-: भय इथले संपत नाही :-

{ 1 }
एक मुलगी ! गावभर हुंदडत राहायची !
लहान मुलांमध्ये खेळायची . गावभर ,गावाबाहेर हिंडायची !
ज्याने जे दिलं ते खायची , कुणी दिलेले जुने कपडे घालायची !
कुणी काही काम सांगितलं ते करायची ! कुठून आली होती ? माहित नाही !
ना गांव माहिती ,ना नांव माहिती !
कुणी विचारलं तर डोकं खाजवायची . एक तर तिला माहित नसावं किंवा सांगायचं नसावं !
पण इतर वेळेस खूप बोलायची भराभर बोलायची !
जशी काही फटाकडीच !
जशी फटाक्यांची लड पेटवल्यावर एकामागे एक फुटते , त्याप्रमाणे तिचं बोलणं होतं .
त्यामुळेच नांव पडलं ‘ फटाकडी ‘!
तर ही फटाकडी वर सांगितल्याप्रमाणे सगळ्यांची कामं करायची . कधी गुरांमागे रानात निघून जायची तर कधी मेंढपाळांबरोबर , मेंढ्यांबरोबर ,बकऱ्यांबरोबर जायची . दिवसभर त्यांच्यामागे पळायचं संध्याकाळी घरी परतायचं . असं स्वच्छंदी जीवन होतं . बरं वय ना धड लहान , ना धड मोठं !
१३ ते १४ वर्ष असेल . पण शरीर भरलेलं होतं !
म्हणजे कुणालाही ती १ ते २ वर्षांनी मोठीच वाटायची . त्यामुळे ज्या बायांना काळजी वाटायची ,त्या तिला रागवायच्या ही ! समजावून सांगायच्या ,पण पोरकट बुद्धी ! मन रमेल तिकडे हुंदडायची !
आणि तो दिवस उगवला . फटाकडी गेली ती परत आलीच नाही . म्हणजे पुन्हा दिसलीच नाही . दिवसभर कुणाला काही वाटलं नाही . पण सूर्य जसा मावळतीकडे झुकला ,गुरं ढोरं ,मेंढ्या ,सर्व गुराखी कष्टकरी घराकडे परतले .
पण फटाकडी कुणाला दिसली नाही . प्रथम कुजबुज सुरु झाली ,चौकशी सुरु झाली ,कुणी पाहिलं का ? कुणी काही काम सांगितलं का ? कुणी काही बोललं का ?
पण उत्तर कुणाकडेच नव्हतं . तशी कुजबुज चर्चेमध्ये बदलली . चर्चेचं रूपांतर चौकशीत झालं ,चौकशीचं काळजीत आणि बघता बघता सारं गांव जमा झालं . जो तो विचारू लागला . पण उत्तर कुणाकडेच नव्हतं . काहींना काळजी वाटली ,काहींनी टोमणे मारायला सुरुवात केली .
तरी सांगायचो आम्ही ! पण ऐकतो कोण ?
काहींना आनंद झाला . असुरी आनंद ! ते वेगवेगळ्या कल्पना करायला लागले . बोलायला लागले . काहींनी पुढची तयारी दाखवली ,जी अगोदर व्हायला हवी होती . आता सापडली तर मुलगी म्हणून दत्तक घेऊ ! म्हणजे एक सुरक्षित कुटुंब मिळेल तिला . पण ती सापडायला तर हवी ?
बघता बघता तीन चार गट पडले . आणि चार ही बाजूला रवाना झाले .
रात्रीची वेळ ! भयाण शांतता ,गावाकडचं वातावरण ! कच्चे रस्ते ! रातकिड्यांची किरकिर शिवाय पायाखाली जे काही तुडवलं जाईल त्याचा रहस्यमय ,अनाकलनीय ,आवाज !
हातात काठ्या ,कंदील घेऊन गावातील तरुण जबाबदार गावकरी तिच्या शोधात निघाले . बाकी गाव चावडी समोर जमा होत गेलं . उत्सुकता ,भीती ,काळजी ,संमिश्र वातावरण होतं . त्यातील कुणी गावदेवीच्या मंदिराकडे गेलं ,कुणी स्मशानाकडे गेलं . कुणी बारकाईने गावातच शोध घेणार होतं . तर कुणी हायवे च्या दिशेने रवाना झालं .
“नारबा ? पोरगी कुठं गेली असल रं ?”
“काई कळंना गड्या ! पण दिन्या ,मला एक कळंना ,आपण मसनवटी कडे का चाललोय ? तिथं काय भेटणार आपल्याला ? तसं काही नाई रं ! शोधायची म्हणून आपन इकडे आलो ,नाई भेटली तर जाऊ परत ! पन पोरगी चांगली होती . भोळी भाबडी होती . निष्पाप होती . देवा ,पोरीला सांभाळ रं बाबा ! काई वंगाळ होऊ देऊ नगं ! “
ते आजूबाजूला पाहत ,झाडाझुडपांमध्ये डोकावत , आवाज देत पुढे जात राहिले .
दुसरीकडे ➢
” मंग्या , ते बघ . गावदेवी मंदिराच्या पायरीवर कुणीतरी बसलंय . चल पाहू कोण ए ते ! “
” सुन्या ,ती फटाकडी नाही ! कोण तरी माणूस दिसतोय ! “
“अरे ते मला पण कळतंय पण त्याला विचारू , त्याने इकडं पाहिली का म्हणून ! “
इकडे गावात फिरणारी पोरं चारी बाजूला पसरली . त्यामुळे कुणी कुणी एकटे फिरत होते . सदाशिवला एका विहिरीजवळ कुणीतरी बसलंय असं दिसलं ! आणि एकटक त्याच्याकडे पाहतंय असं वाटलं . तो डोकं खाजवत उभा राहिला . नंतर अचानक बोंब मारत पळायला लागला . तसे दोघे त्याच्या दिशेने धावले .
“सदा ,काय झालं ?”
“अरे तिथं विहिरीवर कुणी तरी बसलं होतं माझ्याकडं पाहत होतं .!”
“अरे तो रिकामटेकडा असल ! ही काय वेळ आहे विहिरीवर बसायची ?”
” मग त्याला जाऊन विचारायचं ना ?”
“काय ? “
“अरे रताळ्या काय काय ? आपण कशाला फिरतोय ? “
“ती पोरगी सापडत नाही म्हणून ! ”
“अरे मग त्याला विचारायचं ना ! “
” कोणाला ? “
“अरे कोनाला काय ? तुला जो दिसला त्याला ! “
“अरे पण त्याला कसं माहित असणार ती कुठे हाये ते ? माहित असतं तर त्याने सांगितलं असतं ना ! “
“अरे पण त्याला हे तर माहिती पाहिजे फटाकडी हरवलीय म्हणून ! “
सदाशिव पुन्हा डोकं खाजवायला लागला . त्याला हे समजलंच नाही .
“चल पाहू कोण आहे ते ! ते विहिरीकडे गेले . “सदा ,इथे तर कुणीच नाही ! “
दुसरा बोलला ,”अरे डिंग्या तो काय इथेच बसून राहील का ? गेला असेल घरी ! “
“घरी ? अरे ध्यानावर हेस का ? इथं आसपास एक तरी घर हाये का ? आपण पार गांवाबाहेर आलोय . अन दोन मिनिटात तो कसा जाईल ?”
“ए ,अरे भूत तर नसेल ?”
“चंद्या ,शांत बस ! असं भूत बित काही नसतं ! “
” तुला कसं माहित रे नसतं म्हणून / अरे ज्यांच्या इच्छा अपुऱ्या राहतात ,ते फिरता अशे ! “
“मंग तुय ते भूत काय पानी प्यायला आलं होतं विहिरीवर ?”
“आलं बी आसल ,काय भरवसा ? मरताना पान्यासाठी तरफडलं असल तर ? “
“आरे ,पळा मंग ! नाहीतर आपलं ही भूत व्हायचं ! ”
सदा परत विचार करायला लागला ,’पन आपलं भूत कसं होईन ?आपल्याला तर तहान पण नाई लागली ? हा मगाशी परसाकडे जायचं होतं ,पण आता तसं काही वाटत नाही !
पण तोवर डिंग्या पळालाही ,चंद्या त्याच्या मागे ! सदा विचार करत तिथेच थांबला . हे दोघे पुढे जाऊन थांबले . वळून बघितलं तर सदा तिथे विहिरीजवळ उभा होता ! त्याने विहिरीत डोकावून बघितलं ,
“ए ,अरे हा येडा काय करतोय ? “
” ए सदा पळ की ,मरायचं का ? ” डिंग्या जोरात ओरडला .
“आरं थांबा ! ते पाहा ,कोनी तरी येतंय इकडच ,त्याला इचारू ! त्याचं लक्ष तिकडे गेलं .हातात काठी घेतलेला ,अंगावर घोंगडी असलेला कुणीतरी विहिरीकडे येत होता .दोघे पाहत राहिले .
“चंद्या ? अरे ही इहिर हाये का पाणपोई ? रातीचे इथे का येतात पानी प्यायला ? यांच्या घरी पानी नई भेटत का ? “
“अरे डिंग्या ते सोड ,हा एवढा लांब हाये तरी एवढा मोठा दिसतोय अन स्पष्ट दिसतोय ,तो बी एवढ्या अंधारात ! कशानं चमकत असल ? “
” सद्या ,पळ ! हे काई भलतंच ए ! “
अन दोघं पळायला लागले . पन सदाला त्यांचा आवाज ऐकू आला नव्हता . किंवा त्याला पळायचं नव्हतं . ते अजून लांब जाऊन थांबले . आणि सदाच्या दिशेने पाहू लागले . सदा त्यांच्याकडे पाहून हातवारे करत होता .. पळत येत होता .
“च्यायचं येडं ! आता पळतंय ! “
हे दोघे थांबायचे सोडून अजून जोरात पळाले . ते डायरेक्ट चावडीवर येऊन थांबले . धापा टाकत ! गावकऱ्यांना वाटलं याना काही माहिती मिळाली असेल ‘काय झालं ?’ ‘काय झालं ?’ जो तो विचारू लागला . गावकरी त्यांच्या जवळ जमा झाले .
“सदा … सदा … भू…… त ,भू… त … !”
” आरं काय बडबडताय ? काय झालं ? अन सदा कुठाय ?
दोघे एकमेकांकडे बघत होते . ‘सदा तर आपल्यामागे पळाला होता ? मग का नाही आला ? हा गेला कुठे ? ‘
तेवढ्यात सदा पोहोचला . तो अगदी शांत होता . त्याला धाप लागली नव्हती ,ना काही भीती वाटत होती !
‘मग हा पळाला का बरं ? ‘
” अरे काय लेकांनो एवढे घाबरता ? मंग आले कशाला फटाकडीला शोधायला ? “
“सापडली का ? सापडली ?”
“नाही पण एक जन तिथे विहिरीवर बसला होता . मी याना बोलवायला आलो त चालला गेला ! परत आमी विहिरीजवळ आलो याना सांगितलं त यांना वाटलं भुताड असल ! हे लगेच पळाले ! मी तिथंच थांबलो त तो आला ! “
” काय म्हनला ?”
” काई नाई ! विचारत होता काय झालं म्हणून ! मी सांगितलं फटाकडी सापडत नाहीते ! “
“मंग काय म्हनला ?”
“कशी दिसत व्हती म्हने ? “
“मंग ?
“मी सांगितलं ! “
“काय ?”
“कशी दिसत व्हती ते ! “
“अरे सुकाळीच्या ! तो काय बोलला ते सांगना ! “
एक म्हातारा खवळला .
“कोन होता ? कसा दिसत होता ? “
सदाने सांगितलं तसा म्हाताऱ्याचा स्वर थरारला !
” अर तो आपला धन्या होता ! “
“कोन धन्या ?”
“अर तो धन्या नाही का ? वीस वर्षांपूर्वी मेला तो ! “
“काय ?”
” अर तो मेंढया चरायला न्यायचा तो ! एकदा तिकडेच खपला ! कोणतरी पाहिलं . अन त्याचा मुडदाच घरी आला ! “
“मंग तो रातीचा का फिरतोय ? “
“आर येडचॅप भूत राती नाई तर काय दिवसा फिरल ?बरं तो गेला कुठं ?”
“कुठं मंजी ? माया मागच येत होता ! म्हनजे इकडच येत होता ! “
“काय ?”
” व्हय ! “
कुनीतरी ओरडलं ,
” आरं पळा ! धन्या येतोय ! “
धन्या येतोय कुणाला कळलं की नाही समजलं नाही पण पळा म्हटल्यावर जो तो आपल्या घराच्या दिशेने पळत सुटला ,फक्त सदा सोडून !
तो बिचारा परत डोकं खाजवत राहिला .
“आता हे समदे का पळाले ? “
काही क्षणात चावडी ओस पडली . सदा एकटा तिथं राहिला आणि एक काळीकभीन्न आकृती चावडी जवळ येऊन थांबली ! नजर सदावर होती
“तू नाई पळाला ? ”
” नाही ! ”
” का बरं ? तुला भ्या नई वाटत ? “
“कुनाचं ?”
” माझं ?”
” नाई ! ”
” मंग मघाशी का पळाला होतास ? “
“असंच ! “
“आरं पन तुला पळताना पाहून ते इकडं बोंबटया मारत आले ना ! “
“येडेच हायेत ! फटाकडीला शोधणं महत्वाचं की घाबरणं महत्वाचं ?”
“आरं पन तू एकटा कसा शोधणार ? “
“तू हाईस ना ! “
” मी ?”
” मंग तू मदत न्हाई करणार ? तिला शोधायला ? “
“अरे पन तुला म्हाताऱ्याने सांगितलं ना मी कोन हाये ते ?”
“हां …. ! तो म्हनला भूत का काहीतरी ते …. ! “
“तरी तू घाबरत न्हाईस ? “
” अरे पन तुला घाबरायचं कशाला ? जरा मोठा दिसतोस म्हनून ? अन फटाकडीला शोधणं महत्वाचं की घाबरणं ? नादान पोरगी ए ! काई कमी जास्त झालं मंग ? तू मदत करनार ना ? ….. ”
सदाच्या डोळ्यात पाणी आलं .
“चल ,चल मायाबरोबर ! “
अन सदा निघाला त्या आकृतीच्या मागं ….. !
माणसांनी साथ सोडली पन जो मेला होता तो मदतीला आला होता ! …..
To Be Continued……


