त्या जुन्या मातीच्या घरात | मराठी रहस्यमय भयकथा | लेखक :- योगेश वसंत बोरसे |Marathi Suspense Horror Story

त्या जुन्या मातीच्या घरात | मराठी रहस्यमय भयकथा |

 

लेखक :- योगेश वसंत बोरसे .

ही माझ्या नवीन कादंबरीची सुरुवात आहे . तुम्हाला नक्की आवडेल अशी खात्री आहे …… 

नमस्कार :-

 माती , घर … यांच्याशी आपलं खूप जुनं नातं असतं . पण नाविन्याच्या शोधात नावीन्याच्या हव्यासाने , आपल्या महत्वाकांक्षांनी आपण जुन्या गोष्टींशी नाते तोडतो . आपल्या जगात वावरायला लागतो . पण जेव्हा या गोष्टी आपल्याला साद घालतात तेव्हा …?
अशी एखादी कथा निर्माण होते …..
  सुलक्षणा .. नावाप्रमाणेच सुलक्षणी होती . तिला आपलं असं  कुणी नव्हतं . म्हणजे … आता राहिलं नव्हतं … म्हणजे तिच्या लेखी त्यांना किंमत नव्हती . आणि का असावी ? हाच तिचा प्रश्न होता . …
  वैशाख वणवा पेटला होता …अर्थात कडाक्याचं ऊन अंगाची लाही लाही करत होतं … अन त्या कडाक्याच्या उन्हात सुलक्षणा आपल्या छोटयाश्या घराच्या मातीच्या  भिंतींना ,आतून , बाहेरून  मातीने लेपन करत होती . वरचं छत जमेल त्या काड्या कामट्यांनी ,झावळ्यांनी आच्छादलं होतं .तर कुणी दिलेलं फाटकं प्लास्टिक हि त्या छताचा हिस्सा झालं होतं ,एक भाग झालं होतं . बाहेर मन मानेल तेवढं अंगण तिचंच होतं ! तिच्यासाठी ते घर होतं ,तिची वास्तू होती ,पण इतरांसाठी …झोपडी …. !
…..कारण गावात वस्तीच्या मध्यभागी असून ही तिच्या सभोवतालचा जवळजवळ एक किलोमीटर चा परीघ जागा रिकामी होती . जी काही वस्ती ,घरे , दुकाने , शाळा ,जे काही होतं ते सर्व तेवढी जागा सोडून होतं ! कुणी प्रयत्नच केला नाही , तिथे राहण्याचा , जम बसवण्याचा असं नाही . पण ज्यांनी काही केलं ते एक तर संपले होते . संपवले गेले होते नाहीतर वेड तरी लागलं होतं …….
असं असताना सुलक्षणा साधारण ५० वर्षांपासून तिथे अगदी सहज राहत होती . तिच्या बाबतीत कुणाला फारसं  माहित नव्हतं . आणि ज्यांना काही माहित असेल ते बोलायची हिंमत करत नव्हते . कारण सुलक्षणाच्या असण्याला प्रथम पासूनच एक गूढ वलय निर्माण झालं होतं ..
  ती लोकांकडे घरकाम करायची . धुनी भांडी तर कुणाच्या घरी स्वयंपाक ! पण तिने वागताना ,बोलताना कधी मर्यादा सोडली नव्हती की मान वर करून कुणाशी वरचं आवाजात बोलली नव्हती . त्यामुळे तिचा आदरयुक्त दरारा होता . धाक होता . ज्या लोकांना त्या जागेशी काही घेणं नव्हतं त्यांच्यासाठी सुलक्षणा एक आदर्श होती . काही जण तर टरकून असायचे . ती जेवढं बोलायची तेवढंच उत्तर मिळायचं , पैसे मागितले तर पैसे मिळायचे .
  पण म्हणून तिने कधी त्या गोष्टीचा गैर फायदा घेतला नाही . कदाचित म्हणूनच असावं ,तिच्या शब्दाला किंमत होती . पण तरी काही टाळकी उपद्व्यापी असतातच . त्यांना सुलक्षणाचं तिथे राहणं खटकायचं . एक दोनदा प्रयत्न ही झाला ,तिला त्रास देण्याचा ,तिथून हुसकावण्याचा ,पण व्यर्थ उपयोग झाला नाही ……. पण म्हणून त्यांनी प्रयत्न करायचे सोडले नाहीत .
आणि आज …. त्यांनी पुन्हा तो निर्णय घेतला . आपल्याला जर कुणालाच या जागेत राहता येत नसेल , ही जागा वापरता येत नसेल तर हिने एकटीने का वापरावी ? का राहावं इथे ?
.. आणि म्हणून त्यांनी एक भयानक निर्णय घेतला …. ती झोपडी पेटवून देण्याचा .
पण सुलक्षणा ? तिचं काय ? समजा ती मेली तर ? तिचे हितचिंतक ही भरपूर होते . त्यामुळे समजा उद्या आपण पकडले गेलो तर अडचण नको म्हणून त्यांनी एक ठरवलं की काही निमित्त करून सुलक्षणा त्या झोपडीच्या बाहेर राहील ,गावात राहील किंवा कुणाकडे सुरक्षित राहील असं बघायचं !
पण हे काम करणार कसं ?
  कारण सुलक्षणा कामाशी काम ठेवायची , कुणाशी जास्त बोलायची नाही . कुणाच्या घरी कामाशिवाय जाणं तिला आवडायचं नाही . शेवटी ही  जबाबदारी एका बाईने घेतली . आणि ती आत्ता सुलक्षणाच्या दारात उभी होती .
” कुणी आहे का ?” तिने बाहेरूनच आवाज दिला .
” कोण पाहिजे ?”
मातीने भरलेले हात तसेच ठेवून त्याच हातांनी सुलक्षणा केस सावरत बाहेर आली .
” सुलक्षणा मावशी तुम्हीच ना ? “
” हो ? कोण आपण ?” तिची भाषा अत्यंत शुद्ध होती . शहरी माणसाला लाजवेल अशी .
“मी ओळखलं नाही . “
” मावशी ? मला ओळखलं नाही ? मी सुलु .. तुझी बहीण नाही का सुलभा .. तिची पोरगी ….. सुलेखा ! “
नांव ही खोटं , ओळख ही खोटी …..
” सुलु … सुलेखा …. नाही आठवत नाही …. म्हणजे माझी कुणी बहीण ही  नाही आणि भाची ही नाही . “
” मावशी ,असं काय करतेस ? मी का खोटं बोलेन ? वयोमानाने विसरतो माणूस . तसेच चेहरे ही बदलतात …. तू ही खूप बदललीस …. गावात विचारलं , एकाने आणून सोडलं ,म्हणून इथं पर्यंत पोहोचले , नाहीतर अवघड होतं … “
“… बरं .. काय काम होतं ..?”
” मावशी ..? पाणी ही विचारलं नाहीस गं ? किती बदललीस … “
सुलक्षणाला समजलं होतं . ही आपल्याला परिचयाची नाही ! पण दारापुढे आलेला आगन्तुकालाही असं हाकलून देता येत नव्हतं . नाईलाज झाला आणि ती झोपडीच्या आत आली . एका नजरेत झोपडी नजरेखालून घातली . ती फक्त बाहेरून झोपडी वाटत होती . आतला व्यवस्थितपणा , टापटीप वाखाणण्यासारखी होती . सुलक्षणाने हात धुतले .
” ये बाई …. बस …” सुलक्षणाने तिला बसायला पाट दिला .
” मावशी ? एकटीच राहतेस ? मावसा ,पोरं कुठे गेले …. ? “
सुलक्षणाची आता खात्री झाली ,हिला आपल्याबद्दल काहीही माहिती नाही ….
” काय काम होतं ? “
” मावशी ,आईला बरं नाही . का माहित नाही पण ती तुझी  आठवण काढतेय ,ती शेवटच्या घटका मोजतेय . आईला जमिनीवर झोपवलंय . कधीही जीव जाईल तिचा …. सारखी तुझं नांव घेत होती . मला ही समजेना , शेवटी आत्याने तुमची ओळख सांगितली . तुमच्या गावाचं नांव सांगितलं ,तेव्हा लगेच निघाले . मावशी हात जोडते . आईला तुमचा चेहेरा एकदा बघायचाय . कदाचित तिची शेवटची इच्छा असावी किंवा तुम्हाला तिला काही सांगायचं असावं ….. असं म्हणतात की  मारणाऱ्या माणसाची शेवटची इच्छा पूर्ण करावी . पुण्य लागतं . आईचा जीव अडकलाय तुमच्यात . नाही म्हणू नका …… “
सुलक्षणा धर्मसंकटात सापडली . तिला समजत होतं ही धाधान्त खोटं बोलतेय . पण समजा खरं असेल तर ? आपल्यासाठी कुणाचं जीव तुटत असेल तर ? पण आपली स्मरणशक्ती एवढी कमजोर झाली की आपल्याला काहीच आठवत नाही ? आणि हीच हेतू ही  समजत नाही . काय हेतू असणार हीचा ? हिच्या आईचा ? आत्याचा ? की अजून कुणी याच्या मागे आहे …? हो नक्कीच ….
हट्ट करून फायदा नव्हता . एखादा मरतोय ,आपल्यात जीव अडकतोय तर जाणं भाग आहे ….
” बरं , कुठे जायचं म्हणालीस ? “
” वार्कीला “
” वार्की ? ते तर बरंच लांब आहे . “
” हो बस ने दोन तास तरी लागतील … “
” अगं पण बस कुठून मिळणार ? गांवात ही एक दोन तासाने बस येतात . त्यात वार्की साठी बस कधी मिळेल ,काय माहित ? आणि तोवर तिकडे काही कमी जास्त झालं तर …? “
” मावशी , म्हणून म्हणते , पटकन निघू . दुपार झाली आहे , निदान संध्याकाळ पर्यंत तरी पोहोचू . निघायचं  ?…. “
” बरं , एक पाच मिनिट देशील .. ? “
” हो … चालेल… “
तिचं काम झालं होतं … ती आनंदात होती . आणि हेच सुलक्षणाला समजेना , हिची आई मरणाच्या दारात असताना हिला आनंद कसला होतोय ? काहीतरी गडबड आहे ! सावध राहावं लागेल …..

 

“लेखकाकडून टीप: या कथेचा पुढचा रहस्यमय भाग लवकरच अपडेट होत आहे…” { प्रथम प्रकाशन :- डिसेंबर -२०२५ }

 

आता पुढील भाग ……

27 jun 2026 :- 

त्या जुन्या मातीच्या घरात | मराठी रहस्यमय भयकथा |

                                      { 2 }

……सुलूचा आनंद गगनात मावेना ! सुलक्षणा एवढी सहज तयार होईल असं तिला वाटलं नव्हतं . मिळणार मोबदला काही फारसा नव्हता पण अगदी सहज मिळणार होता . मिळणाऱ्या पैशात अगोसीडर काय करायचं याचा विचार करत होती . 

 ” चल …. “

सुलक्षणाच्या आवाजाने ती भानावर आली . 

” अं..? हो ! चला … “

सुलक्षणाने दार लोटून घेतलं … 

” हे काय मावशी ? कुलूप नाही लावलंस ? “

 सुलक्षणाच्या चेहेऱ्यावर गूढ हास्य उमटलं …  

” पोरी ,कोण काय घेऊन जाणार आहे ? जे आहे ते त्याचच आहे तो सांभाळेल ! “

सुलेखाला याचा अर्थ समजला नाही . तिने वेगळाच अर्थ काढला . 

‘ लोकं म्हणतात तशी वाटत नाही . बावळट वाटते .. कुणाचे आहे ? काय आहे ? कोण सांभाळेल ? माहित नाही … पण ज्यांना हात साफ करायचा आहे ते ….. ‘ 

त्यांचं काम सोपं झालं होतं …. मावशीने घर उघडं ठेवलं हे जास्त सोपं आणि महत्वाचं झालं होतं …. 

अर्थात सुलेखा मनोमन सुखावली . आणि लगबगीने निघाली . सुलक्षणा सोबत .. तिच्या मागे …. क्षणभर थांबून आपल्या झोपडीवजा घराकडे बघितलं आणि काही पुटपुटली … आणि चालायला लागली …. 

रस्त्यात काही ओळखीची घरे लागली . जिथे सुलक्षणा काम करायची त्या बाया विचारपूस करू लागल्या … आणि काळजी घ्यायला सांगू लागल्या … 

 बोलता बोलता बस स्टॅन्ड कधी आलं .. समजलं ही नाही … आणि … सुलेखाचा मोबाईल वाजायला लागला ….. तिला वाटलं ,चांडाळ चौकडी पैकी कुणाचा असेल म्हणून ती थोडे बाजूला जाऊन बोलायला लागली … आणि तिचं धाबं दणाणलं … 

ती … तिच्या डोळ्यात आसवांनी गर्दी केली … तिचा रडवेला चेहेरा पाहून सुलक्षणा ला कळेना .. हिला काय झालं ? .. हिची आई .. खरंच …. ?… मग … गेली की काय …. ? ती सुलेखाच्या जवळ गेली … 

” सुलु काय झालं ? “

” मावशी … माझी आई .. शेवटच्या घटक मोजतेय …. “

अगं ,मग तूच मघाशी सांगितलंस ना .. म्हणून तर आपण निघालो ?…. ” 

” मावशी … मावशी .. मी मघाशी … खोटं बोलले …. तुमच्याशी … “

” म्हणजे …?”

सुलक्षणाने शांतपणे विचारलं ….. 

” मावशी मला पैसे मिळणार होते … तुम्हाला घरातून बाहेर नेण्याचे .. “

” का ?”

” बहुतेक ते तुमचं घर …. “

सुलेखाला पुढे बोलवत नव्हतं … अचानक बदललेल्या परिस्थितीने ती भांबावली होती . 

” पण मग तुझ्या आईला काय झालं ? “

” ती .. पायरीवरून घसरून पडली .. डोकं ..आपटलं … बरंच रक्त गेलंय म्हणतात …. “

” चल … जाऊ आपण …. “

सुलक्षणा शांतपणे म्हणाली … 

” पण मावशी तुमचं घर … ?”

” काही होणार नाही … ”  

” मावशी , ते लोक तुमचं घर जाळणार आहेत … तुम्हाला कळतंय का ? माझी तुमची ओळख ही नाही . आई तुम्हाला ओळखत नाही .. मग तुम्ही येऊन काय करणार ? …. ” 

” आता झाली ना ओळख ! तुझ्या आईला वाचवायचा प्रयत्न तरी करू शकतो ना … आणि समजा आपल्याला नाही यश मिळालं तरी शेवटची भेट तरी होईल …. ? “

सुलेखन चक्क पाय धरले सुलक्षणाचे … 

” मावशी कोणत्या मातीच्या बनल्या आहात तुम्ही ? मी तुम्हाला फसवलं … ते लोक तुमचं घर जाळणार  आहेत … तरी तुम्ही एवढ्या शांत कशा ? ..”

” पोरी .. या जगातील प्रत्येक गोष्ट मातीतच मिळते ! जमीनदोस्त होते .. फक्त प्रत्येक वास्तूचा गोष्टीचा कालावधी वेगळा असतो … माणसांचं ही तेच आहे … एक दिवस मातीतच मिळणार पंचतत्वात विलीन होणार …. अगदी ..तू … मी …. आपण सगळे …. फक्त कालमर्यादा .. वेगळी .. तुझी .. माझी .. तुझ्या आईची … त्या लोकांची … त्या घराची …. 

  आपण विसरतो ! तू विसरलीस ! ते विसरले … तुझी आई … मरणासन्न अवस्थेत आहे ! जर तिची जायची वेळ झाली असेल तुझं तिथे असणं गरजेचं आहे … म्हणशील त मी येते .. नाहीतर नाही …. आणि त्या लोकांना घर जाळायचेच असेल तर मी असल्यावर ही जाळायला कमी करणार नाहीत … ” 

” मावशी .. मग तुम्ही चलाच  माझ्या सोबत …. आपण नंतर बघू काय ते … “

 सुलेखाला हिंमत आली होती आणि या बाईची किंमत ही समजली होती .. आपण समजतो तशी ही नक्कीच नाही ! ही खूप मोठ्या ताकदीची आहे .. काहीतरी अलौकिक , गूढ शक्ती नक्कीच हिच्याकडे आहे ……  सुलेखाला तिचा आधार वाटत होता …. सुलक्षणाच्या बोलण्याने ,व्यक्तिमत्वाने ती प्रभावित झाली होती …. 

दोघी लगबगीने स्टॅन्ड वर आल्या … दुपार झाली होती … सूर्य डोक्यावर आला होता .. आग ओकत होता … उन्हाचे चटके बसत होते .. घामाने जीव कासावीस होत होता ….. घशाला कोरड पडत होती …. 

” दादा … गाडी कुठं चाललीय … ? ” 

” चिगूरवाडी … “

” आम्हाला वार्कीला जायचंय ….. ” 

” चिगूरवाडीपर्यंत चला .. इथून आता डायरेक्ट गाडी मिळणार नाही …. “

” बरं .. मावशी तुम्ही बसा .. मी पाणी आणते … ” 

” बस मध्ये बऱ्यापैकी जागा होती … सुलक्षणा एका सीटवर बसली … घाम पुसू लागली पदराने ….
” चला .. आले का सगळे … ? “

कंडक्टरने डबल बेल मारली … 

” थांबा दादा .. दोन मिनिट … पोरगी गेलीय पाणी घ्यायला …. “

 धापा टाकत सुलेखा बस मध्ये चढली पाण्याचं थंडगार बाटली सुलक्षणाच्या हाती देऊन सुलेखा एका सीटवर विसावली …. 

एवढ्या थंड पाण्याची सुलक्षणाला सवय नव्हती … थंडगार पाण्याने दाताला ठणक बसली …. तसा तोंडातून विचित्र आवाज आला … 

 ” मावशी काय झालं ? …. ” काही नाही ….पाणी खूप थंड आहे गं ! दात ठणकायला लागले …. सुलेखाने तिकीट काढले आणि पुढचा प्रवास न बोलता सुरु झाला … बसमध्ये फारशी गर्दी नव्हती .. पण पहिले चढणार्यांनी खिडकी जवळची सीट अडवल्याने दोघी वेगवेगळ्या ठिकाणी जागा मिळे ताशा बसल्या होत्या … 

 वार्कीला पोहोचेपर्यंत सूर्यास्ताची वेळ झाली . सूर्य मावळती कडे झुकला होता . सुलक्षणा गांव सोडून फारशी कधी बाहेर पडली नव्हती …. उजाड माळरान .. भकास गावशिव , पाण्याची वानवा …. अशा आपल्या गावातील वातावरणाची सवय असलेल्या सुलक्षणाला उन्हाळ्यातही हिरवं गार असलेलं वार्की बघून अप्रूप वाटलं …. 

  पण सुलेखाला या वातावरणाची सवय झाली होती … आणि डोक्यात आईचे विचार घोळत होते … तिला एका गोष्टीची राहून राहून भीती वाटत होती … आश्चर्य वाटत होतं …

” आई अचानक कशी पडली ? आणि ते ही मरणासन्न अवस्थेत …. या बाईने तर काही केलं नसेल ? … पण ती स्पष्ट बोलू शकत नव्हती … 

” चौधरी वाडा … “

तिने रिक्षावाल्याला घरचा ऍड्रेस सांगितला आणि मावशीला आवाज दिला .. तसं घर फारसं लांब नव्हतं … आई घरी पडल्यावर घरीच असणं शक्य नव्हतं .. पण विचारणार तरी कुणाला ? घरी जाण्याशिवाय पर्याय नव्हता …. घरी पोहोचले तशी वाड्याबाहेर गर्दी दिसली … वाड्यात ही गर्दी होती …. हिला बघितल्यावर लोकं बाजूला सरकायला लागले … 

 वाड्याच्या एका व्हरांड्यात एका पार्थिवाजवळ बाया बसलेल्या होत्या .. 

‘आई गेली … ?’

” आई …. ” सुलेखा ओरडत हंबरडा फोडत …. त्या दिशेला धावली … ती चेहेऱ्यावरची चादर बाजूला करू लागली तसा दोन तीन बायांनी विरोध केला …  

” पोरी ,नको ! बघवलं जाणार नाही … ” 

” का ?”

” अगं पार …. “

पण सुलेखन ऐकलं नाही … तिने पटकन चादर खेचली .. आणि तिचे डोळे पांढरे फट पडले … 

‘ही नेमकी पाय घसरून पडली ,म्हणून मेली की घाबरून … ? एवढी कशाने घाबरली ? आणि रक्त ? एवढं रक्त कसं वाहिलं …?’

तिचं भान सुटलं … ती सुलक्षणा कडे हातवारे करून बेभान होत म्हणाली ‘

” चांडाळणी  ! माझ्या आईचा जीव घेतलास ? कुठे फेडशील हे पाप ? तुला शिक्षाच करायची तर मला द्यायची होती ! माझ्या आईला कशाला मारलंस ? “

” सुलु कुणाला बोलतेस  ? कोण ही बाई ? नातेवाईक आहे का ? आणि ती का मारेल ? आणि कसं ? तुझी आई तर दगडी जिन्यावरून पाय घसरून पडली …. इथे आवरणारे कुणी नव्हते . तू अशी आठ पंधरा दिवस बेपत्ता असतेस …. 

पाण्याने पायऱ्या निसरड्या झाल्या होत्या ,त्यामुळे पडली . त्यात त्या बाईचा काय दोष ? “

” मावशी … तुम्हाला …. “

 सुलेखाने  शब्द आवरले . यांना सांगून काही फायदा नाही … जे झालं ते झालं … आई गेली होती ,आता ती परत तर येणार नव्हती … ती रडत रडत … सुलक्षणा जवळ गेली आणि तिच्या गळ्यात पडून रडायला लागली … सुलक्षणा तिचं सांत्वन करत राहिली …. 

” पोरी शोक आवर ! कुणी येणारं राहिलं नसेल तर अंत्यविधीला लागावं लागेल ! … उगीच सकाळपर्यंत प्रेताचे हाल करणं योग्य नाही … ” 

” मावशी … माझ्या आईला माझ्या शिवाय कुणी नव्हतं ..”

” तरी अशी वागलीस ? आईकडे दूर केलंस  ..? तिच्या नात्याचा गैरवापर केलास … ?”

 ” पण म्हणून तिचा लगेच जीव जावा ? “

सुलु या प्रश्नाने बेचैन केलं होतं …. 

  सुलु तू हे पहिल्यांदा नक्कीच केलं नसशील … या अगोदर ही तू कल्पनेमध्ये आईला मारलं असशील … कदाचित तुला ती नकोशी झाली असेल …. वास्तू तथास्तु म्हणत असते ! तिला चांगलं वाईट कळत नाही …. आता तू मोकळी झालीस .. मग कशाला वरवरचं दुःख दाखवतेस ? शोक यावर आणि तयारीला लागा  ! “

 सुलक्षणाच्या सांगण्या अगोदरच लोकं तयारीला लागले होते . रात्रभर थांबायला कुणाला वेळ नव्हता . एक सामाजिक कार्य ,सामाजिक भान ,कर्तव्य म्हणूनच लोकांनी गर्दी केली होती … वातावरण जरा गार वाटत होतं … वारा सुटला होता .. 

 थोड्याच वेळात अंत्य यात्रा निघाली … स्मशानात पोहोचली .. सुलेखाने अग्नी दिला .. आणि … अघटित घडलं …. ! 

आगीचा लोळ उठला … आणि सुलेखाच्या पदराला साडीला आस लागली आणि पदराने पेट घेतला ! 

भराभरा आग वाढली .. तशी सुलेखा बोंबलायला लागली … अंगावरील साडी काढायला लागली … लोकांनी भराभरा पाणी ओतलं तिच्या अंगावर …. आणि त्यातच चिता विझली  …… 

झाली का पंचाईत ! आता .. ? 

चार पाच बाया पुढे आल्या आणि सुलु ला कव्हर केलं . तिचे कपडे जळाले होते . आणि शरीर ही … अंगाची लाही लाही  होत होती …  ती जोर जोरात ओरडत होती …  

  कुणी तरी पटकन रिक्षा काढली तिला रिक्षात टाकलं एक दोन बाया आजू बाजूने बसल्या आणि दवाखान्याकडे रवाना झाल्या … 

तोवर रात्र झाली होती ….  प्रेताला अग्नी कसा देणार ? लाकडं ओली झाली होती .. आणि कदाचित प्रेत ही ! आता ही ओली लाकडं काढा .. ते आस लागलेलं अर्धवट जळालेले प्रेत काढा .. त्यापेक्षा इथून काढता पाय घेतलेला बरा … 

एक एक करत गर्दी कमी झाली आणि मागे चार पाच डोकी उरली आणि सुलक्षणा ! 

सुलक्षणा कमालीची शांत होती … तिचा संयम तसू भर ही कमी झाला नव्हता … तिने तिथेच बैठक मांडली . डोळे बंद केले . ध्यान मुद्रा लावून बसली . तशी ती चार पाच गावकरी मंडळी लांबच थांबली … सुलक्षणाच्या व्यक्तिमत्वाने आणि संयमाने ते भारावून गेले होते .. बाई सारखी बाई इथे थांबलीय आणि आपण …. ही बाई सामान्य  नक्कीच नाही . तिच्या असण्याने त्यांना स्मशानात ही आधार वाटत होता .. सुलक्षणा पुढे काय करते याची त्यांना उत्सुकता होती .. ७-८ मिनिटे झाली असतील … 

  तिने डोळे उघडले , प्रेताच्या {चितेच्या } दिशेने बघितलं … तोंडावरून हात फिरवला .. आणि नमस्कार  केला … हळूच उठली आणि प्रेतावरची ओली झालेली लाकडे काढायला लागली … तसे गावकरी ही पुढे आले आणि ती सांगेल तसे करू लागले .. 

  लाकडं बदलली गेली .. आणि चिता पेटवली गेली … पण चिता पेटेना … नुसता धूर … धूर …. जीव वाचवण्याच्या नादात लोकांनी चिता प्रेत सर्व काही ओलं करून टाकलं होतं … इतर ठिकाणी स्मशानात नळ असतो … पण इथे पाण्याची कमतरता नसल्याने आणि स्मशान मोकळ्यावर असल्याने गुरे ढोरे फिरायची त्यांना पिण्या साठी हौद बांधला होता पाण्याचा … तो भरलेलाच असे …. 

  पण त्याच पाण्याने आज एका मेलेल्या जीवाची विटंबना लावली होती …हाल हाल केले होते … एकच पर्याय होता .. दुसरी चिता रचून अंत्यसंस्कार करणे … 

 पुन्हा लाकडे काढली गेली आणि बीभत्स प्रेत उघडं पडलं …. पापण्या आणि चेहेऱ्याची कातडी जळाल्याने  भयानक दिसत होतं इतर अवयवांवर कुणी नजर टाकू इच्छित नव्हतं .. 

 सुलक्षणाने साडीचा काही भाग फाडला आणि त्या प्रेतावर टाकला … 

” उचला … ” अर्धवट जळालेलं प्रेत उचललं गेलं खाली ठेवलं गेलं . कुणालाही एक गोष्ट समजत नव्हती ? एवढं पाणी तर ओतलं गेलं नव्हतं .. की खालची लाकडे ही ओली व्हावीत ? ….पण आता पर्याय नव्हता …. भराभरा लाकडे काढून दुसरी चिंता रचली गेली आणि प्रेत ठेऊन रॉकेल ओतलं गेलं अन लांबूनच गवताच्या पेंडीने अग्नी डाग दिला गेला सुलक्षणाच्या हाताने …. 

धडधवून अग्नीने पेट घेतला आणि गावकऱ्यांचा जीव भांड्यात पडला .. सुटलो एकदाचे … कवटी फुटल्याचा आवाज झाला अन एकच लक्ष अनावधानाने मनगटी घड्याळावर गेलं ! रात्रीचे १२ वाजले होते ! आणि हे स्मशानात होते ! ते ही एका प्रेताच्या आणि अनोळखी बाईच्या सोबतीने ! पुढे काय वाढून ठेवलं असेल त्या देवालाच ठाऊक ! 

आपण आपलं कर्तव्य करावं ! …. 

आता थांबण्यात अर्थ नव्हता .. सर्व जण निघाले .. पण सुलक्षणा .. ? तिला कळत नव्हतं ,या अनोळखी गावात कुठे आणि कुणाकडे जावं ? 

” मावशी .. चला … “

” कुठे जाऊ बाबा एवढ्या रात्रीची … माझं कुणी ओळखीचं नाही इथं ! पोरगी आईचा निरोप ऐकून घाबरली होती म्हणून सोबत आले होते ! तिचं ही असं झालं … तिला कुठं नेलंय काही सांगता येईल का ? “

” विचारावं लागेल …. मावशी मध्यरात्र होऊन गेलीय आता … आजची रात्र आमच्याकडे थांबा … सकाळी बघू , दोन घास खाऊन घ्या चला …. “

.. सुलक्षणा नाही म्हणू शकली नाही .. त्या घरी गेल्यावर समजलं की सुलेखा ही गंभीर अवस्थेत आहे म्हणून …. 

सुलक्षणाने क्षणभर डोळे बंद केले आणि … घडलेल्या घटनांचा अंदाज बांधण्याचा आणि…..

 तिकडे काय घडला असेल याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करू लागली  ………

➣➣➣➣➣➣➣➣➣

 29-jun-2026

{ ३ } 

   इकडे .. सुलेखा सुलक्षणाला घेऊन बाहेर पडली अन चांडाळ चौकडी ने जल्लोष केला … अर्ध काम फत्ते झालं होतं … आता फक्त रात्र झाली की रॉकेल , डिझेल , पेट्रोल जे काही मिळेल ते टाकून झोपडी पेटवून द्यायची … झालं ! … 

आम्हाला नाही तर कुणाला ही नाही ! कधी अंधार पडतो याची वाट बघत  सर्व जण आतुर झाले होते ..  आणि एक जण … ? 

त्याचं काही तरी वेगळंच प्लानिंग असावं … पण त्याने कुणाला सांगितलं नाही … 

  संध्याकाळ झाली .. सूर्य मावळला .. उशिरा का होईना अंधार पडला …. जेवणं होऊन गांव आपापल्या घरात कोंडलं गेलं आणि एक तेच नतद्रष्ट कार्ट कुणाला ही  काही ही न सांगता त्या झोपडीसदृश घराकडे सावधपणे जाऊ लागलं … त्याच्या मेंदूतील त्याची योजना त्याला कौतुकास्पद वाटली आणि त्याने स्वतःचीच पाठ थोपटून घेतली … 

 बौद्धिक दिवाळं !  

 घर एकदा आतून बघावं .. काही आपल्या कामाचं .. मौल्यवान .. पैसे अडका असला तर काढून घ्यावा … असं ही जाळल्यावर सगळंच नष्ट होणार … 

मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या आणि अनामिक भीती ही ! 

तसं त्याचं हे रोजचं काम होतं कुठे न कुठे हात मारणं … पण आज .. ? 

  मनावर .. दडपण येत होतं ! का ते त्याला ही समजत नव्हतं … कदाचित सुलक्षणाच्या व्यक्तित्वाचा तो प्रभाव असावा . तो सुलक्षणाला ओळखत होता … आणि तिच्या सद्गुणांनी प्रभावित ही होता .. पण ते सद्गुण त्याला कामाचे नव्हते … 

 तसं आजूबाजूला मोकळं माळरान होतं … आणि अंधार असल्याने … कुणाचं सहज लक्ष जाणं शक्य नव्हतं … पण सावध राहणं गरजेचं होतं आणि तो त्याचा स्वभावच बनला होता . तो कसातरी घाबरत .. झोपडीपर्यंत पोहोचला … 

 दरवाजाला कुलूप नाही ? 

याचा अर्थ ? आपल्या आधी कुणी हात साफ केला की काय ? .. 

भीतीचं रूपांतर रागात झालं आणि दारावर लाथ घातली .. तसा दरवाजा उघडला गेला … अंधारात .. त्या झोपडीत हालचाल होत होती ! …. त्या अंधाराची सवय व्हायला काही क्षण गेले … कुणाची तरी चाहूल लागली … आत .. आत कुणी तरी होतं … पण कोण ते समजत नव्हतं …. 

  अगोदर चक्रावला तो ! 

 झोपडी बाहेरून एवढीशी दिसते .. पण आत … आतील भिंतीला मधील अंतर .. नजरेच्या टप्प्यात येत नव्हतं … आपण आत कुठे चाललोय ? आणि का ? अनामिक ओढ होती – आकर्षण होतं की आणखी काही ? … 

 तो आत .. त्या .. त्या अस्तित्वापर्यंत पोहोचला जे काही तरी करत होतं .. हालचाली समजण्या पलीकडच्या होत्या …. त्या प्रत्येक कृतीचा अर्थबोध व्हायला बराच वेळ लागत होता … 

 ‘ म्हातारी तर .. गावाला गेलीय म्हणतात …मग हे … कोण ए … काय ए .. अन काय करतंय … ? ‘

त्याला आठवण झाली तशी त्याने खिचे चाचपले अन लायटर बाहेर काढलं .. 

  त्या क्षीण प्रकाशात .. जे दृश्य समोर दिसलं .. ते काळजाचा .. ठोका चुकवणारं होतं …. 

समोर जे काही होतं त्याचं यांच्याकडे लक्ष ही  नव्हतं …. किंवा याला महत्व देण्याची किंवा दाखल घेण्याची त्या अस्तित्वाला गरज वाटली नसावी …. 

डोक्यातून रक्त वाहत होतं … त्या रक्ताने हात .. मनगटापर्यंत माखले असावेत .. बांगड्यांची किणकिण त्या भिषण शांततेत गूढ निर्माण करत होती … ते रक्ताने माखलेले हात भिंतीवर फिरत होते … ती भिंत रक्ताने लिंपत होते … 

 त्याच्या पायाला काही चिपचिपीत स्पर्श झाला .. त्या उग्र वासाने तो वैतागला .. नजर आणि लायटर खालच्या दिशेने आले आणि तो जोरात ओरडला … ओरडत राहिला … जशी भिंत रक्ताने माखली होती तशीच जमीन ही … 

  रक्त होतं की आणखी काही त्याला कळायला मार्ग नव्हता !  लालभडक होत म्हणून रक्त म्हणायचं … ते समोर जे काही होतं त्याच्या डोक्यातून .. { ? } वाहत होतं म्हणून रक्त म्हणायचं … उगाच आलो इथे .. ! आलो की .. आणले गेलो ? 

 … त्याने बाहेर वळून पळण्याचा प्रयत्न केला अन दाणकन खाली आपटला … 

सर्व जागा निसरडी झाली होती … तो बोंब मारत राहिला … 

अन इकडे बाहेर … 

चांडाळ चौकडी झोपडी पेटवण्याचा तयारीत असताना आतून ओरडण्याचा आवाज आल्याने गोंधळली आणि घाबरली ही ! तसे हात भराभर चालायला लागले … अन झोपडीवर चारी बाजूंनी रॉकेल , डिझेल ,पेट्रोल जे मिळालं ते आणलं आणि टाकलं गेलं … आता काडी लावणार तोच …. 

 ओरडण्याचा आवाज ! 

”  च्या मारी ! म्हातारी तर घरात नाहीय ? मग कोण बोंब मारतंय ? “

 तेवढ्यात तो आतला बोंबा मारत बाहेर आला … थोडा बाहेर पळाला अन पुन्हा दाणकन आपटला … 

” शाम्या .. ? हा इथं काय करतोय .. ? “

ते शाम्या जवळ आले अन त्याला धरून उभा केला .. पण त्याला उभं राहता येईना अन त्यांना धरता येईना .. तो पुन्हा  खाली पडला अन बोंबलायला लागला … 

” शाम्या काय झालं ? कशाला बोंबलतोयेस ?”

” आरे .. मध्ये आहे कुणीतरी …. “

” अरे कोण असणार ? मरू दे ! असं ही झोपडी जाळल्यावर मरेल जो असेल तो .. ” 

” आरे येड्यांनो .. कुणी बाई का काई आहे … डोकं फुटलंय  … रक्त वाहत होतं .. भिंती रक्ताने सारवतेय  अन जमीन ही … “

” शाम्या ,येडा झालास काय ? अन तू कशाला मरायला गेला होतास ? “

” ए अरे .. ते बघा … ” ते अस्तित्व दारात येऊन उभं राहिलं होतं … अंधार असून ही  त्या अस्तित्वाची भयानकता ,बीभत्सता .. अंधारात ही जाणवत होती … 

 तरीही एका ने हिंमत करून काडी पेटवली … अन झोपडीकडे फेकली … पण जशी .. ठिणगी खाली पडली अन शाम्याच्या अंगावरून पायाला जे लालभडक द्रव लागलं होतं ….. त्याने पेट घेतला .. कदाचित त्याच्या अंगावर ही रॉकेल .. पेट्रोल पडलं असावं … पण एवढा विचार करायला …..  कुणाला वेळ ही नव्हता आणि गरज ही ! 

आग भडकली आणि शाम्या ओरडायला लागला . जळायला लागला .अन झोपडी पेटवायचा विचार सोडून सर्वांनी तिथून पळ काढला .अन  करत शाम्या त्यांच्या मागे .. इकडे जाऊ की  तिकडे जाऊ …

  या गोंधळाने गाव तिथे जमा झालं अन –

“बहुतेक म्हातारीने कुणाला तरी जिवंत जाळलाय ! मेली चेटकीण ! “

“पण म्हातारी तर घरी नाही …दुपारीच गावाला गेलीय  ! ” 

” हो ,हो .. म्हातारी दुपारीच गावाला गेलीय … मग हा पेटला कसा … ? “

कुणी बोलत राहीलं कुणी शाम्याच्या अंगावर पाणी ओतलं … कुणी झोपडीवर ….. जळणाऱ्या भागावर पाणी ओतलं .. झोपडी तर वाचली … 

    पण शाम्या … त्याचं काम तमाम झालं होतं …..तो मेलाय कि जिवंत हे बघायला ही कुणी मागे थांबलं नाही . तो चोर म्हणून कुप्रसिद्ध होता … त्याला योग्य ती शिक्षा मिळाली असंच गावकऱ्यांचं मत पडलं…. 

   त्याच्या बद्दल आस्था असण्याचं , आपलेपणा असण्याचं काही कारण नव्हतं …. शिवाय कुणी ना कुणी याला बघेलच असा विचार करून कुणीच बघितलं नाही आणि बघता बघता तिथे शांतता पसरली …… गाव आप आपल्या घरात जाऊन झोपेच्या स्वाधीन झालं … 

   इकडे श्यामच्या अर्धवट जळालेल्या शरीराच्या उग्र वासाने भटकी कुत्री एकत्र आली अन शाम्याच्या शरीराचे लचके तोडायला लागली … कदाचित तो जिवंत असावा …..

अन कुत्रे ?

 असे काही लटकले होते अधाशासारखे तुटून पडले होते की जन्माचे उपाशी असावेत ….  

  साधी कुणी त्याची दाखल ही  घेऊ नये ? काय हे दुर्दैव ? तो अगोदर मेला नसेल पण कुत्र्यांनी त्याचा बळी घेतला ! 

  कुत्र्यांनी बळी घेतला ?

की झोपडीने ?

की गावकऱ्यांच्या निष्काळजी पणाने ?

की त्याच्या व्यक्तित्वाने ?

त्याच्या कर्माने ? 

 कोण जबाबदार ?

 सुलक्षणा ? …. 

काळच ठरवणार होता ….. 

➣➣➣➣➣➣➣➣

 

 

 

क्रमशः –

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top