Misal | Indian Food -|marathi food | मिसळ – एक आठवण


लेखक :- श्री. योगेश वसंत बोरसे .
मिसळचा खमंग वास आसमंतात दरवळत होता . भांड्यातील वरचं तरण पाहून तोंडाला पाणी सुटलं . मी ,मिसळची ऑर्डर दिली . आणि त्या सुगंधाने वेडावत राहिलो . लक्ष चारी बाजूला जात होतं , नजर नोंद घेत होती आणि मेंदूच्या कॉम्पुटर मध्ये एक एक फाईल सेव्ह होत राहिली . कच्चे रस्ते , गाड्यांची ये – जा आणि त्यामुळे उडणारा धुराळा !
मधेच एखादी बस यायची , काही प्रवासी ,गावकरी ,उतरायचे ,काही चढायचे व बस धूळ उडवत आणि धूर सोडत निघून जायची ,पुढच्या प्रवासाला …
ती सर्व धूळ व धूर कळत नकळतपणे बाहेर ठेवलेल्या पदार्थांवर बसत होती , पडत होती ! मिसळीच्या भांड्याखाली भट्टी धगधगत होती . आणि भांडं ?
भांडं उघडं होतं ,कारण हॉटेलवाला ऑर्डर घेण्यात व सर्व्ह करण्यात गुंग होता . त्याला या सर्व गोष्टींशी काही घेणं नव्हतं किंवा त्याला या गोष्टींची सवय होती , अंगवळणी पडलं होतं .

माझ्या डोक्यात एक गमतीशीर विचार आला , कि या धुळीमुळे आणि गाड्यांच्या धुरामुळे तर इथले पदार्थ एवढे स्वादिष्ट लागत नसतील ना ? कारण तसंच होतं ! दोन मिनिटांपूर्वी माझ्यासमोर मिसळची प्लेट आली होती ! आणि मी ,मिटक्या मारत खात होतो ! त्या चवीला तोड नव्हती !
खाली थोडे पोहे , वर मठाची उसळ , वर थोडा भज्यांचा भुगा , वर लालभडक रस्सा , त्यावर शेव ,फरसाण ! वरून रस्सा ! तरीचा रस्सा ! झणझणीत ,चमचमीत ,खणखणीत ! आणि त्याची तीव्रता कमी करण्यासाठी वाटीत दही ,सोबत कांदा ,लिंबू आणि घ्यायचे असल्यास सोबत पाव ! पापड !
नाकाला ,डोळ्याला ,पाणी आणणारा !
तरी हवा हवासा वाटणारा ,तरीचा रस्सा ! ही चव आपल्या शहरातील मिसळीला का येत नाही ?
ते आतल्या किचन मध्ये गॅसवर बनवतात म्हणून ?
हातात बऱ्याच ठिकाणी ग्लोज वापरतात म्हणून ?
त्यांच्या हाताची चव पदार्थात उतरत नाही म्हणून ?
की त्यावर धूळ बसत नाही म्हणून ?
की ते फक्त सर्व्ह करतात आणि ही माणसं प्रेमाने वाढतात म्हणून ?
नेमकी चव कसली होती ?
डोळे पुसत ,नाक पुसत ,पाणी पित पित ,मिसळ संपवली ! आणि … मनात वासना निर्माण झाली ! .. अजून एक घ्यावी का ?
नाही नको ! आपण एकटे आलो होतो सहज फेरफटका मारायला ! खेडेगावातील जीवन जवळून अनुभवायला !
मुलांना व बायकोला लग्न घरी जाऊन घेऊन येऊ ! हो ! लग्नघर ! लग्नासाठी एका गावी आलो होतो !
‘ पण ते येतील ? खातील ? पण मिसळ खाल्ल्याने खात्री होती की त्यांनाही आवडेल ! ‘
लग्नघरी गेलो ,मुलांना आणि बायकोला सांगितलं ,चला मिसळ खायला ! त्यांचा पहिला प्रश्न –
” इथे ?”
“हो ! काय हरकत आहे ?”
तेवढ्यात साली आली !
” पंत ,कुठे निघालात ? ”
म्हटलं ,
” चल ,तू पण चल ! तुझ्या मुलांनाही घे ! आपण मिसळ खाऊ !” पुन्हा प्रश्न आला –
” इथे ? ”
कारण ती पण मोठ्या शहरातील होती !
ते आले, नाही आले ,मला फरक पडणार नव्हता . डोळ्यासमोर मिसळ दिसत होती आणि ती मला बोलवत होती ! वास , तो खमंग वास अजूनही श्वासांमध्ये दरवळत होता !
” मी अजून एक मिसळ खाणार आहे ! तुम्ही या किंवा नका येऊ ? ऑल रेडी माझी एक प्लेट मिसळ खाऊन झाली आहे ! आणि मी ती चव अजूनपर्यंत विसरलो नाही !
मी पुन्हा जातोय आणि खाणार आहे !आणि इथे दोन दिवस आहे , तर रोज खाणार आहे ! तुम्ही ठरवा ,यायचं की नाही ते ! ”
“अहो ,पण तुमच्या तब्येतीचं काय ? “- बायकोने प्रश्न केला ,
” माझ्या तब्येतीला काय धाड भरलीय ? मी ठणठणीत आहे ! ”
“अहो , हे वातावरण, ही घाण ! ही धूळ ! मला तर श्वास ही घेता येत नाही मोकळा ! “
बायकोने स्पष्टीकरण दिलं .
” एक सांगू ! तुला श्वास घेता येत नाही असं नाही !
तुला मोकळा श्वास घेता येत नाही !
मोकळ्या हवेची सवय नाही !
मोकळ्या वातावरणाची सवय नाही !
१०००/१२०० स्क्वे. फूट मध्ये आयुष्य चाललंय !
तुम्हाला निसर्ग ,काय समजणार ? मी जातो !”
मी निघालो ,पुन्हा ! थोडा मूड गेला होता ,पण नंतर लक्षात आलं ,की याला आपणंच जबाबदार आहोत ! आपण यांना ,मुलांना , कधी कुणा मध्ये मिसळू दिलं नाही ! नेहमी अलिप्त ठेवलं !
मुलांचा अभ्यास आणि मिसेस ची घरातील कामं , यातच सर्व वेळ जात होता ! नव्हे आयुष्य जात होतं ! हे करू नको .ते करू नका ! मुलांवर सूचनांचा भडीमार करत राहिलो ! परिणाम समोर होता !
विचार करता करता हॉटेलात पोहोचलो !
पुन्हा ऑर्डर दिली . हॉटेलवाला आपलेपणाने हसला !’
या लोकांना हसता पण येतं ? ‘ ऑर्डर दिली आणि वाट पाहत बसलो आणि विचार शृंखला जोडली .
” मिसळ मध्ये पोहे , उसळ , भज्यांचा भुगा , रस्सा ,तरी , शेव ,फरसाण , दही ,कांदा , सगळं एकत्र असतं ! शिवाय गरमा गरम असतं ! त्यात प्रेमाने वाढलेलं असतं ! त्यामुळे त्याची चव असते !
‘आपण सुद्धा जर असेच मिळून मिसळून राहिलो तर नाही का चालणार ?
उत्साहात राहिलो , एकमेकांना प्रेम सर्व्ह करत राहिलो ,तर आपल्या आयुष्याला चव का येणार नाही ? ‘
डोळ्यात पाणी आलं ,आणि समोर मिसळ !
डोळे पुसता पुसता डोळ्यांपुढे मुलं ,बायको ,साली साहीबा आणि तिची दोन चिमुरडी मुलं आली !
त्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं !
माझ्या चेहेऱ्यावरील हास्य ,स्मित हास्य त्यांनी टिपलं !
ते आत आले आणि माझ्या अवती भवती बसले !
“काय खाणार ?” मी उत्साहाने विचारलं ,
“मिसळ ! ” सर्वांचा एक सूर लागला .
“अजून ? ”
“अजून …. बटाटा वडा ,आळू पात्रा , गरमागरम भजी …. “
ऑर्डर वाढत गेली …
” पण या धुळीचं काय ? ”
मी खोचकपणे विचारलं ,उत्तर आलं ,
” Who Care’s ?.. Let’s Enjoy !…. “
आणि मी सुद्धा त्यांच्यात मिसळलो …
लेखक :- श्री. योगेश वसंत बोरसे
-: THE END :-
![]()
NOTE :- ALL RIGHTS RESERVED AT BGSM PRODUCTION & YOGESH BORSE
ABOUT US :-
CONTACT US :-


