-: ब्राम्ही :
मराठी भयकथा | Marathi Horror Story |
लेखक :- योगेश वसंत बोरसे |


-: माझ्या आगामी कादंबरीचा पूर्वार्ध :-
खूप खूप वर्षांपूर्वी म्हणजे साधारण१०० ते १५० वर्षांपूर्वी ,जेव्हा भारतात परकीय सत्ता असल्याचा काळ !
स्त्री स्वातंत्र्य हा प्रकार तेव्हा नव्हता . स्त्री म्हटली की चूल आणि मूल इतकंच तिचं आयुष्य आणि जबाबदारी .
जेव्हा एकाच कुटुंबात चार पाच मुलं , चार पाच मुली सहज असायच्या .कुणाची दोन कुटुंब , कुणाचं एकच मोठं कुटुंब . पसारा मोठा .
असाच एक धनाढ्य व्यक्ती !
गांव छोटंसं ,सुरंगी ! पण आजूबाजूच्या पंचक्रोशीत त्यांच्या तोलामोलाची व्यक्ती नव्हती . नाव पण वजनदार !
धनंजय कुलकर्णी !
पिढीजात श्रीमंती !
जोपासलेली !
साकारलेली !
कष्टाने त्यात भर घातलेली
! त्यामुळेच अमरवेलीसारखी फोफावलेली !
जमीन एवढी की कधी मोजायची वेळच आली नाही .
अशाच या धनाढ्य व्यक्तीचे कुटुंबपण मोठे होते . दोन बायका !
दोन का ?
तर पहिलीला मुलबाळ होत नव्हतं म्हणून दुसरी केली . दुसरीला मुलगी झाली .
मुलगी सुंदर ! श्रीमंतांची पोर – जणू फुललेलं कमळच !
नांव ठेवण्यात आलं ,फुलासारखंच सुंदर –
ब्राम्ही !
ब्राम्ही सर्वांची लाडकी !
बरं पायगुण एवढा चांगला की तिच्या जन्मानंतर तिच्या मोठ्या आईला ,शेवंती बाईला म्हणजेच धनंजय शेटच्या पहिल्या बायकोला पण मूल झालं !
मूल सुंदर होतं ,पण दगावलं . शेवंतीबाईला हसावं की रडावं कळत नव्हतं .एका मागे एक तीन मुलं वारली .
धनंजयशेठ ची दुसरी बायको म्हणजे कृष्णाई ,तिला आणखी दोन मुलं झाली. ते जेमतेमच होते दिसायला .
म्हणजे ब्राम्हीच्या खानदानी सौंदर्यापुढे ते तिचे भाऊ वाटत नव्हते . शेवंतीबाईला सुरुवातीला काही वाटलं नाही . जो पर्यंत वय होतं ,तो पर्यंत आशा ही होती की मुलं होतील ,वाचतील ,निदान एखादं तरी वाचेल !
पण जसं वय वाढत गेलं तशी शक्यता मावळायला लागली आणि मनातील द्वेष चेहेऱ्यावर दिसायला लागला फक्त वागण्यात अजून येत नव्हता .
त्यात ब्राम्ही जशी मोठी होत गेली ,तिचं सौंदर्य खुलत गेलं . पूर्ण पंचक्रोशीत तिच्या एवढी सुंदर मुलगी नव्हती ! ती तिच्या गावाचं भूषण होती ! बापाचा अभिमान होती !
पण …. म्हणतात ना सौंदर्य शापित असतं ! सौंदर्याला नजर लागते . सुख जास्त वेळ एका जागी टिकत नाही .
वयाच्या पंधराव्या वर्षी ब्राम्ही गेली . गेली म्हणजे देवाघरी गेली !
कशी गेली ,कारण कळालं नाही नेमकं ! पण छोटंसं आजारपण निमित्त झालं ! कुणी काय बोलायचं ,कुणी काय बोलायचं !
एवढी सुंदर ,धडधाकट पोरगी ,एवढ्याशा तापाने कशी जाईल ?
काही तरी वेगळाच प्रकार आहे !
आणि जाणते अजाणते पणी शेवंतीबाईंचं नांव त्यात यायला लागलं .
धनंजय शेठ आणि ब्राम्हीची आई कृष्णाई यांच्यासाठी हा मोठा धक्का होता . ब्राम्ही त्यांचा गर्व होती . अभिमान होती . भूषण होती !
तिच्या जाण्याने धनंजय कुटुंबाला अवकळा आली .
लोकांची कुजबुज धनंजय शेठच्या कानावर आली .त्यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केलं . पण रोज तेच कानावर यायला लागलं . तसं त्यांचं ही मत परिवर्तन झालं . ते शेवंती बाई पासून दूर राहायला लागले .तिला हे सर्व असह्य झालं . आणि एक दिवस भडका उडाला !
” माझी मुलं मेली तेव्हा तुम्हाला काहीच वाटलं नाही . मग आता का एवढा विचार करताय ?
लोक काहीही बोलतात . त्यांचं ऐकून मला दूर कराल तर मी ते सहन करणार नाही ! माझं नांव यात गोवलं गेलंय ,पण माझा यात काहीही संबंध नाही ! आणि तुम्हाला तसंच वाटत असेल तर मी काहीही करिन पण ब्राम्हीला परत आणीन ! “
तिच्या बोलण्याने धनंजय शेठ विचारात पडले . ही जर एवढं ठामपणे सांगतेय तर खरोखर हीच काही संबंध नसेल !
आपणच मुलीची काळजी घेतली नाही . आपण त्यात कमी पडलो . पण तरीही नुसत्या तापाने एखादा जीव कसा जाईल ?
प्रश्न सुटत नव्हता . पेच वाढत होता .त्यात ही ब्राम्हीला परत आणायला निघाली आहे . पण कसं शक्य आहे ?
गेलेली व्यक्ती कधी परत येते का ?
आपण या हातानी तिचा अंतिम संस्कार केला !
तिच्या आठवणींनी धनंजय शेठ ला कळवळून आलं . त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं . आणि ते ढसाढसा रडायला लागले . शेवंतीबाई त्यांच्या जवळ गेल्या ,ते लहान मुलासारखे त्यांना बिलगले . आणि बराच वेळ रडत राहिले .
शेवंतीबाई त्यांची पाठ थोपटत राहिल्या . सांत्वन करत राहिल्या . या दुःखाचा निचरा होणं गरजेचं होतं ! हे सर्व कृष्णाई समोर घडत होतं .पण त्या हतबल झाल्या होत्या !
डोक्याएवढी पोर गेल्यावर त्यांना कशातच स्वारस्य नव्हतं. त्यात शेवंतीबाईंचं बोलणं ऐकून त्यांना ही खरं वाटलं . ही बाई आपल्या मुलीला का मारेल ?
तिच्या डोळ्यात आसवांनी गर्दी केली . ती भिंतीला टेकून फुंदत राहिली . धनंजय शेठला कृष्णाईचा आवाज ऐकू आला तसे ते भानावर आले . त्यांनी डोळे पुसले आणि उद्विग्न मनाने काही न सुचून ते कृष्णाई जवळ आले . तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला आणि हळूहळू खोलीच्या बाहेर पडले .
शेवंतीबाई कृष्णाई जवळ गेल्या . तशी कृष्णाई त्यांना बिलगली. आतापर्यंत आसवानी घातलेला बांध फुटायला लागला आणि कृष्णाई रडायला लागली .
“रडू नकोस ! दुःख आवर ! मी तुझ्या ब्राम्हीला परत आणीन ! ”
शेवंतीबाईने कृष्णाईला थोपटत सांगितलं . कृष्णाई म्हणाली ,
” ताई असं कसं म्हणता ? ती तुमची पण मुलगी होती ! माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला जवळची होती ! “
“म्हणूनच मी म्हणतेय ,धीर धर ! मी आपल्या ब्राम्हीला परत आणीन ! “
“पण ताई ,ते कसं शक्य आहे ? एकदा गेलेली व्यक्ती परत येते का ? ”
कृष्णाई समजूत काढत म्हणाली .
शेवंतीबाई शून्यात बघत होत्या लक्ष भलतीकडेच होतं .डोक्यात वेगळेच विचार ,निर्धार घोळत होते आणि तो ठामपणाचेहेऱ्यावर दिसायला लागला आणि तोंडातून शब्द बाहेर पडले ,
” कृष्णाई ,या जगात अशक्य काहीही नाही . फक्त करायची तयारी हवी ! सामर्थ्य हवं ! इच्छाशक्ती हवी ! मी ब्राम्हीला परत आणीन ! तुला मदत करता आली तर कर ,आपण दोघी मिळून तिला परत आणू ! “
“ताई ,काहीही करा ,काहीही सांगा ,पण माझ्या ब्राम्हीला परत आणा हो ! “
शेवंतीबाईंच्या डोळ्यात निर्धार होता ,चमक होती ,जसं काही तिला माहित होतं की आपल्याला काय करायचं आहे ते ! किंवा तिला उत्तर सापडलं होतं … !
” उठ , रडू नकोस। बराच वेळ झाला ,पोरांना भूक लागली असेल ,त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नकोस ! सोन्यासारखी मुले आहेत , त्यांची काळजी घे ! त्यांना नीट सांभाळ ! “
शेवन्तीबाईनी कृष्णाईला थोपटलं , शांत केलं . कृष्णाई लगबगीने उठली स्नान गृहात गेली ,तोंडावर पाण्याचे सपके मारले . पदराने तोंड पुसले आणि स्वयंपाकला लागली .
शेवंतीबाई तिथेच मंचकावर बसल्या . डोळ्यात चमक तशीच होती . फक्त विचारपूर्वक पाऊल उचलणं गरजेचं होतं . मनातील विचार ठाम होता ब्राम्हीला परत आणण्याचा !
पण कसं …. ?
➣➣➣➣➣➣
धनंजय शेठ खोलीतून बाहेर पडले . आता ते बरेच सावरले होते . त्यांच्या मनातील किल्मिष थोडं फार का असेना दूर झाली होती . कामाकडे लक्ष देणं गरजेचं होतं . बरेच दिवस झाले कामं खोळंबली होती. त्यांनी गड्याला आवाज दिला . गडी आला .
“काय मालक ?”
“अरे जरा दिवाणांना बोलावलंय म्हणून सांग ! “
“जी धनी !”
काही वेळात दिवाण आले ते गंभीर मुद्रेने ! मान खाली घालून उभे राहिले ,
” सरकार ,आपण बोलावलंत ?”
“हो , बऱ्याच दिवसांची कामं खोळंबली असतील ना ,ती उरकून घेऊ म्हटलं , या बसा ! “
आणि दिवाण त्यांना धीर गंभीर आवाजात सर्व कामाची माहिती देऊ लागले . बराच वेळ झाला ,जेवायची वेळ झाली होती तसा घरगडी कृष्णाईचा जेवायचं निरोप घेऊन आला ,
“मालक , जेवायला ….. “
“आलोच म्हणावं ..”
काही वेळात दिवाणजींनी बोलणं आवरलं .
” दिवाणजी .चला जेवायला !”
” सरकार ,आज उपवास आहे ! तुम्ही जेवण करून घ्या तोवर मी शेतावर जाऊन येतो . एका ठिकाणी विहिरीचं काम सुरु केलं आहे ते कुठवर आलं ते बघून येतो ! येऊ मी सरकार ? “
“हो या ,नाहीतर असं करा थोडा वेळ थांबा ,जेवण झालं की सोबत जाऊ ! माझं ही बाहेर जाणं झालं नाही एवढ्यात ! “
“सरकार ,तुम्ही म्हणाल तसं ! ”
धनंजय शेठ जड पावलांनी जेवणासाठी गेले . ब्राम्हीचा चेहेरा डोळ्यासमोरून हलत नव्हता . ती आपल्या आसपास आहे ,वावरते आहे असं भासत होतं ! ते स्वयंपाक घरात गेले . स्वयंपाक घर मोठं होतं !
एका बाजूला प्रशस्त टेबल जेवणासाठी ठेवला होता . आणि आजूबाजूला सागाच्या दमदार प्रशस्त खुर्च्या होत्या . मुलं त्यांचीच वाट बघत होती . त्यांची नजर मुलांवर गेली . मुलं केविलवाणी होऊन त्यांच्याकडे बघत होती .
ते मुलांजवळ गेले दोघांच्या डोक्यावरून ,पाठीवरून हात फिरवला ,तशी मुलं खुर्चीवरून उठून त्यांना बिलगली आणि रडायला लागली . स्पर्शामध्ये बापाचा आधार शोधायला लागली . त्यांची ही लाडकी बहीण गेली होती .त्यांना तर ते ही समजत नव्हतं की नुसता ताप येऊन ताई कुठे गेली ?
धनंजय शेठ ला गहिवरून आलं ,ब्राम्ही जाण्याच्या दुःखात आपण मुलांकडे दुर्लक्ष करतोय , हे योग्य नाही !
त्यांना आपली चूक समजली . कृष्णाई कडे त्यांना पाहवेना . तिचा चेहेरा पांढरा फटक पडला होता !
‘ काय हिची अवस्था ?
हिला यातून बाहेर कसं काढणार ?
शेवंती नेमकं काय करणार ए ?
ब्राम्हीला परत आणणं तर ब्रम्ह देवाला ही शक्य नाही ! मग ही … ‘
विचार करता करता ते जेवायला बसले .
‘बघू काय होईल ते …’
जेवण उरकून धनंजय शेठ बाहेर आले . तर समोर शेवंतीबाई होत्या ,
” सरकार थोडं बोलायचं होतं ! “
” रात्री बोलू हं ! बरीच कामं उरकायची आहेत . जेवण करून घ्या दोघींनी ! “
एवढं बोलून ते निघून गेले !
जेवण उरकून शेवंतीबाई जरा विसावल्या होत्या . आज बऱ्याच दिवसाने मन आणि डोकं शांत होतं . त्यामुळे पडता क्षणीच डोळा लागला आणि गाढ झोप लागली .
झोप इतकी गाढ लागली की किती तास गेले समजलं ही नाही .
तिन्ही सांजेची वेळ झाली . तशी कृष्णाई त्यांना उठवायला आली . त्यांच्या चेहेऱ्यावरील शांत भाव पाहून कृष्णाईला बरं वाटलं . किती दिवसांनी आज या शांत झोपल्या आहेत !
पण आपल्या नशिबी हा शांत पणा नाही !
थोडासा डोळा लागला की ब्राम्ही समोर दिसते !
काही सांगायचा प्रयत्न करते ,पण आपल्याला कळत नाही !
काय म्हणणं असेल तिचं ?
या तिला परत आणायचं म्हणतायेत पण कसं ?
की फक्त आपलं मन राखण्यासाठी सांत्वन करण्यासाठी ?
आणि समजा खरंच ब्राम्ही परत आली तर ?
ती कशी असेल ?
ती आपली ब्राम्ही नसेलच ! जिला आपण जन्म दिला ती तर … ‘
शेवंतीबाई अलगद उठून बसल्या होत्या ! त्यांची झोप झाली असावी किंवा त्यांना कृष्णाईची चाहूल लागली असावी .
” ये गं ! बस ! “
त्या मायेने म्हणाल्या .
” ताई , बसून चालणार नाही . दिवे लागणीची वेळ झालीय . हे कधी ही घरी येतील . तुम्हाला उठवायला आले होते. बऱ्याच दिवसांनी एवढं शांत झोपलेलं पाहिलं . “
” हो ना ! मला ही समजलं नाही गं , इतकी गाढ झोप कशी लागली ते ? पण आज प्रसन्न वाटतंय ! “
“काही विशेष ?”
” हो ! खासच ! आपली ब्राम्ही स्वप्नात आली होती ! “
ब्राम्हीचं नांव ऐकलं आणि कृष्णाई व्याकुळ झाली .
तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले . तिने धीराने डोळे पुसले आणि म्हणाली ,
” ताई ,एक सांगू ? राग मानू नका !तुम्ही दुपारी जे म्हणालात ते मनावर घेऊ नका . ते शक्य नाही ! एकदा गेलेली व्यक्ती पुन्हा येणं निसर्ग नियमात बसत नाही ! “
” आणि आली तर ?”
शेवंतीबाईंच्या थंड स्वराने कृष्णाई दचकली . तिने त्यांच्या डोळ्यात पाहिलं .
‘ आपल्यापेक्षा जास्त धसका घेतलाय यांनी , ब्राम्ही जाण्याचा ! यांचा पोरीत जास्त जीव होता ‘ . कृष्णाई काही बोलत नाही म्हटल्यावर शेवंतीबाईने पुन्हा विचारलं ,
” आली तर ? तू तिला स्वीकारणार नाहीस ?”
” ताई ,निसर्गाविरुद्ध गेल्यावर माणसाला त्याची शिक्षा भोगावी लागते ! किंमत मोजावी लागते ! आणि आपण ती मोजू शकतो का ,हा विचार अगोदर करायला हवा ! “
” म्हणजे ? ” शेवंतीबाईंनी विचारलं .
” म्हणजे असं की जिवाच्या बदल्यात जीव जाईल किंवा आणखी बरंच काही ! “
कृष्णाईच्या बोलण्याने शेवंताबाई दचकल्या .
” कृष्णा ,याचा अर्थ आपली ब्राम्ही अशीच गेली असेल ? कुणाचा जीव वाचवण्याकरिता आपल्या ब्राम्हीचा बळी दिला गेला असेल ? कारण तिच्या कुंडली प्रमाणे ती दीर्घायुषी होती !
आणि चालती फिरती पोरगी एवढ्या शुल्लक आजाराने मरू शकत नाही ! आणि ती तर कधी आजारी पडलेली ही मला आठवत नाही ! नाजूक होती पण कणखर होती ! मग ताप येणं ही … तो ही विनाकारण … “
कृष्णाईला आपल्या बोलण्याचं आश्चर्य वाटलं . हो असंच झालं असावं !
” पण ताई ? असं कोण करेल ? “
तोच करू शकतो ज्याचा जीव धोक्यात असेल ! आणि ज्याला यातलं माहित असेल ! कळत असेल ! ज्ञान असेल ! “
” पण आपल्या आसपास असं कुणी आहे ? म्हणजे तुमच्या लक्षात आलंय कुणी ?”
“काही सांगता यायचं नाही ! यांच्याशी बोलावं लागेल ! ते ऐकणार नाहीत ,पण माहिती तर काढू शकतात ?”
➣➣➣➣➣➣➣
रात्र झाली तसे धनंजय शेठ घरी आले . ते पण बरेच शांत वाटत होते . रात्रीची जेवणं उरकली तशी दोघींची नजरानजर झाली आणि त्यांनी धनंजय शेठ शी बोलण्यासाठी त्यांच्या शयन कक्षात प्रवेश केला . त्या दोघीना सोबत पाहून शेठला आश्चर्याचा धक्का बसला . त्यांच्या चेहेऱ्यावर कधी नव्हे ते स्मित हास्य तरळलं .
” आज काय विशेष ? दोघी एकत्र ? “
” सरकार ,थोडं बोलायचं होतं ! “
शेवंतीबाई म्हणाल्या .
तसे धनंजय शेठ मंचकाला टेकले . दोघी मंचकावर विसावल्या .
” आम्हाला वाटतं की आपली ब्राम्ही मेली नाही तर मारली गेलीय ! “
“काय ?”
“हो ! “
“कुणी सांगितलं ?”
“नाही ! कुणी सांगितलं नाही . पण तुम्हीच सांगा तिचा मृत्यू तुम्हाला तरी मान्य आहे का ? ती दीर्घायुषी होती ,पंडितजींच्या म्हणण्याप्रमाणे ! नाजूक होती पण कणखर होती ! तुम्हाला ती कधी आजारी पडलेली आठवतेय ?
नाही ना ? मग एवढी धडधाकट पोरगी तापाने मृत्युमुखी पडावी ? आणि तिला ताप ही का यावा ? कुठे जाणं नाही ,येणं नाही !
बरं पाळीही व्यवस्थित होती . थोडी कणकण वाटायची कधी कधी , पण एवढा ताप बीप आला नाही कधी ! बरं एखादी साथ म्हणावी तर तिच्या व्यतिरिक्त कुणी दगावलेलं आढळलं का तुम्हाला ? “
” किंवा मग कुणाला वाचवण्या करीता …. “
” पण असं कोण करणार ए ?”
” तोच करू शकतो ,ज्याला यातील माहिती असेल , ज्ञान असेल , ज्याचा स्वतःचा किंवा त्याच्या आप्तेष्टाचा जीव धोक्यात असेल ? “
“पण असं कुणाचा जीव घेऊन कुणाचा जीव वाचवता येतो का ?”
” सरकार , हे आपलं मत झालं ! पण ज्यांना करायचे ते असले उद्योग करतातच ना ? “
धनंजय शेठ चा चेहेरा गंभीर झाला . असल्या गोष्टींवर त्यांचा विश्वास असेल असं दोघीना वाटत नव्हतं . पण या एकाच विचारावर या दोघी जर ठाम असतील , एकत्र येत असतील तर त्यांना विरोध करण्याचं कारण नव्हतं .
त्यामुळे या विषयावर लगेच प्रतिक्रिया देणं चुकीचं ठरलं असतं . कदाचित यांच्या म्हणण्यात तथ्य असू शकतं ! किंवा जशी आपली ब्राम्ही गेली तसं अजून कुणी जाऊ नये एवढी काळजी आपण घेऊच शकतो . या विचारावर येऊन ते थांबले .
त्यांनी दीर्घ सुस्कारा सोडला .
“ठीक ए ! मी बघतो काय करायचं ते ! तुम्ही काळजी करू नका ! ” एवढं बोलून ते उठले आणि तडक बाहेर निघाले .
त्यांची प्रतिक्रिया पाहून दोघींना आश्चर्य वाटलं . हे इतके झटपट पावलं उचलतील असं दोघींनाही वाटलं नव्हतं . त्यांच्यासाठी हा सुखद धक्का होता !
TO BE CONTINUED ….
➣➣➣➣➣➣➣➣



