वावर – मराठी भयकथा

आगामी मराठी भयकथा

लेखक :- श्री . योगेश वसंत बोरसे
Sample :-
तिने स्वयंपाक करता करता खिडकीतून बाहेर बघितलं . कुणी तरी डोकावून गेलं असं तिला वाटलं . स्वयंपाकाच्या ओट्याला लागूनच नजरेसमोर खिडकी होती .
त्यामुळे आपसूकच लक्ष बाहेर जायचं . हे इतकं अंगवळणी पडलं होतं की बऱ्याचदा कुणी शेजारीण येऊन खिडकीत उभी राहायची . आणि स्वयंपाक करता करता गप्पा व्हायच्या .
एका खोलीचं घर !
लग्न होऊन आली तशी इथेच होती आणि कदाचित शेवट पर्यंत ..
असंच तिला वाटायचं .
चाळीची ,चाळकऱ्यांची इतकी सवय झाली होती की जणू पूर्ण चाळ म्हणजे एक घर होतं . आणि त्या पूर्ण घराच्या छोट्या छोट्या हिश्या मध्ये प्रत्यकाने आपलं विश्व निर्माण केलं होतं .
आताही तिला समोरून कुणी डोकावून गेलं त्याचं काही वाटलं नाही पण पहिल्यांदाच ती अस्वस्थ झाली .
” कोण असावं ?”
बराच वेळ विचार करून ही याचं उत्तर मिळालं नाही तेव्हा तिने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं . जाऊ दे असेल कुणी …
… ” काय ? .. झाला का स्वयंपाक ? …. “
” काकू … तुम्ही ?”
” का गं ? दुसरं कुणी येणार होतं …. ?”
” नाही हो ! मगाशी ना कुणी तरी डोकावून गेल असं वाटलं ,कोण ते समजलं नाही … “
” केव्हा गं … ?”
” अहो आत्ताच ! फार तर पाच मिनिट झाले असतील .. “
” असेल कुणी … तुला किती वेळा सांगितलं, खिडकी जरा लोटून घेत जा म्हणून … कुणी न कुणी वावरत असतं इथे ,मेले येता जाता घरात डोकावतात … अशाने घास बसतो गं ! जेवण घशाखाली उतरत नाही ! “
” ते ही खरंच आहे म्हणा ,पण काकू आता या गोष्टींची इतकी सवय झालीय ना ,जर स्वयंपाक करताना कुणी आलं नाही ना तर अस्वस्थ व्हायला होतं … बरं .. जेवण झालं तुमचं …. /”
” नाही गं अजून .. ! नऊ वाजून गेले ,अजून यांचा पत्ता नाही . पाऊस मेला थांबायचं नांव घेत नाही ! आमचे हे … जन्माचे वेंधळे ! एक तर छत्री घरी विसरतात नाहीतर कुठे सोडून येतात ! म्हणजे ओलं होणं ,भिजणं ,ठरलेलं ….
आता तूच सांग असं नेहमी भिजणं चांगलंय का ?
ते ही अशा रात्रीच्या वातावरणात ?
फिरायला काही काळ वेळ हवी की नको ?
पण नाही ! नुसतं मेलं फिरायचं वेड !
पाऊस म्हणू नको ,थंडी म्हणू नको ,रात्र नाही की दिवस नाही ,अमावस्या नाही की पौर्णिमा नाही !
कधी ही कुठे ही केव्हा ही जातात आणि वाटेल तेव्हा दारात येऊन उभे राहतात !
आणि काही बोलायला गेलं की लाडी गोडी लावतात .
काकू कृतक कोपाने सांगत होत्या आणि जानकी सहज भावनेने ऐकून स्मित हास्याने त्यांना दाद देत होती .
” … आता तू सांग ,भसकन लाईट गेली तर मी अंधारात भुतासारखी एकटी बसू का ? ,,, आणि बाहेर अंधारात हे कुठे धडपडले मग ? … “
” काकू ,एवढी काळजी नका करू ! येतील ते व्यवस्थित … आमचे हे ही …. “
जानकीचं लक्ष बोलता बोलता काकूंच्या मागे गेलं , कुणी सर्रकन त्यांच्या मागून गेलं होतं .
” काय गं ? लक्ष कुठेय तुझं ? “
जानकी आपल्या मागे बघते म्हटल्यावर काकूंनी ही मागे वळून बघितलं .
” काकू .. आत्ता कुणी गेलं इकडून …. “
काकूंनी आजूबाजूला बघितलं …. कुणी नव्हतं ….
” जानकी ,तुला भास झाला असेल ! मला नसती का चाहूल लागली ?”
” खरंच काकू भासच झाला असेल ! दिवस भर वावर असतो इथे कुणाचा नी कुणाचा त्यामुळे कदाचित ….. चला झाला माझा स्वयंपाक . या ना आत या … “
” नको बाई .. तुझा नवरा यायचा आणि मला इकडे बघून तोंड वाकडं करायचा . ही थेरडी इथे काय करतेय म्हणून . मी आपली जातेच कशी … किती वाजले गं ? “
” अं … काकू … ९:४० झालेत ! “
” काय म्हणतेस ? हे आमचं ध्यान कुठं धडपडलं की काय ? कुठे शोधू आता यांना ? “
” येतील हो काकू ,कशाला काळजी करता ? “
जानकी ने बोलता बोलता वाटीत भाजी काढली .
” घ्या काकू ,पाटोड्या केल्यात ,मसाले ,खाऊन बघा आणि सांगा कशा झाल्या ते ! “
” अगं कशाला देत बसलीस ? तुमचा ही दोघांचाच स्वयंपाक असतो आणि आमचा ही दोघांचाच ! पोर नं सोर जीवाला घोर ! … “
काकू स्वतःच आपल्या बोलण्यावर मनमोकळ्या हसल्या . आणि जानकीचं मन खट्टू झालं . काकूंनी नकळत पणे तिच्या मर्मावर बोट ठेवलं होतं . काकूंच्या ही ते लक्षात आलं …
➣➣➣➣➣➣➣➣
अर्थात जानकीला मूल झालं नव्हतं असं नाही ! लग्नानंतर अवघ्या वर्षभरात पाळणा हलला होता . आणि जानकीने एका छान ,सुंदर ,गोंडस मुलीला जन्म दिला होता . तेव्हा ही ती चाळीतच राहायची .
अर्थात जानकीला मूल झालं नव्हतं असं नाही ! लग्नानंतर अवघ्या वर्षभरात पाळणा हलला होता . आणि जानकीने एका छान ,सुंदर ,गोंडस मुलीला जन्म दिला होता . तेव्हा ही ती चाळीतच राहायची .
पहिल्या वाढदिवसाला सर्व चाळकऱ्यांना जेवायला आमंत्रण होतं . पण काय झालं ?
कुणी केलं ?
काही समजलं नाही . एवढीशी पोर ….
कुणाकडे ही पटकन जायची . जानकी ने किंवाअमोल ने कधी कुणाला विरोध केला नाही . ‘ प्राजक्ता ‘ जानकी आणि अमोलचीच काय ,सर्व चाळीची लाडकी होती .
वाढदिवस साजरा झाला . चाळीतील व्हरांड्यातच म्हणजे पॅसेज मध्ये शक्य तशा पंगती बसल्या .छोटी प्राजक्ता खूप छान दिसत होती . गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचा फ्रॉक तिला खुलून दिसत होता . कुणाला ही हवी हवीशी वाटावी अशीच दिसत होती .
त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला . कुणी पापा घ्यायच्या निमित्ताने कुणी गिफ्ट द्यायच्या निमित्ताने तिच्याशी सलगी करू लागलं . जवळ घेऊ लागलं आणि अशातच ती हातोहात कुणाकडे गेली कुणाच्या ही लक्षात आलं नाही .
जेव्हा लक्षात आलं तेव्हा खूप उशीर झाला होता . जानकीने हंबरडा फोडला . अमोलचं डोकं गरगरायला लागलं ,पायातील त्राण नाहीसं झालं . चाळीतील तरुण पोरं ,माणसं प्राजक्ताला शोधायला पळाली .
पण दुर्दैव !
प्राजक्ताचं ,जानकीचं ,अमोलचं आणि चाळकऱ्यांचं …. प्राजक्ता हाती आली नाही …..
कुणी तरी लक्ष ठेऊन असावं ,पाळत ठेऊन असावं … चाळीत शोककळा पसरली . कुणी तरी संधी साधून तिला नाहीशी केली होती .
चाळकऱ्या ना मेल्याहून मेल्यासारखं झालं . मेजवानीच्या नादात पोर हातची गेली होती .पण कसं शक्य आहे ?
सर्व आमंत्रित तर चाळीतील होते . की कुणी गर्दीचा फायदा घेऊन ….
पण आता काथ्या कूट पाडून काही साध्य होणार नव्हतं . आजूबाजूला शोधाशोध झाली ,पोलिसात नोंद झाली …
➣➣➣➣➣➣➣➣
….तो दिवस आणि आजचा दिवस … जवळ जवळ पंधरा वर्षांचा कालखंड !
….तो दिवस आणि आजचा दिवस … जवळ जवळ पंधरा वर्षांचा कालखंड !
प्राजक्ता हाती नाही . तिच्या बाबतीत कुठलीही बातमी मिळाली नाही .
जानकीने हाय खाल्ली . अमोल ने धसका घेतला . दोघांचा अपराधीपणा बळावला होता .
एवढ्याशा लेकराला आपण सांभाळू शकलो नाही . आपली लायकीच नव्हती आई बाप व्हायची . देवाने दान दिलं पण आपल्याला सांभाळता आलं नाही ….
त्यांच्यातील दुरावा वाढत गेला . लग्न संबंध संपुष्टात आले . आणि त्या नंतर दोघांनी दुसऱ्या अपत्याचा विचार ही केला नाही …..
आज ही जर काकू बोलल्या नसत्या तर …
‘ म्हणजे आपण प्राजक्ताला विसरलो की काय ? …? ‘
” जानकी … हे बघ .. चुकलं माझं …. नकळत पणे तोंडातून निघालं गं … माझं मेलीचं ना असंच होतं … काय बोललं जातं बऱ्याचदा मला ही समजत नाही … माफ कर मला .. “
एवढं बोलून काकू निघाल्या …..
काकूंना ही वाईट वाटलं .
‘ मेलं जेवढा तोंडाला लगाम घालावा तेवढं तोंड वासलं जातंय .. बिचारी कशीबशी दुःख विसरली असेल ,आपण पुन्हा तिच्या जखमेवरची खपली काढली … ‘
.. पण आता पश्चाताप करून उपयोग नव्हता . त्यांनी पटकन मागे वळून बघितलं . कुणीतरी मागून दुडूदुडू धावत गेल्यासारखं वाटलं … बघितलं तर … कुणी नव्हतं … काकू धीम्या पावलांनी आपल्या खोली जवळ पोहोचल्या .
➣➣➣➣➣➣➣➣
काकांचा अजून पत्ता नव्हता . पाऊस अजून ही मुसळधार कोसळत होता . घरात न जाता त्या व्हरांड्यातच थांबल्या . हळू हळू लाकडी रेलिंग पर्यंत पोहोचल्या . त्यांना उंचावरून बघितलं की गरागरायचं .
काकांचा अजून पत्ता नव्हता . पाऊस अजून ही मुसळधार कोसळत होता . घरात न जाता त्या व्हरांड्यातच थांबल्या . हळू हळू लाकडी रेलिंग पर्यंत पोहोचल्या . त्यांना उंचावरून बघितलं की गरागरायचं .
त्यामुळे त्या सहसा रेलिंग जवळ उभ्या राहायच्या नाहीत . शक्यतो रात्रीच . आत्ता ही बाहेर काळोख होता .
पावसाचे काही तुषार त्यांच्या पर्यंत पोहोचत होते . त्यांना या वयात ही या तुषारांचं अप्रूप वाटायचं . ते हवेहवेसे वाटायचे . त्यांच्या आठवणी उफाळून आल्या .
त्या हळूहळू भूतकाळात हरवल्या …. काकांची पहिली भेट … पहिला पावसाळा ….. पहिली रात्र … आणि … अचानक .. कुणीतरी पदर ओढल्याचं जाणवलं … अगदी प्रकर्षाने ….
भास नक्कीच नव्हता . त्यांचं अंग शहारलं . भीतीने की थंडीने … त्यांना ही समजलं नाही .. आजूबाजूचा अंधार आणखी गडद झाला . त्यांनी सभोवताली नजर फिरवली .भसकन लाईट गेली होती .
मिट्ट काळोख आणि कोसळणाऱ्या सरींचा लयबद्ध आवाज !
त्या आवाजात आणखी एक आवाज सामील झाला .कुणीतरी त्यांच्या मागे दुडूदुडू धावत गेलं . आणि पुन्हा पदर ओढला गेला . आता मात्र काकूंना धडकी भरली .चाळ मोठी होती . जुनी होती .
ज्यांना शक्य झालं त्यांनी नवीन जागी स्थलांतर केलं होतं ,त्यामुळे बऱ्याचशा खोल्यांना बाहेरून कुलूप होतं . दिवसा कुणी ये जा करायचं आपला इथला हक्क अजून शाबूत आहे हे सिद्ध करण्यासाठी .
पण रात्री चाळीत सामसूम व्हायची . दोन चार बिऱ्हाडं थंडी आणि पावसामुळे दार लावून बसली होती . अमोल आल्यामुळे जानकी ने ही दार लावून घेतलं होतं . आता काकूंना एकटेपणा खायला उठला . जानकीकडेच थांबायला हवं होतं . उगीच शहाणपणा केला . …
” काय गं ? … इथे काय …. “
” कोण ए …?”
” अगं मी ए ! काय झालं ? “
” तुम्ही …होय … “
भीतीची जागा आता रागाने , त्राग्याने घेतली .
” अहो तुम्हाला काही काळाचं ,वेळेचं भान आहे की नाही … ? असे भुतासारखे रात्री अपरात्री कुठे मरायला जाता हो ? मी इथे एकटी काय करत जाऊ ? मला सांगितलं असतं तर मी ही सोबत आले असते … “
” मग आता चल ….. “
” कुठे …? अहो …. अहो … ” काकू आवाज देत राहिल्या आणि बडबडत राहिल्या .
” काय मेला डोक्याला ताप आहे या माणसाचा … ही वेळ आहे का बाहेर फिरायची ? की घरात गेले असतील …. ? अहो …. ”
काकू त्यांना आवाज देत चाचपडत घरात गेल्या . सवयीनेच गॅस ओट्यावर हात फिरला . तसाच आधार घेत त्या रॅक पर्यंत पोहोचल्या … आणि पुन्हा …. पुन्हा कुणीतरी पदर ओढला .
” आजी …”
” ए … ए … कोण … ए … हं … अहो .. अहो .. ” त्या जोरजोरात ओरडायला लागल्या .
” अहो बहुतेक काकूंचा आवाज आहे चला … बघूया … काय झालं ते …. “
जानकी पटकन उठली . आणि मेणबत्ती घेऊन दार उघडून बाहेर पडली . पाठोपाठ अमोल ही आगपेटी घेऊन उठला बाहेर येऊन दार ओढलं आणि दोघे काकूंच्या खोलीकडे धावले
तोवर मेणबत्ती विझली होती . काकूंच्या खोलीत आल्यावर अमोल ने मेणबत्ती पेटवली आणि काकूंना आवाज दिला दिला . त्या गॅस ओट्या जवळच खाली बसल्या होत्या .
कोपऱ्यात … थरथरत …. घामाघूम झालेल्या … प्रचंड घाबरल्या होत्या . तोंडातून शब्द निघत नव्हता . जानकीने पुढे होऊन काकूंना हलवलं . तशा त्या पुन्हा ओरडायला लागल्या .
अमोल ने मठातून ग्लास भरून जानकी जवळ दिला . जानकी ने थंडगार पाण्याचे सबके काकूंच्या तोंडावर मारले . तशा त्या दचकल्या . आणि या दोघांच्या तोंडाकडे बघायला लागल्या .
” काकू .. काय झालं ? कशाला घाबरलात ?”
” जानकी … जानकी …. ”
त्या लहान मुलासारख्या जानकीला बिलगल्या आणि रडायला लागल्या . रात्रीच्या वातावरणात ते रुदन भेसूर वाटत होतं .
” काकू ,रडू नका ,शांत व्हा ! सांगा तर खरं काय झालं …. ?”
” जानकी …. अगं इथे कुणी होतं . … “
” कुठे ..?”
” इथे माझ्या अवती भवती मगासपासून कुणी वावरतंय सारखा पदर ओढतंय ! मला अगोदर वाटलं की भास असेल पण आता कुणी तरी पदर ओढून आवाज ही दिला आजी म्हणून …. “
” अहो काकू ,एवढ्या रात्री कोण येणार ? ते ही लहान मूल ? अहो बारा वाजत आले आता ! आणि काका कुठेत ?”
” ते … ते .. ही … आले होते … पण मग … नाहीसे झाले …. “
” काकू काय बोलताय …?”
” हो ,मी बाहेर व्हरांड्यात उभी होते . तेव्हा आले होते ते आणि नंतर बोलता बोलता कुठं गेले काय माहित ? मला … वाटलं घरात आले म्हणून
…. म्हणून मी ही आले … मेणबत्ती शोधत … इथे आले तर मागून कुणी पदर ओढला आणि आवाज ही दिला .. कुणी मुलगी असावी … लहान मुलगी …. “
” काय … ?”
” हो ! “
” काकू ,अहो कमाल करताय … ! एवढ्या रात्रीची कोणती मुलगी फिरणार आहे इथे … ?”
” माहित नाही मला .. पण तू म्हणालीस ते खरं होतं ! इथे आपल्या आजूबाजूला काहीतरी भयंकर घडलंय … घडतंय … घडू पाहतंय … किंवा … किंवा घडणार आहे … ! “
To Be Continued ……


ALL RIGHTS RESERVED AT YOGESH BORSE & BGSM PRODUCTION , BHUTATMA PUBLICATION


Pages: 1 2

