्हायला वेळ लागला नाही .
अगोदर तर तुळजाबाई सुन्न झाल्या नंतर त्यांनी हंबरडा फोडला .
त्यांचा आवाज ऐकून शारदा ची झोप चाळवली . रात्री उशीर झाल्याने तिला जाग आली नाही सकाळी .
ती धावत बाहेर आली .
” आई ,काय झालं …?”
” पोरी ,….. तुझ्या बापाला कुणीतरी मारून टाकलं ! ….. “
” कुणी सांगितलं ?”
” प्रभा आला होता . सखाचे तर डोळे काढून उलटा टांगलाय म्हणे . आणि तुझ्या बापाचं मुंडकं ….. ” त्यांना पुढे बोलवेना . त्यांना भोवळ आली आणि त्या एका बाजूला कोलमडल्या .
” आई ,आजीला काय झालं ?”
लक्ष्मण ने शारदा ला जवळ येत विचारलं .
” थोडं पाणी आणतोस का ? आजीला चक्कर आलीय . “
लक्ष्मण धावत जाऊन पाणी घेऊन आला . शारदाने पाण्याचे सपके आईच्या तोंडावर मारले ,तशी ती उठून बसली . थोडं पाणी पाजलं .. शारदाच्या डोळ्यात आसवांनी गर्दी केली होती . पण रडण्यासारखी परिस्थिती नव्हती . धीर धरणं गरजेचं होतं . दिवाकर ला काय वाटलं असेल ? तरी तो लगेच तिकडे गेला ना ! आपल्याला ही आईला सावरायला हवं .
” आई ,शांत हो ! धीर धर ! नक्कीच काही भयानक घडलंय ! आबांनी काल एकटं नव्हतं जायला पाहिजे . खरं म्हणजे जायचंच नव्हतं . ….. ”
आता या बोलण्याला काही अर्थ राहिला नव्हता . जे घडलं ते भयानक होतं ! इतका तिरस्कार ? इतका ? बरं आबांचा काही कारणास्तव असू शकतो ! पण सखा ? त्याने असं काय केलं असेल की त्याला एवढी भयानक शिक्षा मिळावी ?”
वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता .
➣➣➣➣➣➣➣
{ ५ }
दिवाकर गावकऱ्यांसोबत मळ्यात पोहोचला . समोरचं दृश्य भयानक होतं ! दिवाकर वडिलांच्या प्रेताकडे धावला आणि धडाला बिलगून रडू लागला .एका ने आबांचं मुंडकं आणलं आणि धडा जवळ ठेवलं तसा दिवाकर बाजूला झाला .
” आबा …. आबा …. “
तो मुंडक्याच्या केसावरुन हात फिरवू लागला .
दोन जणांनी चढून सखा चं प्रेत खाली काढलं . त्याची ही बायका पोरं रडत होती . सारा गाव सुन्न झाला होता . कुणी केलं असेल हे सगळं ? आणि कळालं कस नाही कुणाला ? आवाज ही आला नसेल आजू बाजूच्यांना ? की जाणून बुजून दुर्लक्ष केलं गेलं ? की घाबरून कुणी विरोधच केला नाही .
“अरे सांगा ना …. सांगा ना कुणी केलं … तुमचा अन्नदाता मारला गेला ,तुम्हाला काहीच कसं वाटत नाही ? काही लागलं की माझ्या बापा पुढे हात पसरायचात ना ? मग आता का धाड भरली सगळ्यांना ? ….. “
काही उपयोग नव्हता . पालथ्या घड्यावर पाणी ! कुणी काही बोलणार नव्हतं ! सावकार मेला होता ,काही जणांचा जीव भांड्यात पडला होता . बहुतेक असाच कुणी तरी घात केला होता आबांचा … पण आबा नी तर कधी कुणाला त्रास दिला नाही . मग …..
उत्तर नव्हतं … सध्यातरी नव्हतं . पोलीस पाटील आले , पंचनामा झाला . त्यांनी दिवाकरचं सांत्वन केलं . लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावायचं वचन दिलं .
प्रेत घरी आणलं गेलं तसा पुन्हा तुळजाबाईनी टाहो फोडला . बापाची अवस्था पाहून शारदा ला ही रडू कोसळलं .
लक्ष्मण रडवेल्या तोंडाने कोपऱ्यात उभा होता . त्याला ही कळत नव्हतं हे नेमकं काय झालं ते ! पण त्याला एक समजत नव्हतं ,ती बाई ही रडत होती ,जी त्या मुला सोबत त्या घरात वावरत होती .
” आई , त्या मावशी पण रडतायेत ! “
शारदा रडणं विसरून भांबावली . लक्ष्मणच्या बोलण्याने आजू बाजूला पाहू लागली . तिने नकळतपणे लक्ष्मण ला जवळ ओढलं .
तिथे कुणी ही दिसलं नाही तिला .
” बाळा ,आपण लवकरच जाऊ इथून , तू घाबरू नकोस . “
” आई ,मी नाही घाबरत ! तू घाबरू नकोस ! “
लक्ष्मण च्या वडिलांना लक्ष्मीकांत सहस्त्रबुद्धे ना निरोप गेला होता . थोड्या वेळात ते ही पोहोचले . अंत्यसंस्कार झाले . तुळजाबाई खांबाला टेकून शांत बसल्या होत्या . रडून रडून त्यांचा चेहेरा सुजला होता .
अचानक होत्या चं नव्हतं झालं होतं . आयुष्याला कलाटणी मिळाली होती . सर्व जबाबदारी आपसूकच दिवाकर वर येऊन पडली होती . आज वर मागून ही कोणती जबाबदारी मिळाली नव्हती . आणि आज …..
तो ही भांबावला होता . डोकं सुन्न झालं होतं . सुरुवात कुठून करावी कळत नव्हतं . अगोदर व्यवहार बघावा ,वसुली बघावी ,थकबाकी बघावी की आबांच्या खुन्याचा शोध घ्यावा ,तपास लावावा ते कळत नव्हतं . तपास लावायचा म्हणजे त्यासाठी नेमकं काय करायचं हेच त्याला कळत नव्हतं .
➣➣➣➣➣➣
{ ६ }
दोन तीन दिवस विचार करण्यात गेले . आणि लक्ष्मीकांत जायला निघाले . शारदा मागे थांबणार होती . दिवस कार्य होईपर्यंत . पण ती लक्ष्मण ला इथे थांबू द्यायला तयार नव्हती .
” अहो ,याला तुम्ही सोबत घेऊन जा ना ….”
” शारदा अगं तुझ्या शिवाय कसा राहील तो ? तुला माहितीय तुझ्या शिवाय तो दोन मिनिट ही राहत नाही . “
” अहो पण इथलं वातावरण भयावह आहे . त्यात त्याला या घरात एक बाई आणि मूल दिसलं . ज्याचा आईला भास व्हायचा . कुणी जवळपास वावरतंय असं जाणवायचं . त्यावर याने शिक्का मोर्तब केलं की एक बाई आणि लहान मूल इथे मदत मागायला येते म्हणून . इथेच वावरते म्हणून ! “
” शारदा ,हा काय मूर्खपणा …. ?”
” तुम्हाला ही असंच वाटतं ना ,तुम्ही त्यालाच विचारा …. “
“लक्ष्मणा ,आई काय म्हणते ते खरं आहे ? “
” काय बाबा ? “
” तुला कोण दिसतं तथे ? म्हणजे घरच्या लोकां व्यतिरिक्त इथे अजून कुणी राहतं का ?”
” बाबा ,एक बाई येते लहान मुलाला घेऊन ,खायला मागते . कधी कधी घरभर फिरते . शोधत असते काहीतरी … कधी बाहेर निघून जाते . मामा असला की एकटक त्याच्याकडे बघत असते . “
तुळजाबाई सर्व ऐकत होत्या .
” जावई बापू ,मी काय म्हणते ,लेकराला घेऊन जा . नाहीतर शारदा असं कर ,तू ही जा .दिवस कार्याला ये . ”
” आई .अगं काहीही काय ? तुम्हाला असं सोडून जाईन मी ? मी नाही जाणार … दिवाकरची अवस्था बघवत नाही . पोरगा पुरता गांगरून गेलाय . त्याला काय करू काय नको तेच कळत नाहीए . अहो ,तुम्ही जरा बोला ना त्याच्याशी . ….. “
” अगं ,मी काय बोलणार ? तो आज पर्यंत कधी माझ्याशी मन मोकळा बोललाय का ? त्याला नाही आवडणार . आणि असं ही त्याला जाबदारीची सवय नाही . त्याच्यावर कधी जबाबदारी टाकली नाही . त्याला कामाची सवय नाही .त्याचा निभाव कसा लागेल ? “
” मी काय म्हणते ? एकदा बसून बोला तर खरं ! नाहीतर थोडे दिवस तुम्ही लक्ष घाला . थोडी गाडी रुळावर आली की पुढे बघेल तो … “
शारदा काय सांगायचं प्रयत्न करतेय ते दोघे विचार करत होते म्हणजे तुळजाबाई आणि लक्ष्मीकांत . ही असं का सांगतेय तुम्ही लक्ष घाला म्हणून … हिला खरंच भावाची काळजी आहे की सर्व व्यवहार आपल्या हातात घेऊ पहाते आहे ,की खरंच भावाची ,आईची काळजी आहे म्हणून बोलतेय . …. बरं बोलायची सोय नाही . हीचा स्वभाव बापासारखाच ……
” आणि माझा धंदा कोण सांभाळणार ..?”
” आपलं काम सांभाळायला देशपांडे काका आहेत ना … थोडे दिवस ते सांभाळतील . तुम्ही सांगितलं तर नाही म्हणणार नाहीत ते …. “
” अगं आपलं काम धंदा असा दुसऱ्यावर सोडतात का ? उद्या काही कमी जास्त झालं मग ? आणि दहा मिनिटांपूर्वी तू याला सोबत घेऊन जायला सांगत होतीस ,आता थांबायला सांगतेस . काही विचारपूर्वक बोलतेस की मनात येईल ते …. “
तेवढ्यात दिवाकर आला . त्याचा चेहेरा पाहून लक्ष्मीकांत ला गहिवरून आलं . तो जवळपास पाच -सहा वर्षांनी प्रौढ झाल्या सारखा वाटत होता .
दाढी वाढलेली ,केस वाढलेले … विस्कटलेले … ढगळ कपडे ,उदास चेहेरा ….
” दिवाकर …. अरे काय अवस्था करून घेतलीस ? सांभाळ स्वतःला ! ”
दिवाकर च्या डोळ्यात पाणी तरळलं . तसा लक्ष्मीकांत त्याच्या जवळ गेला . त्याची पाठ थोपटून सांत्वन केलं . तसा दिवाकर लहान मुलासारखा त्याला बिलगला . आणि रडायला लागला .
” पंत …. पंत बाबा गेले हो …. ! मला पोरकं करून गेले …. “
” हे बघ ,धीर धर ! रडू नकोस ! मी आहे ना ,सांग … हे सगळं नेमकं कसं घडलं ते … “
” पंत ,काहीच समजत नाहीये . कुणी सांगणारा ही पुढे येत नाहीये . “
” बरं ,पोलीस काय म्हणतात ?”
” काय म्हणणार ? एक ही साक्षीदार पुढे येत नाही म्हणे ! “
” बरं ,पाटलांशी बोललास का ? की मी बोलू ?”
” पंत ते मदत करणार नाहीत . आबांचा आणि त्यांचा छत्तीसचा आकडा होता . “
” मग कसं कळणार काय झालं ते ? बरं व्यवहार तरी तुला माहित आहेत का ? ”
” नाही ना ,आबांना मी किती वेळा सांगितलं की मला ही काही करूद्या म्हणून …. त्यांचं एकाच उत्तर .. मी जिवंत आहे ना अजून …. ”
” काही लिखापढी केलेल्या नोंदी बघितल्यास ? “
” पंत सर्वच्या सर्व गायब आहे . एक ही वही मागे सोडलेली नाही !”
” अरे कसं शक्य आहे ? सावकारी तर घरातूनच चालायची ना ? मग वह्या घरातच असायला हव्यात . घरात शोधल्यास ?”
” शोधल्या पण ….. “
“पण काय …?”
” घरात सारखं आपल्यावर कुणी लक्ष ठेऊन आहे असं वाटतं …. आणि लक्ष्मण सांगतो तशी मला ही एक दोनदा एक बाई आढळली पण नंतर नाही …. ”
” तुला कधी दिसली होती ?”
” नेमकं आठवत नाही ,पण बरेच दिवस झाले . “
” आणि आता … “
” म्हणजे ?”
” अरे आता कुणी दिसतं का घरात ?”
” नाही ! फक्त प्रचंड दडपण येतं मनावर ,शरीरावर , आपल्या मागे कुणी आहे असं स्पष्ट जाणवतं …. “
” आत्ता ही … ?”
” अं …. ? नाही असं नाही सांगता येणार ! ”
” मग यातून मार्ग कसा काढणार ?”
” तेच तर कोडं होऊन बसलंय ….. “
” मामा …. या मावशी मदत करतील आपल्याला … “
सर्व जण उडालेच !
लक्ष्मण पण इथं जवळ आहे याचा कुणी विचारच केला नव्हता .
” कोण मावशी ?”
” या बघा ,या इथे उभ्या आहेत . मावशी मदत कराल ना … “
” बाळा ,कुणाशी बोलतोयस ? कुणी नाही तिथे …. ” शारदा विचारू लागली .
” लक्ष्मण ,चल इथून ! शारदा तू म्हणतेस ते खरं आहे ,मी याला सोबत नेतो आणि एखाद्या डॉक्टरला दाखवतो . नाहीतर पोरगं हातचं जाईल ! “
” आहो काय बोलताय ? तो काय वेडाय का ?”
” ते तर डॉक्टरच सांगेल ! आणि एक सांगू ,याला तूच जबाबदार आहेस ! उठ सुठ माहेरी येतेस . इथलं वातावरण वेगळं ,आपल्या इथलं वातावरण वेगळं ! त्याचाच हा परिणाम आहे ! “
लक्ष्मीकांत ने क्षण ही वाया घालवला नाही ! तो लक्ष्मण ला घेऊन तडक निघाला , कार काढली आणि बायकोला विचारलं ,
” तुझं काय ? येतेस की थांबतेस ?”
शारदा ने उत्तर दिलं नाही . लक्ष्मीकांत सरळ कार घेऊन निघून गेला . तो तर गेला ,पण जे मागे राहिलं होतं ते असं जाणार होतं ? की त्याचं काही घेणं होतं …….
➣➣➣➣➣
{ इथं पर्यंत – ७३१५ शब्द आणि ३६११३ अक्षरं MS वर्ड स्टेटमेंट मध्ये ६४ पाने झाली }
{ ७ }
लक्ष्मीकांत तासाभरात शहापुरात पोहोचला . रस्त्याने येता येता त्याने फॅमिली डॉक्टर ला सांगितलं होतं . डॉक्टर मांडगे क्लिनिक वर पोहोचले . याचीच वाट बघत होते .
” ये रे , ये बाळा … कसा आहेस … ?” डॉ . मांडगे नी दोघांचं स्वागत केलं .
” डॉक्टर …. ” लक्ष्मीकांत ने थोडक्यात सांगितलं . डॉ . गंभीर पणे म्हणाले ,
” हे बघ लक्ष्मीकांत ,एवढं पॅनिक होण्यासारखं काही नाही . लहान आहे तो अजून . वातावरणामुळे वाहवत गेला असेल . तसा हा इतर वेळी काय करतो ? “
” म्हणजे ?”
” अरे घरी असतो तेव्हा काय करतो ?”
” डॉ . काय करणार तो ? काही तरी खेळत असतो . “
” अरे हो . पण काय खेळतो ?”
” माहित नाही . कधी लक्ष दिलं नाही . “
” कमाल ए बाबा तुझी ! एकुलता एक पोरगा ,आणि तरी ही .. “
” डॉ . काय झालंय नीट सांगाल का ?”
लक्ष्मीकांत ला डॉक्टरचं म्हणणं पटलं नाही . यांना एखाद्या मानसिक तज्ज्ञांचा रेफरन्स विचारला तर … ? नकोच याना अजून वेगळं वाटेल . आपण बघू ….
” ठीक ए डॉक्टर ! येतो आम्ही ! ” त्यांची फी देऊन दोघे बाहेर आले . लक्ष्मीकांत विचित्र नजरेने लक्ष्मण कडे पाहत होता . काम धंदा सोडून रिकामी ब्याद मागे लागली म्हणून !
ते कार मध्ये बसले . लक्ष्मीकांत ला काही आठवलं .
” बाळा ,बस दोन मिनिट ,आलो मी . “
एवढं बोलून लक्ष्मीकांत समोरील दुकानात गेला आणि फोन लावला .
” हॅलो ,देशपांडे ,अहो तुमच्या त्या मित्राचा नम्बर द्या ना ….. “
” अहो तो नाही का मानसोपचार तज्ञ ! “
” सर … आज काय अचानक … “
” अहो मलाच हवाय …. देता का … ? “
लक्ष्मीकांत ने डायरीत लिहून घेतला . ” थँक्स ! “
” साहेब तुम्ही केव्हा येणार आहात ?”
” मी आलोय , तास दोन तासात ऑफिसला पोहोचतो .”
एवढं बोलून त्याने फोन कट केला . आणि मिळालेल्या नं . ला फोन केला .
” हॅलो ,….. हो आत्ताची अपॉइंटमेंट पाहिजे . ….. अहो अर्जंट आहे . .. ठीक ए … “
” बाबा ,काय झालंय ? मला बरं नाही का ?”
” नाही रे बाळा … “
” मग आपण दवाखान्यात का आलो ? “
” अरे माझं जरा डोकं दुखतंय …. “
” पण डॉक्टर तर माझं ….. “
” अरे तुला सांगितलं ना डोकं दुखतंय म्हणून , मग जरा शांत बस ना ….. “
लक्ष्मण घाबरून शांत बसला . त्याला आईची आठवण आली आणि रडायला लागला ,
” आता काय झालं ?”
” मला आई कडे जायचंय … ” लक्ष्मीकांत ला कळालं की चिडून काही होणार नाही .
” बाळा जाऊ आपण हो … संध्याकाळी जाऊ . तू काही खातोस का … ?”
त्याने प्रेमाने विचारलं .
” हो …. “
लक्ष्मीकांत ने कार एका हॉटेल समोर लावली .
” चल … “
दोघांनी नाश्ता केला आणि निघाले . मानसोपचार तज्ज्ञ घोडके कडे पोहोचले . आणि वेटिंग ला बसले .
” सहस्त्रबुद्धे … “
रिसेप्शनिस्ट ने आवाज दिला तसे आत कॅबिन ला गेले ….
डॉक्टर अतिशय प्रेमळ आणि हसमुख होते .
” ये बाळा , काय नांव तुझं …. ? ” इतर ही चौकशी केली अगदी सहज ……. आणि बोलता बोलता लक्ष्मीकांत ला दुसऱ्या कॅबिन ला नेलं .
” सिस्टर ,यांचा मुलगा त्या कॅबिन ला आहे ,जरा बघा त्याच्याकडे … “
” येस सर … ”
” हं … बसा . बोला आता .. ” डॉक्टरने लक्ष्मीकांत ला सोफ्यावर बसायची खूण केली .
” काय झालय ?”
लक्ष्मीकांत ने थोडक्यात सांगितलं . तो डॉक्टरांच्या वागण्याने प्रभावित झाला होता . डॉक्टरांनी सर्व शांतपणे ऐकून घेतलं . ” बरं … ठीक ए .. मग तुमचं काय म्हणणं आहे ? तुमचा यावर नक्कीच विश्वास नसेल ?”
” तुमचा आहे …. ? “
” माझा विश्वास आहे की नाही याने काय फरक पडतो ? माझं जे ज्ञान आहे किंवा मी जो अभ्यास केला आहे तो मनाच्या अवस्थेवर ,त्याच्या क्षमतेवर , त्याच्या कार्यशैलीवर ,अगदी अनादी काळापासून माणसाची वैचारिक दिशा ठरलेली आहे . कदाचित तुम्हाला रुचणार नाही ,पटणार नाही . पण तुमच्या मुलाची आंतरिक इच्छा आहे की त्याच्या आईच्या कडेवर बाळ असावं ,जे त्याचं कुणी असेल आणि तो त्याच्याशी समरस होऊ शकेल . तो एकटा जास्त वेळ राहतो का ? ”
” हो ,म्हणजे मी तर बाहेरच असतो . घरात तो ,त्याची आई ,आणि एक मोलकरीण असते ….. “
” आई काय करते त्याची .”
” काही नाही . घर सांभाळते . “
” आणि मुलाला मोलकरीण सांभाळते …. “
” डॉक्टर ,काय बोलताय …?”
” योग्य तेच बोलतोय ! ”
” आता एक करा . त्या मोलकरणीच्या बॅकग्राऊंडची चौकशी करा .नक्कीच काही ना काही सापडेल , शाळेत जात असेल ना ?”
” हो ! पहिल्या वर्गात आहे ! “
” सोडायला कोण जातं ?”
” ती बाईचं सोडायला आणि घ्यायला जाते . ”
” very good ! चला ,आपण आता त्याच्याशी बोलू ….. “
” डॉक्टर ,काही गंभीर समस्या …. “
” चला तर खरं बघुयात …. “
दोघे पहिल्या कॅबिन मध्ये आले .
डॉक्टरनी लक्ष्मण ला एका खुर्चीत बसवलं ,त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला .
” बाळा ,कुठे बाहेर गेला होतास फिरायला …?”
” हो काका , मामाकडे गेलो होतो … “
” मग मजा केली असणार ना ,मामाच्या गावाला …. “
” मजा करायला मिळालीच नाही … “
” का रे ?”
” बाबा वारले माझे …”
” बाप रे .. ? मग तू घाबरला असशील …. ?”
” नाही ,मी नाही पण आजी घाबरत होती घरात ,मला ही म्हणाली की तू इथे पुन्हा येऊ नकोस . आईला ही तेच सांगितलं . “
” का रे ..?”
” तिला भीती वाटायची की तिला कुणी तरी सारखं बघतंय म्हणून …. “
” कोण बघत होतं आजीकडे ? तिला नव्हतं समजत …? ”
” नाही तिला कुणी दिसायची नाही ,फक्त भीती वाटायची … “
” तुला नाही भीती वाटली …? “
” नाही … “
” बरं ,आजी का घाबरत होती …. ?”
” माहित नाही ,पण आजीला मी सांगितलं की तू घाबरू नकोस , ती बाई काही करणार नाही … “
” कोण बाई … ?”
” काका ,त्यांच्या घरात एक बाई होती ,तिच्या कडेवर एक मूल असायचं . ती नेहमी माझ्याकडे खायला मागायची . नाही मिळालं की निघून जायची . नाहीतर कधी कधी घरात फिरायची …. “
” घरात फिरायची ? मग कुणाला दिसली कशी नाही ? “
” मला दिसायची ना .. मी सांगितलं ही त्यांना की त्या बाईला मदत पाहिजे आहे म्हणून . त्यांचा हकनाक बळी गेला म्हणून . …. “
” बाळा ,हे तुला कुणी सांगितलं ..?”
” कुणी नाही …”
” मग तू कुणाचं बोलणं ऐकलं होतंस का … ?’
” नाही काका …. मला माहिती आहे तिला कुणी मारलं ते …. “
” काय …?”
” हो …. “
” लक्ष्मण ,काय बोलतोयस शुद्धीवर आहेस का .. ?” लक्ष्मीकांत कडाडला . त्याला हे सगळं सहन होत नव्हतं . आधीच धंद्याचे बारा वाजले होते ,पैसा पुरत नव्हता . बरं घरात सांगायची सोय नव्हती . एक दोनदा शारदा ला सांगितलं ही की वडिलांशी बोल म्हणून … पण ऐकेल तर शपथ ! आणि आता हे …..
” बरं कुणी मारलय तिला ?”
” मला माहित आहे पण मी ओळखत नाही …. “
” तुला कसं समजलं मग …. ?”
लक्ष्मण कडे याचं उत्तर नव्हतं .. एवढंसं पोर ते . थकून गेलं होतं . तेव्हा नाही पण आता घाबरलं .
” मला आईकडे जायचंय …” म्हणून रडायला लागलं ……
” बरं बरं …. जा आईकडे हं . मी सांगतो बाबांना …. “
एवढं बोलून डॉक्टर थांबले . लक्ष्मण ला खाऊ दिला .तसा तो खुश झाला .
” जा बाहेर खेळ जा . मी सांगतो बाबांना … ”
तो उड्या मारत बाहेर गेला .
” साहेब ,हे काही तरी विचित्र घडतंय ! अशी केस मी अजून तरी पाहिलेली नाही . याला एकच पर्याय आहे .तिथे जाऊनच सोक्ष मोक्ष लावणे . एक सांगू ? थोडं विचित्र आहे . पण मला यात इन्व्हॉल्व व्हायला आवडेल . पण तुमची हरकत नसेल तर … “
लक्ष्मीकांत ला काय बोलावं कळेना … त्याच्या डोक्यात वेगळंच कारस्थान शिजत होतं . या संधीचा फायदा घेतला तर …. ? पण नेमकं काय करायचं ते समजत नव्हतं . जर डॉक्टर यात सामील झाला तर आपल्याला काहीच करता येणार नाही . त्यापेक्षा …..
” बघतो .. तुमची मदत लागली तर नक्कीच सांगेन ….. “
एवढं बोलून तो निघाला . बाहेर काउंटर वर फी जमा केली . आणि काही ठरवून पुन्हा काउंटर जवळ आला .
” मॅडम ,एक फोन करायचाय … “
त्यांनी फोन लावला
” हॅलो देशपांडे ,मी महत्वाच्या कामासाठी सात आठ दिवस गावी जात आहे , तुम्ही जरा लक्ष द्याल का …?”
अहो साहेब पण तुम्ही येणार होतात ना ? गोष्टी हात बाहेर चालल्या आहेत . वेळीच आवर नाही घातला तर अनर्थ होईल … “
” देशपांडे ,ते मला ही कळतंय ,पण इकडे वेगळीच समस्या उभी राहिलीय . आणि प्रश्न माझ्या मुलाचा आहे . त्यामुळे मला अगोदर ते महत्वाचं आहे . बघा जमलं तर ,नाहीतर मी आहेच . …” एवढं बोलून त्याने फोन कट केला .
त्याच्या चेहेऱ्यावर नवीन चकाकी आली होती . सकाळी ताण वाटणारा मुलगा आता त्याच्यासाठी संधी वाटत होता . हीच वेळ आहे ,या सगळ्यातून बाहेर पडण्याची . त्याने मनोमन मुलाचे आभार मानले .
” बाळा चल…. “
बाबांमधील बदल लक्ष्मण च्या ही लक्षात आला . पण का ते कळालं नाही .
” बाबा ,मला काय झालंय …?”
” बाळा ,मला ही तीच काळजी होती . पण डॉक्टरांनी सांगितलं की काळजी करण्याचं कारण नाही . तेव्हा माझा जीव भांड्यात पडला . आता आपण तुझ्या आईकडे जाऊ ,मामाकडे काही दिवस राहू . तुला आवडेल ना … ? “
“पण माझी एक अट आहे . “
” म्हणजे ..?”
” तू माझ्यासोबत राहायचं ….. “
” आणि काय करायचं … ?”
” मी सांगेन ते करशील …?”
लक्ष्मण ला काही कळत नव्हतं . पण बाबा खुश आहेत हे त्याला समजलं होतं . आता त्याला बाबाची भीती वाटत नव्हती . दोघे गप्पा मारत ,मस्ती करत पुन्हा मामाच्या गावाला पोहोचले . ….. तोवर संध्याकाळ झाली होती …
➣➣➣➣➣➣➣
{ ८ }
घरी पोहोचताच शारदा ने पोहे केले . लक्ष्मीकांत ला दिले , लक्ष्मण ला खाऊ घालायला लागली . दोघे ही आनंदात आहेत हे बघून तिला आश्चर्य वाटत होतं . असं काय घडलं नेमकं .. ? काही समजायला मार्ग नव्हता . तिने लक्ष्मीकांत साठी चहा ठेऊन दिला .
चहा झाल्यावर तिने विषय काढला . मला जरा बोलायचं होतं . दोघे बाहेर अंगणात आले .
” काय झालं … ?”
लक्ष्मीकांत च्या चेहेऱ्यावरील भाव बदलले .
” मला एक समजत नाही की तुम्ही दोघे आलात तेव्हा एकदम खुश होतात . मग मी विचारल्यावर काय धाड भरली ! “त्याने गंभीर चेहेऱ्याने सर्व काही सांगितलं .
” मी खुश होतो कारण डॉक्टरांनी लक्ष्मण नॉर्मल असल्याचं सांगितलं . आणि गंभीर यासाठी झालो की परिस्थिती खरोखर गंभीर आहे . हे बघ , लक्ष्मण ने जे बघितलं ते खरं असावं असं डॉक्टरांचं म्हणणं आहे . फक्त त्याला ते कसं समजतं हाच प्रश्न आहे आणि त्याचा शोध घेण्यासाठीच मी परत आलोय इथे . हे बघ आपल्यातलं भांडण इथे काढू नकोस . जरा तोंडाला आवर घालून राहा .
काही करता आलं तर आपण आपल्या संकटातुन सुटू शकतो . पण तुझी मदत लागेल , नाही म्हणू नकोस ! “
” म्हणजे नेमकं काय करणार आहात …?”
” हे बघ ,आबांनी भरपूर पैसे लोकांना वाटले होते . ते असे ही बुडालेच आहेत . आणि आपण ही बुडतो आहोत . आपल्याला जर त्या पैशांचा आधार मिळाला तर आपण ही मोकळे होऊ . आणि दिवाकर ला ही मदत होईल . तुझ्या आईची काळजी कमी होईल . सर्व नीट झाल्यावर दिवाकरचं लग्न लावून देऊ . आणि आपण परत जाऊ आपल्या घरी तोवर …… “
लक्ष्मीकांत ने आपले शब्द आवरते घेतले . त्याला बायकोचा स्वभाव माहित होता . आणि त्याने जे काही सांगितलं त्यात काही चुकीचं ही नव्हतं . ते पैसे असे ही बुडणार होते . शारदा ही नवऱ्याला ओळखून होती . त्याच्या क्षमतेवर तिला संशय नव्हता . आणि धंद्यातील उतरचढ ती ही समजू शकत होती . त्यात लक्ष्मीकांत ची काही चूक नव्हती . त्यामुळे तिने जरा नमतं घेतलं .
अर्थात तिला लक्ष्मीकांत च्या मनातील हेतू कळलाच नव्हता . जर समजला असता तर तिने कधीही मान्य केलं नसतं …….
” ठीक आहे ! पण जे कराल ते काळजीपूर्वक करा ! हे गाव आहे ,शहर नाही ! नाहीतर कुठे गायब व्हाल ते कुणालाही कळणार नाही ! इथे मित्रांपेक्षा शत्रूच जास्त आहेत . हो अन त्या पाटला पासून लांब राहा . महा धूर्त आहे तो ! मला तर वाटतंय त्यानेच काही केलंय … “
” बरं ,फक्त एक करायचं ! लक्ष्मण ला मी माझ्या सोबत ठेवणार आहे . कायम …”
” कशाला …?”
” सांगीन नंतर …. ती बाई कोण आहे ते बघावं लागेल …”
” तुम्ही कसं शोधणार ते …?”
” तुझ्याकडे काही पर्याय आहे …?”
” आईशी बोलते मी … इथे एक बाई राहते तिला यातील माहिती आहे …. “
” अगं तुझ्या आईला माहित असतं तर तिने अगोदरच काही केलं असतं ना ! आणि आता रिकामे उद्योग करू नकोस . मला माझ्या पद्धतीने करू दे . नाही तर सगळं मुसळ केरात जाईल . …. “
शारदा ला ही तिचा संसार प्रिय होता . नवऱ्यावर प्रेम होतं . फक्त दाखवत नव्हती . मुलगा तर जीव की प्राण होता ….
” बरं .. पुढच्या प्लांनिंग चं काय …? ” लक्ष्मीकांत ने डोळे मिचकावत विचारलं .
” कसलं प्लांनिंग ..?”
” दुसऱ्या बाळाचं … ?”
” गप बसा ! इथे आहे त्याचे वांधे झालेत , अगोदर हे निस्तारा ,मग बघू …. “
” बरं ,बाईसाहेब … जशी तुमची आज्ञा …. ” लक्ष्मीकांत नाटकीपणे म्हणाला .
पण शारदा च्या डोक्यात काही वेगळंच चालू होतं … जे लक्ष्मीकांत ला या जन्मात तरी कळणं शक्य नव्हतं …..
दोघे घरात आले . तुळजाबाई अजून ही एका कोपऱ्यात शांत बसल्या होत्या . मधेच कुणी गावातल्या बाया भेटायला यायच्या ,रड बोंबल व्हायची आणि पुन्हा शांतता . त्यामुळे घरातील कामे शारदाच आवरत होती . ती घरात येऊन स्वयंपाकाला लागली .
” मी जरा बाहेर जाऊन येतो ..”
” आता रात्रीचं कुठे फिरू नका . सकाळी जा . दिवाकर ही घरी नाहीए . व्हरांड्यात बसा ,तो येईलच . तोवर माझा ही स्वयंपाक होईल …. “
ऐकावच लागणार ,बायकोचं ऐकावंच लागणार , पण थोडे दिवस …. एकदा का …….
तो विचार करत व्हरांड्यात बसला .
कुणीतरी समोरून येताना दिसलं . त्याच्या ओळखीचं नव्हतं ,पण समोरचा ओळखत असावा .
” दाजी , दिवाकर आहे का …. ?”
” बहुतेक नाही …. मी ही आत्ताच आलो . तू ….. “
” मी राजेश , दिवाकरचा मित्र … “
” राजेश ,अरे ये ,बस ना … अगं ….. ” त्याने शारदाला आवाज दिला .
शारदा आली .
” काय झालं ..?”
” अगं दिवाकर नाही ए ना घरात … ?”
” नाही शहरात गेलाय . रात्री येईल . राजेश ,काय म्हणतोस ?”
” ताई ,दिवाकर कडे थोडं काम होतं …?”
” काय रे …. ?”
” नाही ,काही नाही … थोडे पैसे हवे होते . …. “
” पैसे …? तो कुठून देणार ? अरे बाबांनी दिलेले पैसे परत मिळायची बोंब झालीय. तुला काही कल्पना आहे का रे …?”
” कसली ..? “
” बाबांनी पैसे कुणाला दिले असतील ते …?”
” नाही बुवा …. पण दिवाकरला माहित आहे …! ”
” बरं मी सांगते त्याला ,चहा घेतोस …?”
” नाही नको . जेवण करायचंय आता ,येतो मी …. “
” येत जा रे …. “
” हो …. “
तो गेला .
दोघांनी एकमेकांकडे बघितलं .
” शारदा ….. “
शारदाने लक्ष्मीकांतला शांत राहायची खूण केली .
” तुळजे … काळजी घे …”
एक म्हातारी घरातून निघत होती ,आईला समजावत होती .
” जास्त रड रड चांगली नाही ,पोराचं लग्न व्हायचंय अजून . त्याचा संसार बघायचाय . थोडा धीर धर . शारदे आहेस ना अजून दोन चार दिवस ..? आईची काळजी घे … काही समजलं का गं .. कसं झालं ,काय झालं ते …?”
” नाही ना अजून काहीच समजलं नाही आजी .. कुणी केलं असेल काय माहित …?”
” बरं सांभाळून राहा आणि दिवाकर ला ही सांगा ,रात्री अपरात्रीचं बाहेर फिरत जाऊ नकोस म्हणून … “
लक्ष्मण खांबाला टेकून उभा होता ,कुणाशी तरी बोलत असल्यासारखा ….
शारदेच्या काळजात धस्स झालं !
” हा कुणाशी बोलतोय गं …? “
” लक्ष्मण ,काय चाललंय …. ?”
” आई ती दीदी मला सोबत यायचं म्हणते . आमच्या घरी चल म्हणे …. “
“काय …?कोण दीदी ..?”
” ती बघ चालली ,मी नाही सांगितलं तर रुसली ती . ..”
” बाळा ,कुणी ही नाहीए ! काय चाललंय तुझं …. “
” आजी ,हेच चाललंय ,वर्ष ,सहा महिने झाले ,घरात कुणी तरी असतं पण दिसत नाही . एकटी असले की प्रचंड घाबरायला होतं . आपल्या मागे कुणी आहे असं सारखं वाटतं …”
” अगं मग बोलली नाहीस कधी ..?”
” काय बोलणार ? यांना सांगितलं एक दोनदा … तर मला वेड लागलंय म्हणाले … ! “
” म्हणजे तुला कुणी तरी आहे असं वाटतं पण तुझ्या घरच्यांना नाही हेच ना ? मग आता हा पोरगा कुणाशी बोलत होता …? का रे बाळा … कोण होतं …?”
” आजी ती दीदी होती … गेली ती … “
“अजून कोण आहे …?”
” ती मावशी मागच्या खोलीत बसलीय …. “
” काय …?”
शारदाला दरदरून घाम फुटला . तुळजाबाईला धड धडायला लागलं …
” पण ती मावशी आज एकटी आहे ,तो बाळा नाही तिच्यासोबत .. “
शारदा ला प्रचंड संताप आला .
तिने लक्ष्मण चा हात धरला आणि आत नेऊ लागली ओढत …
” चल ,दाखव कोण आहे ते … चल … सांग कुठेय ते .. “
” ती बघ तिथे बसलीय .. “
” लक्ष्मण ,मूर्खपणा बंद कर … तिथे कुणीही नाही …. “
तिच्या मागे आवाज देत सर्व जण आत आले ,
” शारदे ,काय हा मूर्खपणा .. ” एवढ्याशा पोरावर राग काय काढतेस ..? सोड त्याला …. “
” बाळा ,चल … हात पाय धू मी जेवायला देते तुला , शारदा चल ,जावई बापूना ही वाढ …. “
शारदा पाय आपटत स्वयंपाक घरात गेली आणि दोघांना वाढलं …
” अहो काय घेता …?”
” नाही …. झालं माझं … शारदा … आता काय करायचं …. ?”
उत्तर तर शारदा कडे ही नव्हतं .
” तुळजे ,हे काही भयंकर आहे बघ . तू लवकर सांगायला पाहिजे होतं ! भुताटकी आहे तुझ्या घरात ,त्याचा बंदोबस्त तर करावा लागेल ना ! अगं त्या भगताला एकदा सांगितलं असतं तरी काम झालं असतं ! कशाला त्रास काढत बसलीस .. “
” आजी तो भगत काय करेल ?”
” काय करेल ते माहित नाही पण तुमचा त्रास तर कमी झाला असता ना , एवढंसं पोरगं धरलय त्या सटवी नं … तुला कळत कसं नाही …? माझं ऐक .. आत्ताच्या आता त्या भगताला बोलाव ! “
” आजी ,आत्ता कोण जाईल ? दिवाकर ही घरी नाही … जावई माणसाला कसं बाहेर पाठवणार ….. सुधाकर आला की सांगते मी …. “
” बरं बघ बाई .. नाहीतर असं कर ..आपण दोघी जाऊ …. ती बया घरात ठाण मांडून बसलीय ,तिला बाहेर काढावच लागेल . नाहीतर काहीबी होऊ शकतं माय …”
आजीची तडफड तुळजा ला समजत होती …. पण आपण घराबाहेर कसं पडणार…. आत्ताच यांचं ….. “
आजी निघून गेली … तुळजा विचार करत राहिली ….
➣➣➣➣➣➣
{ ९ }
ती रात्र तशीच गेली . कुणाच्या डोळयाला डोळा लागला नाही . दिवाकर आला नव्हता . रात्रीचं कुठे बघावं त्याला ? तुळजाबाई धास्तावल्या . मुलाचं काही ….
वेगवेगळे विचार डोक्यात येत होते अशातच पहाट झाली आणि तुळजाबाई उठल्या .
” शारदे उठ … पोरगं आलं नाही रात्री … कुठे बघावं त्याला … ?”
” आई काळजी करू नकोस . येईल तो …. “
” पोरी ,चल ,आपण जरा बाहेर जाऊन येऊ … “
” आई ,कुठे जायचंय ..”
” चल …”
“आणि लक्ष्मण ..?”
” जावई बापुना सांग ,ते सांभाळतील आपण येई पर्यंत … ”
तुळजाबाई हळू आवाजात कुजबुज करत होत्या . त्यांच्या आवाजात निर्धार होता . शारदेला नाही म्हणता आलं नाही .
तिने लक्ष्मीकांत ला उठवलं ,
” अहो ..”
” काय …. गं ….? ”
” आम्ही जरा बाहेर जातोय ! बाळाकडे लक्ष द्या . “
” एवढ्या सकाळी …. “
” हो … आलोच आम्ही …. दिवाकर अजून आलेला नाही . ”
शारदाला काळजी वाटत होती आणि भीतीही . काही वाईट बातमी नको यायला …. पण ती काही बोलली नाही .
दोघी हळूच बाहेर पडल्या . लक्ष्मीकांत ने दार लावून घेतलं . आणि पलंगावर लक्ष्मण जवळ आडवा झाला . त्याच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवला . तशी लक्ष्मणाची झोप चाळवली . पण तो उठला नाही ….. काही क्षण असेच गेले आणि ….. लक्ष्मीकांत च्या अंगावर सरसरून काटा आला ….
” कोण …?” आपल्या अगदी जवळ कुणी आहे याची त्याला स्पष्ट जाणीव झाली . एक तर दिव्याचा अंधुक प्रकाश . त्यात घरातील वातावरण अगदी गूढ वाटत होतं .
त्याने दचकून विचारलं आणि चारी बाजूला पाहिलं . कुणी दिसलं नाही .
‘आपण कसे विसरलो …… ? ‘
तो कसाबसा दारापर्यंत पोहोचला आणि दरवाजा उघडला ….पुन्हा लक्ष्मण जवळ येऊन त्याला उचललं आणि बाहेर जाऊ लागला …. पण दरवाजा धाडकन बंद झाला !
” कोण ए … ?”
तो जोरात ओरडला ,तसा लक्ष्मण उठला . आणि त्याच्या कडे वरून खाली उतरला .
” बाबा … “
” बाळा अरे …… “
” बाबा काय झालं …?”
” अरे इथे आहे कोणी तरी . …. “
लक्ष्मणाने सभोवार बघितलं . पलंगाच्या एका कोपऱ्यात ती होती . ती ही घाबरलेली आणि लक्ष्मीकांत ही घाबरलेला …..
” बाबा ,घाबरू नका . ती मावशी ही घाबरलेली आहे . मावशी काय झालं ?”
काही क्षण घरात भयाण शांतता पसरली ….. नंतर लक्ष्मण म्हणाला ,
” बाबा ,त्या मावशीला मदत पाहिजे तुमची , दिवाकर मामा मदत करू शकत नाही म्हणते ….. “
” मी काय मदत करणार … ? आणि कुणी नाईच ए त मदत कुणाला करायची ..?”
” बाबा ,कुणी नाही मग घाबरता कशाला ….?”
एवढा सुज्ञ प्रश्न लक्ष्मणाच्या तोंडून ऐकून लक्ष्मीकांत गार झाला .
” अरे कुणी नाही म्हणजे समोर कुणी आलं तर पाहिजे ! मदत कशी करणार नाहीतर ..?”
” मावशी बाबा म्हणतात समोर ये . तू मला दिसतेस मग त्यांना का दिसत नाहीस …?”
आणि आश्चर्य घडला . त्या गूढ वातावरणात काही बदल व्हायला लागला , इतका की लक्ष्मीकांत च्या मनातील भीती क्षणार्धात निघून गेली . समोर अंधुक प्रकाशात एक आकृती साकार रूप घेत होती ! आणि काही क्षणात ती पूर्ण झाली . समोरील व्यक्तिमत्व बघून लक्ष्मीकांत चकित झाला ! गावातील स्त्री एवढी सुंदर …. तो तिच्या मोहात पडला ….. पण शारदाचा त्याच्यावर एवढा पगडा होता की या क्षणी ही त्याला शारदाची आठवण झाली .
” म्हणजे आता ही सगळ्यांना दिसेल ? तुझ्या आईला ही ….?”
” नाही ! …”
समोरून मादक आवाज आला . अगदी मादक ,मंजुळ …. “
” हे माझं खरं रूप नाही . आणि आवाज ही … तुम्हाला माझं सत्य स्वरूप सहन होणार नाही …. मी काय सांगते ते ऐका …. ”
” इथे पण ऐका …? या सर्व बायांना काय ही घाणेरडी सवय …. ?”
” नाही . मदत तुला हवीय . तू ऐक . तुला मदत करून मला काय मिळेल …. ?”
” हे घर मिळेल ! ही इस्टेट मिळेल . तुला हेच पाहिजे ना … मला ही हेच पाहिजे … तुझ्या सासऱ्याने घरादारासाठी ,पैशासाठी ,माझं कुटुंब संपवलं … मी त्याचं कुटुंब संपवेल …. पण तुझी बायको मध्ये येतेय ,तिला सांग रिकामे उद्योग करू नको . “
” पण मग एवढं घाबरायला काय झालं ?”
” तुझी बायको आणि सासू त्या भगताकडे गेल्या आहेत . तो काहीतरी करून मला इथून बाहेर काढील ! मला जायचं नाही ! मी जर गेले तर तुझ्या पोराला घेऊन जाईन ! “
“काय …? या सगळ्यात माझ्या पोराचा काय संबंध … ?”
” काय संबंध … ? अरे तुझा पोरगा कोण आहे तुला कल्पना नाही ! मी त्याच्या मदतीने मला हवं ते करू शकते ,तू बस बोंबलत ….. “
लक्ष्मीकांत ला स्वतःचीच लाज वाटली .
‘ काय सालं हे आयुष्य ? आपण एवढ्याशा पोरावर अवलंबून आहोत ? काय ही आपली अवस्था ? आणि ही याला घेऊन गेली तर आपण काय करणार ? मग ही याला नेत का नाही ? का थांबलीय ? याचा अर्थ हिला शक्य नाही ! निदान सध्या तरी नाही ! ‘
त्याचे भाव बदलले . निर्धाराने म्हणाला ,
” जा घेऊन त्याला ! काय करायचं कर ,मला फरक पडत नाही ! “
” वेळ येईल तेव्हा घेऊन जाईनच ! राहिली गोष्ट तुझी ,तू सुद्धा तुझ्या सासऱ्यापेक्षा कमी नाहीस . ! तू ही स्वार्थी आहेस ! त्याने ही कधी पोटच्या पोराचा विचार केला नाही ! तू ही करत नाहीस ! मी काय सांगते ते डोकं ठिकाणावर ठेऊन ऐक . तुझ्या बायकोला इथून घेऊन जा . त्या म्हातारीचं काय करायचं ते मी बघते ! आणि हे काम आजच करायचं …”
लक्ष्मीकांत पक्का निर्ढावलेला होता . तो कुत्सितपणे हसला .
” थोडा उशीर केलास तू …. आता ते काय करतात ते बघू . पण तू हे सगळं शारदला सांग ! ती तुझी नक्की मदत करेल ! ती किती स्वार्थी आहे तुला माहित नाही . …. “
समोर जे काही होतं ,ते गोंधळात पडलं !
‘ तिला सांगून काय उपयोग ? ती आपली मदत का करेल ? नाही ! याचीच मदत घेऊ . हा गरजवंत आहे आणि भामटा ही आहे . याच्याशी सरळ वागून चालणार नाही . ‘ ती ही कुत्सितपणे हसत म्हणाली ,
” ठीक ए . मग मी सगळ्यांसमोर येते आणि सांगते माझ्या मनात काय आहे ते ! मला तर फक्त बदला घ्यायचाय ! नाही ऐकलं तर सर्वांना संपवून टाकीन . पण मग तुझं काय ? तू तर असा ही कर्जबाजारी आहेस ! इथे काही नाही मिळालं तर भिकेला लागशील ! बघ विचार कर आणि मला सांग ! ”
ती अदृश्य झाली .
आणि लक्ष्मीकांत विचारात पडला ..
‘ यातलं काही शारदाला सांगावं की नाही ? आपण जरी नाही बोललो तरी हा बोलेलंच ! यालाच बोलू दे . मग बघू ‘
….. ‘
तोवर चांगलंच उजाडलं होतं . लक्ष्मीकांत ला ही आता ताजंतवानं वाटत होतं . आपल्या मुलामध्ये कोणती शक्ती आहे आणि ती आली कुठून याचं त्याला आश्चर्य वाटत होतं ! म्हणजे आपण मुलाचा योग्य वापर केला तर यातून बाहेर पडू शकतो ? शंभर टक्के बाहेर पडू शकतो . पण नेमकं काय आणि कसं करायचं ? क्षणार्धात पुन्हा विचलित झाला . डोकं भणाणलं . चहाची वेळ झाली होती . पण दोघींचा पत्ता नव्हता .
दोघे बाहेर व्हरांड्यात येऊन पायरीवर बसले होते . आणि समोरून दिवाकर येताना दिसला .
‘ हा आला ? म्हणजे जिवंत आहे अजून ! मला वाटलं की हा ही खपला की काय बापासारखा … ! ‘
” दिवाकर ..? अरे काय हे ? काल पासून पत्ता नाही तुझा ! अरे रात्र भर डोळ्याला डोळा नाही आमचा . शारदा आणि तुझी आई भल्या पहाटे घराबाहेर पडले तुझ्या काळजीने … कुठे गेल्यात काय माहित ?”
दिवाकर काही बोलला नाही . तो सरळ घरात गेला . न्हाणी घरात जाऊन हात पाय धुतले . तोंडावर पाणी मारलं . एक भांड घेऊन बाहेर आला . गोठ्यात जाऊन म्हशीजवळ बसला . दूध काढायला . तसा लक्ष्मण जवळ येऊन बसला .
” मामा ,मी काढू ..?”
” जमेल तुला …. ?”
लक्ष्मण ला जमेना .
” हे बघ असं काढायचं … “
दिवाकर त्याचा हात धरून शिकवायला लागला …. दूध काढून झालं .
” पंत ,चहा घेता ना … ? “
लक्ष्मीकांत ला नाही म्हणता आलं नाही …
” अरे मी काय विचारलं ? तू कुठे होतास काल पासून ..?”
” पंत काम होतं जरा ,म्हणून तालुक्याला गेलो होतो . जास्त उशीर झाला त मित्राने येऊ दिलं नाही ..”
” कोण मीत्र ..? मित्र की …. “
” पंत ,पाहुणे आहात ! पाहुण्यासारखे राहा दोन दिवस आणि निघा . माझ्या खाजगी बाबतीत तोंड घालायचं नाही . ”
” असं ! बराच बोलतोस रे ! काल परवा पर्यंत तर काहीच कळत नव्हतं तुला मग अचानक काय झालं …. ?”
” अचानक …. हं …. ! तुमचे ते देशपांडे भेटले होते त्यांनी सांगितलं …. मला … म्हणजे मी ओळखलंच नाही … पण त्यांनी कसं ओळखलं काय माहित ? तुमच्या बद्दल विचारत होते . बाकी चौकशी ही करत होते . तुमच्याशिवाय कामं खोळंबली आहेत तिथे , तुमची वाट बघतायेत ते …. “
” हो ! मी ही जाणारच होतो ,पण तुझ्या बहिणीने आडवलं मला ,म्हणून थांबलो . ती आली की जातो . तुझं वागणं का बदललं ते समजलंय आम्हाला … तुझा मित्र आलं होता काल राजेश , तुझ्याकडे पैसे घ्यायला आला होता … तुझ्याकडे कुठून आले पैसे … त्याने सांगितलं आम्हाला ,तुला माहित आहे म्हणून .. मग आमच्याशी खोटं का बोललास …. ?”
” पंत ,मी पुन्हा सांगतोय ! माझ्या खाजगी बाबीत तोंड खुपसायचं नाही म्हणून ….. “
” खाजगी बाब .. ? अरे सासरा मेलाय माझा … ! मला तर वाटतंय तूच काटा काढलास बापाचा … मी आजवर शांत बसलो होतो .. पण आता नाही … “
” काय करणार तुम्ही …. ?”
दोघांचा आवाज वाढला होता . शारदा आणि तुळजाबाई येत होत्या . यांचा आवाज ऐकून शारदा लगबगीने पुढे आली .
” काय झालं … ? आणि दिवाकर केव्हा आलास ? कुठे होतास रात्र भर …. “
तुळजाबाई हळू हळू येऊन पायरीवर बसल्या .
” का रे बाबा ? कुठे होतास ? काही काळजी आहे की नाही आईची ..?”
” ताई ,चहा ठेवतेस …. ?”
शारदा ने त्याच्या कडून दुधाचं भांडं घेतलं . तिला समजलं की वातावरण तापलंय .
पण आता बोलून फायदा नव्हता . तिच्या भावाला ती ओळखत होती आणि नवऱ्याला ही ! निदान असं तिला वाटत होतं .
तिने लक्ष्मण कडे बघितलं ,
” बाळा चल ,दूध घे . “
लक्ष्मण उड्या मारत तिच्या मागे गेला .
” आई आज मी दूध काढलं … मामासोबत .. “
” हो का …? अरे वा ..? म्हशीने बरा तुला हात लावू दिला …. “
लक्ष्मण ला काही समजलं नाही .
शारदा चुलीवर दूध गरम करू लागली . आणि तिला कुणाची चाहूल लागली पण कुणी दिसलं नाही …
” कोण ?”
” आई मावशी …. ”
” कुठे …. आहे .. ?”
” तुझ्या मागे ..”
” काय …. ?”
शारदा थरारली .
” आई ,मावशी सकाळी पण आली होती . बाबांना घाबरवत होती …. “
” का …? बाबांचा काय संबंध …. ?”
लक्ष्मण कडे याचं उत्तर नव्हतं .
शारदा तशीच लक्ष्मण ला घेऊन बाहेर पळाली .
“आई… ती घरात आहे … ! “
” कोण …. ?”
तुळजाबाई नकळतपणे बोलून गेल्या … पण क्षणात त्यांना अर्थ समजला .
” पोरा ,ही काय ब्याद मागे लागलीय ? हिचा बंदोबस्त कसा करणार …. ? ” बोलत बोलत मध्ये गेले .
पण करणार काय ? समोर त कुणी पाहिजे … दूध ओतू जात होतं . शारदा पटकन पळाली . आणि सांडशीने दूध खाली उतरवलं . काही न बोलता एका कपात लक्ष्मणाला दिलं आणि चहा ठेवला सर्वांसाठी . सर्व जण तिथेच बसले .
चहाच्या धुंद वासाने सर्वांचं मन प्रफुल्लित झालं होतं .कधी एकदा चहा पितो असं झालं होतं . घरात जे कोणी होतं त्याची एव्हाना सर्वांना सवय झाली होती . निदान अजून तरी काही घात पात झाला नव्हता .
दोघींचं भगताकडे जाणं निरर्थक ठरलं होतं . एक तर त्याला किती समजत होतं ते याना समजलं नाही किंवा त्याला नीट सांगता आलं नाही .
तसा ही शारदाचा भगतावर विश्वास नव्हता . आणि तिला हे कोडं एवढ्या सहजा सहजी सुटू द्यायचं नव्हतं . नाहीतर तिच्या हातात काही येणार नाही याची तिला खात्री होती . नवऱ्याचे बारा वाजलेले तिला माहित होते . तिला त्याची नाही पण स्वतःची आणि पोराची काळजी होती . त्यामुळे प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करणं गरजेचं होतं ….
सर्वांनी चहा घेतला आणि शारदाने विषयाला हात घातला .
” अहो ? सकाळी काय झालं ..?”
” कुठे काय ..?”
” कुठे काय म्हणजे ? तिने तुम्हाला घाबरवलं म्हणे ..?”
” कुणी सांगितलं ..?”
” अहो कोण सांगणार ? बाळा ने सांगितलं …. “
” घाबरलो असं नाही पण तुम्ही गेल्यावर मी दार लावलं आणि बाळाजवळ झोपलो पलंगावर , तर जवळ कुणी असल्याचं प्रकर्षाने जाणवलं . तसा दचकून ओरडलो तर हा उठून बसला , त्यानेच सांगितलं की ती बाई माझ्या जवळ आहे ते … बाकी काही नाही … “
लक्ष्मीकांत ने विषय शिताफीने टाळल्यासारखं केलं .
” काय म्हणत होती ..?”
“मला कसं कळणार … ?”
लक्ष्मीकांत ने लक्ष्मणाकडे बघत त्याचा अंदाज घेत सांगितलं . पण लक्ष्मण काही बोलला नाही … तो विषय तिथंच थांबला कारण दिवाकर रागाने लक्ष्मीकांत कडे बघत होता .
” दिवा , काय झालं … ?”
” काय झालं ? या साहेबानाच विचार ! यांचं म्हणणं आहे की आबांना मी संपवलं …. “
” काय .. ?”
शारदा आणि तुळजाबाई एकमेकींकडे पाहायला लागल्या .
” यांना कुणी सांगितलं ..?”
” त्यांना कुणी सांगितलं माहित नाही पण मला तुमचे देशपांडे काल भेटले होते , तिकडे अडचण असताना हे इथे काय करतायेत विचारत होते . मी यांना सांगितलं की तुम्ही आता गेलं तरी चालेल , तर म्हणतात की मी जातच होतो ,तुझ्या बहिणीने थांबवलं …. “
शारदाला अंदाज आला . तिने लगेच नवऱ्याची बाजू घेतली .
” हो बरोबर आहे त्यांचं . मीच सांगितलं होतं थांबायला त्यांना ….. अरे इथे परिस्थिती काय आणि तुम्ही भांडताय कसले ? चार दिवस झाले नाहीत अजून आबांना जाऊन . आणि तुम्ही … हे बघ दिवाकर आम्ही काही इथे कायमचे राह्यला आलेलो नाहीत . आम्हाला आमचं घरदार आहे . थोडी अडचण आहे ,पण म्हणून तू यांचा अपमान करावास हे मला मान्य नाही .
राहिली गोष्ट इथे राहायची तर इथे माझा ही हक्क आहे . तू माझ्याशी ,आमच्याशी खोटं बोललास की तुला माहित नाही आबांनी पैसे कुणाला दिले ते … मला ही तुझी दया आली होती ,म्हटलं पोरगं एकटं आहे याला आहे .
पण मला वाटतं तुला आधाराची गरज नाही . तुझी सोय तू अगोदरच केली आहेस . तुझी इच्छा असेल तर तू जाऊ शकतोस . मी तरी इथून हलणार नाही ….. “
” ताई ,हे जरा अति होतंय असं नाही वाटत ?”
दिवाकर ने एकदम थंड स्वरात स्वरात विचारलं .
” हो ! अतीच होतंय ! पण सुरुवात तूच केलीस ! आणि एक लक्षात ठेव ,माझे ही वडील होते ते , तेव्हा निदान दिवस कार्य होईपर्यंत तरी थोबाड बंद ठेव ! समजलं ? “
दिवाकर चालला गेला . तुळजाबाईना कसं तरीच वाटलं ….
” पोरी … “
लक्ष्मीकांत तडक उठला ,
” मी ही निघतो … मी नाही थांबू शकत इथे … लक्ष्मण चल …. “
पण लक्ष्मण आईला बिलगला .
” ठीक ए ! जातो मी ! … “
” जावईबापु , अहो … थांबा ना… तुम्ही तरी समजून घ्या …. “
” नाही मामी ! याला धडा शिकवावाच लागेल ! खूप पुढे चालला हा ! आहे ते बघावच लागेल . अगोदर त्या देशपांडेला बघतो …. “
लक्ष्मीकांत हि निघून गेले ,शारदा ने अडवलं नाही .. घरात भयाण शांतता पसरली .
➣➣➣➣➣➣{ वर्ड मध्ये इथपर्यंत स्टोरी टाकलीय .}
{ १० }
लक्ष्मीकांतने कार काढली आणि सरळ ऑफिस ला आला . आपल्या कॅबिनला जाऊन खुर्चीवर विसावला . बेल वाजवून पाणी मागवलं आणि सोबत देशपांडे ला ही बोलवायला सांगितलं .
” साहेब ते तर नाहीत ! “
” कुठे गेलेत ?”
” माहित नाही . “
” म्हणजे दोन दिवस आलेच नाहीत . “
” नाही साहेब . “
लक्ष्मीकांत ने देशपांडेंच्या घरी फोन लावला .
” हॅलो …. देशपांडे …. “
” साहेब मी बोलते रमा …. “

➣➣➣➣➣➣➣

