जख्खड – मराठी भयकथा –
लेखक :- श्री .योगेश वसंत बोरसे यांची आगामी कादंबरी{ दीर्घ भयकथा }
HORROR STORY MARATHI
![]() |
| MARATHI HORROR STORY |
PART – 1
लेखक :- श्री . योगेश वसंत बोरसे
नव्वदीला पोहोचलेलं शरीर खाटेवर खितपत पडलेलं होतं . मुलगी ,पत्नी ,आई ,सासू ,आजी ,पणजी या सर्व भूमिका पार पाडत शरीर आता खंगले होते .
देवाने आपल्याला इतकं आयुष्य दिलं या बद्दल देवाचे आभार मानावेत की इतकं आयुष्य का दिलं असा प्रश्न विचारावा ? अशी परिस्थिती होती . सहा सात वर्ष शरीर आजाराने ग्रासलं होतं .
घरातील लोकं कुरकुर करायला लागली . लेकी – सुना , पोरं -बाळं ,सर्वच कंटाळली .
‘ आता म्हातारीनं जावं ! सगळं झालंय पाहून ! आता काय राहिलंय ? ‘
पण उघड उघड कुणी बोलत नव्हतं . जो तो कुजबुज करायचा . पण जगण्याच्या दुर्दम्य इच्छा शक्तीचे रूपांतर या लोकांच्या बोलण्याने मी का मरावं ? यामध्ये परिवर्तित झालं !
आणि ,देवाची लीला असेल नाहीतर सर्व लोकांची इच्छा असल्याने असेल आजीला धाप लागायला लागली . श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला . तशा घरातील लोकांच्या आशा पल्लवित झाल्या . घरातील बाया तोंडाला पदर लावून फिरू लागल्या . सर्व नातेवाईकांमध्ये निरोप पोहोचला ,आता काही खरं नाही म्हणून !
आणि सुनाच काय मुलीही सुखावल्या . त्या ही तोंडाला पदर लावून आल्या ,फक्त त्यांचं बोलणं जरा वेगळं होतं !
‘ जास्त हाल होऊन जगण्यापेक्षा देवाने लवकर बोलवावं , हे बरं ! ‘
तोंडाला पदर का लावतात ? हे मला अजून कळालेलं नाही . बहुधा चेहेऱ्यावरील भाव कुणाला कळू नयेत म्हणून असेल कदाचित !
बघता बघता पाहुण्यांनी घर भरलं . कसली वाट बघत होते ?
आजी जायची ?
आणि कुणाची तरी रात्री खात्री पटली ,आजी रिस्पॉन्स देत नाही म्हणे ! हाल चाल थांबली आहे ! आजीचा श्वास लागत नाही म्हणे !
इकडे आजीचा श्वास बंद झाला आणि तिकडे घरातल्यानी निश्वास सोडला .
‘ चला ,एक अध्याय संपला ! ‘
…. बघता बघता गाव जमा झालं . हळू हळू दिवस उगवला आणि अंत्य विधीच्या तयारीला वेग आला . कुणी रडण्याचा प्रश्नच नव्हता . कारण आजीने जिवंतपणी सर्वांना भर भरून तिरस्कार दिला होता .
आपण मेल्यावर कुणाच्या डोळ्यात पाणी येईल इतकं तरी माणसाचं वागणं व्यवस्थित असावं . पण दुसऱ्यांचा विचार दुसऱ्यांच्या भावनांचा विचार आजीने आयुष्यात कधी केलाच नाही .
तिला कधी त्याची गरज वाटली नाही . पण मुलं सुना ,चांगल्या निघाल्या . निदान लोक काय म्हणतील ? म्हणून का असेना त्यांनी शेवटपर्यंत सांभाळलं होतं .
हो ! शेवटपर्यंत !
पण ,शेवट झाला होता का ? कि अजून काही बाकी होतं ?….
सर्व तयारी झाली . वाजा बोलावला गेला . वाजा वाजंत्री बडवता बडवता सर्व तयारी झाली . तिरडी तयार झाली . आजीचं शव तिरडीवर ठेवलं गेलं आणि सुतळीचं भेंडोळं आजीच्या शरीराभोवती फिरू लागलं . एखादी मोळी करकचून बांधावी इतका बांधणाऱ्याचा हात निष्णात पणे फिरत होता . बांधता बांधता तो पायापर्यंत आला ……
आणि त्याचे लक्ष अंगठ्याकडे गेले . अंगठा हलला !
हो ! पायाचा अंगठा हलला !
त्याने हात वर केला तशी वाजंत्री शांत झाली ! अचानक शांतता पसरली ! पुन्हा कुजबुज ! काय झाले म्हणून !आजीचा पायाचा अंगठा हालतोय !म्हणजे अद्याप जीव शिल्लक आहे !
काहींना टेन्शन आलं . काही जण सुखावले ! कुणी म्हटलं सुतळी काढा ! कुणी म्हटलं डॉक्टर बोलवा .सगळ्यांनी सगळं केलं . काही क्षणात डॉक्टर हजर झाला . त्याने चेक केलं .तो पण चक्रावला !
‘ सकाळी आपणच चेक केलं तेव्हा आजी मेली होती ! मग आता ?…. ‘
पण तो हुशार होता .
चेहेऱ्यावर आनंद दाखवत वर आभाळाकडे हात करून नमस्कार करत म्हणाला .
“चमत्कार झाला ! ….. चमत्कार झाला ! … देवाची लीला ! … आजी परत आली ! …. ”
एक दोन जणींनी कपाळावर हात मारून घेतला . त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरलं होतं .
‘ अजून किती दिवस ? किती महिने ? की …. आपल्याला खपवूनच ….. ‘
पुढचा विचार करून फायदा नव्हता . वाजंत्री ,वाद्य परत गेली . गावातील मंडळी बोलता बोलता पसार झाली . आजीला उचलून घरात आणलं गेलं . पुन्हा खाटेवर !
आजीने आवंढा गिळला ….
बहुतेक घसा कोरडा पडला असावा . तसं एकीने पुढे येऊन दोन चमचे पाणी तोंडात टाकलं . दिवस वर येत गेला . आणि नातेवाईक , मुली संभ्रमात पडल्या . जायचं ? की थांबायचं ? आपण गेलो आणि पुन्हा निरोप आला मग ? निघणं होणार नाही ! दोन दिवस वाट पाहावी ,मग ठरवू !
एका मुलीच्या डोक्यात काय आलं कुणास ठाऊक ? दुपार झाली तशी हळूच आजीच्या खाटे जवळ गेली .
“आई sss ” रिस्पॉन्स आला नाही . तिने पुन्हा आवाज दिला .
” ए आई , काही इच्छा राहिलीय का ! काही बोलायचंय का ? ”
नाही ! रिस्पॉन्स नाही !
“गेली वाटतं !…. ”
तेवढ्यात कण्हण्याचा आवाज आला . हाताची हालचाल झाली . आणि आजी डोळे किलकिले करून बघू लागली.
“आई sss काय झालं ? काही सांगायचंय का ? ”
आजीचं लक्ष समोर होतं . समोर एक खोली होती . जी नेहमी बंद असायची . त्यात अडगळीचं सामान ठेवलं जायचं . आजीचं लक्ष तिकडे होतं .
हि बोलतेय म्हटल्यावर बाकीच्या बाया ही जमल्या खाटेजवळ ! लक्ष आजीकडे होतं आणि आजीचं लक्ष खोलीकडे होतं .आजीने शरीरातील सर्व ताकद लावून हात उचलला आणि त्या खोलीकडे इशारा केला .
आणि ,हात खाली पडला ! मान एका बाजूला कलली !
‘ गेली वाटतं !….. ‘
मुलींच्या आणि सुनांच्या नजरेत एकच चमक होती ! त्या खोलीत असं काही होतं ज्यात आजीचा जीव अडकला होता .
‘ काय असावं ? ‘
TO BE CONTINUED ……..








