टिवल्या – बावल्या ! मराठी कथा | Tiwalya – Bawlya | Marathi katha | Yogesh Borse

टिवल्या – बावल्या ! मराठी कथा |

 

                            आगामी मराठी दीर्घ कादंबरी :-

लेखक :- श्री. योगेश वसंत बोरसे

  Sample :- 

 

टिवल्या ,बावल्या ,दोन शाळकरी मुलं ,म्हणजे प्राथमिक शाळेतली ,म्हणजे साधारण तिसरीची मुलं ! शाळा एका पाड्यावरची ,शे पाचशे वस्तीचा पाडा ,अशेच अवती भवती अजून काही पाडे होते  …. 

  खरं तर ही त्यांची खरी नावं नव्हती . पण ही दोघं शाळेत कमी आणि बाहेर जास्त हुंदडायची  … जसं कानात वारं भरलेलं वासरू असतं तसं …. कधी मंदिरात ,कधी माळरानावर ,कधी टेकडीवर ,कधी जवळच्या जंगलात  … कधी पाणवठ्यावर  .. 

  बरं ,घरी असले तरी गोंधळ घालणार ….. त्यापेक्षा घरच्यांना ते बाहेर राहिलेले परवडत ! म्हणायला मित्र होते पण प्रेम सख्या भावापेक्षा कमी नव्हतं . जसं काही जुळेच होते ! फक्त दोघांची आई-बाप वेगळे होते  . 

 शाळेचा गणवेश जमलं तर घातला जायचा . पण मुलं सकाळी कपडे घातले की तेच दिवसभर अंगावर ठेवायचे ,घरी वेगळं ,शाळेत वेगळं ….अशी पद्धत नव्हती आणि कुणाची ऐपत ही नव्हती .

  सोमवारचा दिवस ,शाळेचा पहिला दिवस !

पोरांनी अंघोळ केली ,कपडे घातले आणि दप्तरं उचलली . दप्तर म्हणजे एक पिशवी ,एक पाटी ,पेन्सिल नांवाला एक वही ,एक पुस्तक ,अन एका कापडात भाकरीचे तुकडे गुंडाळलेले ,पण उत्साह असा होता की मोठ्या नेत्याला लाजवेल .  

  टिवल्या बावल्याने दप्तरं उचलली आणि शाळेकडे धूम ठोकली ….. 

 शाळेत आले ,शाळा बंद ! आनंद ही झाला आणि आश्चर्य ही वाटलं . 

” का रे टिवल्या ,शाळा तर बंद आहे ! सुट्टी हाये की काय कसली ?”

” असल काहीतरी ! त्या शिवाय का बंद राहील ? पन मास्तर ही दिसत नाई  ..”

” आरं येडा हायेस का ? सुट्टी असल्यावर मास्तर कशाला येईल ? ” टीवल्या म्हणाला . पण बावल्या हुशार होता . 

” अरे मी किती वेळा मास्तरला सुट्टीच्या दिवशी शाळेत बघितलंय . काही तरी करत असतात वही वरती … चल आत जाऊन बघू  …..हायेत का ते ! ”   

 दोघं शाळेच्या पायऱ्या चढले . दोन चारच खोल्यांची शाळा होती . पण ऑफिसचा दरवाजा उघडा का बरं….. 

  त्यांनी आवाज दिला ,पण उत्तर मिळालं नाही . 

 ” मास्तर ,ओ …  मास्तर ….. ” 

 आवाज देत देत आत गेले  …. ऑफिसचं दार लोटलेलं होतं  …. 

 ” बघ मी म्हटलं नव्हतं ,मास्तर असेल म्हणून ! “

बावल्याने समर्थन केलं आपल्या बोलण्याचं ,

” चल पाहू  … मास्तर हाये का !”

” ए नको ! चल पळ इथून ! मास्तर ने पाहिलं तर काही काम लावून देईल . आपल्याला नाही म्हणता येणार नाही . “

” आरं सुट्टी हाये आज  … शाळा बंद हाये ! ….  काय काम असणार चल …. ”  बावल्या ऐकायला तयार नव्हता . 

 टीवल्याचा नाईलाज झाला . दोघे दबकत दबकत ऑफिसच्या दारापर्यंत पोहोचले . दार लोटलं आणि  … दोघे  जागच्या जागी थांबले …..

त्यांचं  डोकं काम करत नव्हतं . असं कसं झालं ? कुणी केलं ? का केलं ? …. 

” टिवल्या …. पळ  .. ” 

बावल्या भानावर येऊन ओरडला आणि पळाला . पण टिवल्याची नजर समोरच्या दृश्यावरून हालत नव्हती .  बावल्या  पुन्हा मागे आला आणि टिवल्याला हात धरून ओढू लागला . 

” टिवल्या  …. चल पळ …. “

टिवल्या भानावर आला आणि जोरात बोंबलला . 

” ए अरे ,बोंबलू नकोस . कुणी पाहिलं आपल्याला तर बोंब होईल . ” 

  आणि समोरून मास्तर येताना दिसले . तसे दोघे चक्रावले . 

‘ हा काय प्रकार ए ? ‘

” का रे पोरांनो ? इथं काय करताय ? अरे आज नारळी पौर्णिमा ! शाळेला सुट्टी आहे . आणि एवढं घाबरायला काय झालं ?”   

” गुरुजी ,गुरुजी  …. “

” अरे काय झालं ?”

” गुरुजी ,तिथे कुणी मरून पडलंय ….. तुमचं कपडे घालून  … तोंड … पार ठेचलंय … वळखायला येत नाहीय … आमाला पाहिले वाटलं की … ” पोरांना पुढे बोलवत नव्हतं … 

गुरुजी समजले ,यांना काय म्हणायचंय ते … ” चला तर बघू  ..”

” …  नाही गुरुजी ! एकटे जाऊ नका … नाहीतर तुमच्यावर आफत यायची … आमी दोन चार लोकांना आवाज देतो . तोवर इथंच थांबा ! .. तिकडं जाऊ नका …”

गुरुजींना या उनाड मुलांच्या प्रसंगावधानतेचं कौतुक वाटलं . 

” ठीक ए ,कुणी एकाने जा आणि एकाने माझ्या सोबत थांबा ! “

ते एवढं म्हणायचा अवकाश ! टिवल्या पळालाही …. आणि काही वेळात जवळपासच्या पाड्यावरची पाड्यावरची दोन चार डोकी सोबत घेऊन आला .     

त्यांच्या हातात काठ्या होत्या आणि एक दोन घोंगड्या होत्या . 
टिवल्या बावल्या पुढे ,मागे गुरुजी मागे ही चार डोकी . पोरांच्या हिमतीचं सगळ्यांना कौतुक वाटत होतं . सर्व जण ऑफिस जवळ पोहोचले .. दरवाजा उघडाच होता .  
.. समोरचं दृश्य भयानक होतं . समोर कुणीतरी मारून पडलं होतं  .म्हणजे मारलं गेलं होतं ,असं वाटत होतं की गुरुजी समजून मारलं होतं .
कारण मरणाऱ्याच्या  अंगावर गुरुजींचे कपडे होते . 
 ‘ पण मरण एवढं भयानक असू शकतं  ?
आणि गुरुजींचे कपडे याच्या अंगावर कसे आले ?
आणि हा आहे तरी कोण ?
कसं समजणार ?’
 बघता बघता आजू बाजूच्या चार पाच पाड्यावरची गर्दी शाळेत जमली . भय ,उत्सुकता ,रिकामा वेळ ,मुलांची काळजी ,अन शाळेचं भवितव्य ,सर्वच तिथे एकत्र आलं होतं …. 
   पाड्यांवरील प्रमुख पुढे झाले . त्यांनी परिस्थितीचा ताबा घेतला .अगोदर पोरांना बाहेर पिटाळलं आणि ऑफिसचं दार बंद केलं .   
   ” गुरुजी ? काय प्रकार हाये ? तुमची कुणाशी दुश्मनी  हाये का ? “
” अहो , मला दोन महिने ही झाले नाहीत इथे बदली होऊन . मी कुणाला नीट ओळखत ही नाही . मग दुश्मनीचा प्रश्न कुठून येतो  ?”
 ” म्हणूनच म्हणलं ! पहिले जिथे होता तिथे काई कांड केलं होतं का ? म्हणून तुमची बदली इकडं झाली . कुणी तरी तुमाला मारायचा प्रयत्न केलाय . गुरुजी समजून घ्या ,तुमच्या जीवाला धोका हाये ! हा कोण ए ते तर लगेच समजून जाईल ! ….. “
त्या प्रमुखातील एक गंगो होता . त्याने सर्व लीड आपल्याकडे घेतला होता .
 ” नारबा ,गण्या ,पंढरी … पाड्यावरचा कुणी गायब झालंय का चौकशी करा . कि हा कुणी बाहेरचा हाये ? अन इथं येऊन मेला . बाहेरचा असेल तर काई नई ,चिता पेटवून जाळून टाकू ! पण आपल्या पाड्यावरचा असल तर  … चला लागा कामाला ! …”
” आरं गंगो ,पन  पहिले हे मढं तर जमिनीवर ठेवावं लागल . कधीचा असा पडलाय काय माहित ? मेलेल्या जीवाला कशाला त्रास ? “
  नारबाचं म्हणणं सगळ्यांना पटलं . तशी एक घोंगडी खाली टाकली आणि एक …… 
 हो … टेबलाच्या पलीकडे खुर्चीवर ती व्यक्ती बसली असणार .आणि डोकं टेबलावर ठेऊन कुणीतरी त्याचं डोकं ठेचले असणार . पण एवढं ठेचायची काय गरज होती ?
नुसतं मारायचं होतं  तर एक घाव पुरेसा होता . पण नाही … प्रकरण काही वेगळंच होतं !
मारण्या पेक्षा ,मारून बदला घेणं समोरच्याला जास्त संतोष देणारं  समाधान देणारं असावं …. 
 त्या शवावर एक घोंगडी टाकून ते तसंच गुंडाळलं गेलं . आणि खालच्या घोंगडीवर टाकलं गेलं . 
” गंगो ,पोलिसाला खबर द्यावी लागल ! ” नारबा म्हणाला . 
” हे कायतरी येगळंच हाये . अन हा माणूस अपल्या पाड्यावरचा वाटत नाही . याच्या हातात घड्याळ ए ! आपन कुणी इथं घड्याळ घालत नाई ,एक गुरुजी सोडला तर … “
” पण हा इथं कसा आला ? कसा मेला ?”
” ते आपलं काम नाई ,पोलिसांचं हाये … “
     तिथून पोलीस स्टेशन १० ते १५ किमी लांब असेल . एवढ्या पूर्ण परिसरात तेवढी एकच चौकी होती . तशी काही गरज पडायची नाही कधी . पाड्यावरची लोकं ,हातावर पोट . कधीतरी मारामाऱ्या झाल्या तरी आपापसात मिटवून घ्यायचे . गोष्ट आपापसात राहायची . त्या पलीकडे दुसरं कधी काही अनुचित घडलं नव्हतं …. 
     पहिल्यांदाच कुणाचा खून झाला होता . त्यामुळे सर्व जण उत्तेजित झाले होते . उत्सुक होते . भयोत्सुक होते . एक जण पोलीस स्टेशनकडे रवाना झाला . आणि पोलीस ही सतर्क झाले . तिथून तालुका पोलीस स्टेशन ला फोन केला गेला . तिथून पूर्ण टीम आली . 
 अर्थात पूर्ण चार्ज त्यांच्याकडेच असणार होता . 
    दुपार पर्यंत पोलिसांचा ताफा शाळेच्या आवारात पोहोचला . बघ्यांची गर्दी झाली होती . पोलिसांना पाहताच अर्धी गर्दी कमी झाली . नसतं झेंगाट नको म्हणून ….
त्यामुळे फक्त ज्यांना जबाबदारीची जाणीव होती आणि ज्यांनी अगोदर बघितलं तेवढेच तिथे थांबले . म्हणजे शाळेच्या आवारात  …. तर काही दूर उभे राहून गंमत बघत होते.  
    ” काय भानगड ए ?” इन्स्पेक्टर जाधव ने विचारलं तसा गंगो पुढे आला ” साहेब शाळेत कुणाला ठेचून मारलाय , त्या ऑफिस मध्ये ! “
” शाळेत ? ते ही ऑफिसमध्ये ? कुणी शाळेत येत नाही का ? ” 
तसे मास्तर पुढे आले . 
” साहेब ,आज सुट्टी आहे नारळी पौर्णिमेची . “
” तुम्ही .. “
” मी काळे ! शरद काळे ! इथे शिक्षक आहे ! ” 
” आणि बाकीचे     .”
” नाही ! सध्या तरी मी एकटाच आहे ! आणि साहेब एक विचित्र गोष्ट म्हणजे मलाच मारणार होते बहुतेक ! “
” काय   .? “
 ” हो साहेब ! कारण शाळेत मी ऑफिस ला एकटाच असतो . त्यात जो मरून पडलाय त्याने माझ्या सारखच घड्याळ घातलय आणि कपडे ही !
 मी एकटाच असल्यामुळे शाळेचा वेळ पुरत नाही ,त्यामुळे माझा बराचसा वेळ शालेय कामात ,ऑफिसात जातो .कामं संपता संपत नाहीत आणि हे बहुधा मारेकऱ्यांना माहित असावं .
 आज ही सुट्टी असताना काही कामं अर्जंट संपवणं गरजेचं असल्याने आलो होतो तर माझ्या अगोदर ही  मुलं शाळेत दिसली .”
तसे टिवल्या बावल्या पुढे आले . 
 ” का रे ? आज सुट्टी आहे ना ? मग शाळेत काय करत होतात ?”
 दोघांना समजेना काय बोलावं ? उनाड असली तरी पोलिसांना पाहून घाबरली होती . 
 ” साहेब ,त्यांना माहित नव्हतं आज सुट्टी आहे ते . ते शाळेत कमी आणि बाहेरच जास्त असतात . ” काळे गुरुजी प्रेमपूर्वक म्हणाले . 
  ” ऑफिस कुठाय ? ” इन्स्पेक्टर ने विचारलं .
” बॉडीला कुणी हात लावला नाही ना ?”
 तसं यांचं धाबं दणाणलं …….. 
 

  To Be Continued ….. 

ALL RIGHTS RESERVD AT YOGESH BORSE & BGSM PRODUCTION , BHUTATMA PUBLICATION 
BHUTATMA PUBLICATION
                   

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top