दिवा | मराठी रहस्यमय भयकथा | DIVA |
लेखक :- श्री .योगेश वसंत बोरसे यांची आगामी कादंबरी
{ दीर्घ रहस्यमय भयकथा }

MARATHI SUSPENSE HORROR STORY
लेखक :- श्री. योगेश वसंत बोरसे . 
संध्याकाळची वेळ . संध्याने तुळशी जवळ दिवा लावला . आणि प्रदक्षिणा मारून नमस्कार केला . माधव आणि प्राप्ती देवाजवळ बसून शुभंकरोति म्हणत होते . तुळसाबाई कापसाच्या वाती वाळत बसल्या होत्या . तुळसाबाई म्हणजे माधव आणि प्राप्तीची आजी !
त्यांची एक नजर वातींवर तर एक नजर सुनेवर म्हणजे संध्यावर होती .बरं नजरेतील भाव असे की पक्के हाड वैरी असावेत … पण संध्याचं त्यांच्या कडे लक्ष नव्हतं . ती बिचारी मनोभावे पूजा करत होती . माधव आणि प्राप्ती उड्या मारत बाहेर आले .
” आजी , शुभंकरोति झाली . “
” हो का .. बरं बरं .. “
” बरं बरं नाही .. आता गोष्ट सांगायची .. तू म्हटली होतीस नंतर सांगीन म्हणून .. “
तुळसाबाईची नजर पुन्हा संध्यावर गेली ,
” झालं असेल तर स्वयंपाकाचं बघा म्हटलं … काही तरी निमित्त हवं वेळ वाया घालवायला … “
संध्याने देव पूजेचं ताट उचललं आणि खाली मान घालून निघून गेली.
“आजी .गोष्ट सांग ना .. ”
” अगं ठमे .. ही काय वेळ आहे गोष्ट सांगायची… “
आजी प्राप्तीला लाडाने ठमे म्हणायची . का कोण जाणे ? तिचा आपल्या नाती मध्ये खूप जीव होता .
” जेवण झाल्यावर सांगेन ,पण गोष्ट नाही .. तर अनुभव सांगेन माझ्या लहानपणीचा … आणि काही ऐकलेला .. “
” म्हणजे गं आजी ?”
” अगं ठमे ,पूर्वीच्या काळी वीज नव्हती ,लाईट नव्हती ,मग कंदील ,दिवे वापरले जायचे . शेतीवाडी होती .सकाळी दिवस लवकर उगवायचा . लवकर उगवायचा म्हणजे सर्व जण लवकर उठायचे ,तयारी करून शेतात जायचे . संध्याकाळी दिवस मावळतीला आला की घराकडे परतायचे … संध्याकाळी जेवण लवकर व्हायचं . ते झालं की सर्व गप्पा मारत अंगणात बसायचे .
मग गप्पांच्या ओघात कुणी आपले अनुभव सांगायचं ,कुणी अडचणी सांगायचं ,कुणाकडे काही चांगली वाईट बातमी असेल ती सांगितली जायची . त्यामुळे सर्वांना एकमेकांचा आधार वाटायचा .
किती ही संकट असलं तरी एकमेकांच्या मदतीने त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग काढता यायचा . अंधार असेल तर आम्ही कंदील ,दिवा लावून बसायचो . मग कधी त्या दिव्याच्या गूढ वातावरणात .. तशाच गोष्टी सांगितल्या जायच्या .. “
” आजी मग तू ही सांग ना … “
” मी काय सांगितलं ? जेवण झाल्यानंतर ,तर जेवण झाल्यानंतर.. तोवर थोडा वेळ अभ्यास करा … आता गप्पा मारत बसशील तर मग जेवायला उशीर ,मग झोपायला उशीर .. जेवण करून लगेच झोपलं तर अन्न पचत नाही . मग पोट दुखतं . त्यासाठी अगोदर जेवायचं , मग थोडं फिरायचं ,गप्पा गोष्टी करायच्या मग झोपायचं . कळलं ? “
आजी माधव कडे पाहत ही नव्हती . प्राप्ती जवळ जवळ दहा वर्षांची आणि माधव ६-७ वर्षांचा .. तो रुसून बसला. बाहेर च्या दिशेने तोंड करून खांबाला धरून उभा होता ..
” माधवा ,काय झालं ? रागावलास ? “
” नाही तर काय ? तू तिच्याशीच बोलतेस माझ्याकडे बघत देखील नाहीस ! “
तसा तुळसाबाईने त्याच्याकडे प्रेमळ कटाक्ष टाकला .
” माधवा ,इकडे ये बघू … ” तो गाल फुगवत आजीकडे आला . तसं आजीने त्याला मांडीवर बसवून घेतलं आणि मायेने त्याच्या डोक्यावरून ,केसांमधून हात फिरवत ,त्याला कुरवाळत म्हटलं ,
” अरे ,तू घरातला माणूस, छकुली आज ना उद्या सासरी जाणार ,मग तिला शिकवायला नको का ? नाहीतर सगळे म्हणतील ना ,माधवची बहीण बघा ,काहीही संस्कार नाहीत ! चालेल तुला ..? “
माधवचा राग कुठल्या कुठे पळाला ..
” आजी तू पण ना .. कधी ठमे म्हणतेस ,कधी छकुली म्हणतेस ..”
” अरे लाडाने म्हणते आणि एकदा मोठी झाली की ठमे चांगलं वाटेल का ?”
” आजी ,तुला एक विचारू ? “
” काय रे सोन्या ? “
” तू आईकडे एवढ्या रागाने का बघतेस ?”
” तुला नाही कळायचं ते .. तू अजून लहान आहेस … आणि उद्या तुझी बायको आली ना की तुझी आई सुद्धा अशीच पाहिल तिच्याकडे … “
” आजी बायको म्हणजे काय गं … ? “
आजीने त्याच्या पाठीत धपाटा घातला . ” हट ,चावट कुठला ! “
” चावट म्हणजे काय गं आजी ? .. “
आजी काही बोलणार एवढ्यात संध्याने त्यांना जेवायला बोलावलं ,तशी मुलं जेवायला पळाली ….
…. तुळसाबाई ही जेवण झाल्यावर अंगणात खाट टाकून बसल्या . माधव आणि प्राप्ती उड्या मारत आले .
” आजी ,आता सांग ना … “
” बसा … “
आणि तुळसाबाईंनी सांगायला सुरुवात केली ..
” तर बाळांनो , … आम्ही लहान असतांना असंच अंगणात बसलेलो होतो एक दिवस ,म्हणजे दिवसा नाही तर रात्री .. थोडी थंडी ही होती .. बोचरी थंडी … “
” आजी .. बोचरी थंडी म्हणजे …? “
” माधवा ,गोष्ट शांत पणे ऐकायची . सारखं मध्ये बोलायचं नाही . तू अजून लहान आहेस . बोचरी थंडी म्हणजे जास्त थंडी ही नाही आणि उष्मा ही नाही . गार हवा जर अंगाला झोंबली तर अंगावर शिरशिरी येते आणि ती हवी हवीशी वाटते . आता मध्ये बोलू नकोस फक्त काय सांगते ते ऎक हं ?”
माधवने शहाण्या मुला सारखी मान हलवली .
” आजी याला काहीच समजत नाही मग याला नको सांगूस , तू जा रे आई कडे काऊ चिऊची गोष्ट ऐकायला .. “
” नाही ,मी इथेच बसणार .. आजी जवळ… “
तो हट्टाने आजीच्या मांडीवर बसला . आजी त्याला प्रेमाने कुरवाळत गोष्ट सांगू लागली …
” तर .. आम्ही लहान असतांना असंच अंगणात बसलो होतो ,तेव्हा मी ही ठमे एवढी होती .. “
” आजी मग तुला ही ठमे म्हणायचे … ?”
माधवच्या प्रश्नावर आजी खळाळून हसली .
” लबाडा ,मला कशाला ठमा म्हणतील .. ?”
” मग काय म्हणायचे … ? ”
” आठवत नाही रे आता … “
” आजी गोष्ट आठवते आणि नांव नाही आठवत.. आजी तू खोटं बोलतेस .. “
” बरं बाबा मला ही ठमा म्हणायचे .. बस … आता गोष्ट ऐकायची की नाही ,की आई कडे जातोस ? “
माधव टाळ्या वाजवत उड्या मारू लागला ..
” आजी ठमा .. आजी ठमा .. ताई ठमा .. ताई ठमा .. ”
तुळसाबाईंना समजेना काय बोलावं ? त्यांनी स्वतःचं हसू करून घेतलं होतं .. संध्याने ते बघितलं आणि माधवच्या पाठीत धपाटा घातला ..
” असं बोलतात .. ? मोठ्या आहेत ना त्या .. ! ” ती त्याला घरात घेऊन गेली .. माधवला कळेना आपलं काय चुकलं . आजी बोलते चालतं ,आपण बोललो तर … तो बोंबलतच गेला …
” कशाला मारलं त्याला .. लहान आहे अजून .. ? “
” मग काहीही बोलेल .. ? तशीच सवय लागेल मग .. ”
” म्हणजे मला अशीच सवय आहे असं तुला म्हणायचंय का .. ? “
” मी काही म्हणाले का तुम्हाला .. ? तो लहान आहे ,तुम्ही तर मोठ्या आहात .. ! त्याच्या समोर बोलता ,मग तो ही तेच करतो .. तेच बोलतो .. माझा तिरस्कार करताय .. तो ही तेच शिकतोय … अहो घरात मोठी माणसं मुलांना चांगलं वळण लावायला असतात , तुम्ही तर चुकीचं बोलायला शिकवताय … “
” बोल गं बोल .. तुला आयती संधी मिळाली बोलायला .. “
” अहो लहान मुलं आहेत ती .. त्यांना चांगल्या रामायणाच्या कथा सांगायच्या सोडून भुताखेतांच्या काय सांगता हो ? पोरगं घाबरेल ना एखादे दिवशी .. ताप बीप काढला मग काय करायचं .. ?”
छोटी तुळसाई तेव्हा दहा – बारा वर्षांची असेल . ते असेच रात्रीचे अंगणात गप्पा मारत बसले होते .. ती आजी ला बिलगून बसली होती .. शेजारी काका ,तिचे वडील आणि इतर लोक गोल रिंगण करून बसले होते .
मध्यभागी कंदिलाची मध्यम वात तेवत होती . वातावरण गूढ ,गंभीर होतं .. कुणी अंगावर शाल ,कुणी घोंगडी घेतलेली होती . बोचरी थंडी होतीच . तुळसा आजीच्या शाल मध्ये शिरली होती .. आजीने ही तिला जवळ ओढलं होतं ..
तुळसाचे वडील भिकमजी बोलायला लागले ..
” आई ,आपल्या मळ्यातील ते अप्पांचं मंदिर आहे ना ,तिथं कुणी दिवा लावून जातंय .. पण कोण लावतंय ते कळत नाही .”
” अरे मग लक्ष ठेवायचं ना … “
” अगं आई मला वाटलं आपले सालदार वगैरे कुणी लावत असतील .. पण त्यांच्यातलं ही कुणी नाही .. म्हणून आज एका गड्याला पाळतीवर ठेवलाय . आज जर कुणी दिवा लावला तर … “
तेवढ्यात एक गडी पळत आला ,” मालक ..मालक .. “
” चिमा ..? काय झालं ? “
” मालक ,कुणीतरी दिवा लावून गेलं … “
” कोण होतं ? “
” न्हाई समजलं .. “
” अरे तुला त्यासाठी तिथं ठेवलं होतं ना .. झोपला होतास की काय .. ? ”
” मालक मी जागचा हललो बी नई पण पाच मिनिटं काय झालं ,मला बी कळालं नई ..एकदम अंधारल्यासारखं झालं .. ”
” चिमा ,अरे अंधारात अंधारल्यासारखं कसं होईल .. ? तुझा डोळा लागला असेल .. “
” मालक ,आईची आन घेऊन सांगतो ,डोळ्यांत तेल घालून पहारा करत होतो … पण एवढा अंधार झाला की डोळ्यात बोट गेलं तरी दिसणार नाई ,अन तेवढ्यात दिवा लागला …. अन पाहिल्यासारखं अंधुक दिसायला लागलं … “
भिकमजी ने आपल्या आईकडे म्हणजे तुळसाच्या आजीकडे म्हणजेच जनाबाईकडे बघितलं …
त्या उद्गारल्या ,
” चिमाजी ,उद्या टेम्भा लावून पहारा दे अन आजची रात्र पण पुन्हा टेम्भा लावून थांब ,बघ काय होती ते … नक्कीच कुणीतरी आपल्या शेतात आपल्या ही नकळत शिरतंय .. अजून तरी काही वाईट साईट झालं नाही पण पुढे भरोसा नाही … “
होकार भरून चिमा निघून गेला आणि तुळसा फक्त ऐकत होती . तिला त्यात काही विशेष वाटलं नाही …. पण आजी का विचारात पडली ते ही समजलं नाही ..
” पांडुरंगा ,अरे हे काय आक्रीत म्हणायचं ? “
” आई ,बघू आपण .. एवढी काळजी करू नकोस . तसं ही दिवा लावणं काही वाईट नाहीय .. “
” भीका ,दिवा लावणं वाईट नाही पण असं चोरून लपून आपल्या नकळत लावण्याचं काय प्रयोजन आहे समजायला नको , त्या व्यक्तीचा हेतू काय आहे ते ही महत्वाचं .. बऱ्याचदा शुल्लक वाटणाऱ्या गोष्टी भविष्यात क्लेशदायक ठरतात .. आपण काळजी घेतलेली बरी .. नाहीतर एक काम कर उद्या पासून कुणाला तरी संध्याकाळी दिवा लावून द्यायला सांग .. झालच तर त्या मंदिराला एखाद जाळीचा दरवाजा लावून घे .. ”
भिकमजी ने सहमतीपुर्वक मान डोलावली .. आणि तो विषय तिथेच थांबला .. कुणी काही बोललं नाही .
➣➣➣➣
तुळसाबाईंना कुणी तरी आपल्या जवळ असल्याचं जाणवलं तशी त्यांची तंद्री भंग झाली .. त्यांनी दचकून तिकडे बघितलं , संध्या त्यांच्या जवळ उभी होती ..
” सासूबाई ,माफ करा .. रागाच्या भरात खूप काही बोलले तुम्हाला .. “
त्या उठून बसल्या .. “
” नाही पोरी , तुझं म्हणणं बरोबर आहे .. माझीच चूक झाली .. “
” तसं नाही आई ,वाटल्यास मी तुमच्या पाया पडते .. ‘
” नाही ,संध्या ,त्याची गरज नाही .. ये बस … .. “
संध्या त्यांच्या जवळ येऊन बसली .
” पोरं झोपली ..?”
” हो .. मी काय म्हणते .. ? मला सांगाल ..जे त्यांना सांगणार होतात ते .. ? ”
” काही विशेष नव्हतं गं आणि घाबरण्यासारखं ही काही नव्हतं .. आमचे आजोबा होते .. त्यांचं अपघाती निधन झालं होतं . आमच्या शेतात त्यांचं छोटंसं मंदिर बांधलं होतं .. पूर्वी चालायच्या या गोष्टी .. त्यांचा आत्मा तिथे घुटमळतो ,मालमत्तेची राखण करतो असं बरंच काही बोललं जायचं .. बऱ्याचदा त्रास ही व्हायचा पण त्याची तीव्रता कमी असायची ..
एक दिवस असं झालं की संध्याकाळी काळोख झाल्यानंतर तिथे अचानक दिवा पेटायला लागला .. अगोदर कुणी लक्ष दिलं नाही .. कुणी म्हणायचं एखाद्या गड्याने लावला असेल ,कुणी म्हणायचं एखाद्या सालदाराने लावला असेल , पण हळूहळू सगळ्यांकडून नकार यायला लागला आणि एक दिवस पहारा ठेवण्यात आला . गडी डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवत होता .. पण तरी ही दिवा पेटलाच .. कुणी लावला ,कसा लावला ,केव्हा लावला काही समजलं नाही .. “
क्रमशः …..
➣➣➣➣➣➣➣
सूचना :- ही एक पूर्णतः काल्पनिक कथा असून केवळ मनोरंजन हाच शुद्ध हेतू आहे . यातील पत्रे ,घटना पूर्णतः काल्पनिक आहेत . आणि सर्व हक्क योगेश बोरसे आणि BGSM PRODUCTION यांच्याकडे सुरक्षित आहेत .. हा कथेचा एक भाग आहे .. कथा आवडल्यास नक्की सांगा …
तुमचा :-
लेखक :- श्री . योगेश वसंत बोरसे .
![]()
ALL RIGHTS RESERVED AT YOGESH BORSE
& BGSM PRODUCTION


