धोंडिबा | Dhondiba | मराठी भयकथा | Marathi Horror Story E Book

धोंडिबा | मराठी भयकथा | Marathi Horror Story E Book 

Amazon E Book Link :- https://amzn.in/d/hxkgJgu

Sample of Story :- 

 “धोंडिबा हाय का ?”

 “न्हाई जी ,काही काम होतं का ?”

 “व्हय ! पाटलानं वाड्यावर बोलावलंय .”

 पाटलाचं नांव ऐकलं आणि धोंडिबाच्या बायकोच्या म्हणजे जनाबाईच्या काळजात चर्रर्र झालं .

     पाटलानं बोलावलं म्हणजे नक्कीच काही इपरीत घडलंय. पन कळणार कसं ?

 कारण धोंडिबा काही न सांगताच घरून गेला होता ,आणि आता सूर्य मावळतीकडे झुकून ही बराच वेळ झाला होता . दिवस मावळून रात्र व्हायला लागली .

     आणि पाटलाची माणसं पुन्हा दारात उभी !

“आला का ?”

 “न्हाई ,जी !” 

“मग तू चल !”

 “मी ? मी कशी येनार ?”

 ” ते आमाला ठाव न्हाई . पाटलानं सांगितलंय ,न्हाई आली तर उचलून आना  म्हनून !”

   जनाबाईचा नाईलाज झाला. ती पाटलांनाही ओळखत होती ,आणि धोंडिबालाही . काही तरी ईपरीत घडलंय ,म्हनून पाटील एवढा चिडलाय !

 नाहीतर तो बाई मानसावर हात टाकणारा न्हाई ! गेल्याशिवाय कळणार न्हाई ,न्हाई गेलं तर हे बळजबरी नेतील !

 “तुमि व्हा पुढं ,म्या आलेच !”

   “नाय ,  संगच यावं लागल !” 

तिने दार ओढून घेतलं व त्यांच्याबरोबर निघाली .

     पाटलाच्या वाड्यासमोर गर्दी होती . लोकांची कुजबुज चालू होती आणि वाड्यात पाटलाच्या सुनेचं प्रेत पडलेलं  होतं !

 आणि पाटील समोर पायरीवर डोक्याला हात लावून बसले होते . त्यांनी जनाबाईला बघितलं व हात जोडून म्हणाले ,

   “जनाबाई ,माफ कर मला , संतापाच्या भरात मी माझ्या माणसांना चुकीचा निरोप सांगितला , पण तुझा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता . धोंडिबाने कामच असं केलंय की माझ्याजागी कुणीही असतं तरी हेच केलं असतं .”

 जनाबाईला काय बोलावं कळेना , आपला नवरा असलं काही करणार नाही , याची तिला खात्री होती .

  आणि पाटील ही विनाकारण त्याचं नांव घेणार नाही ,हे माहित होतं ,मग बोलणार काय ? तिला शांत बसणं योग्य वाटलं .

   पाटलांनी पुन्हा विचारलं ,

” जनाबाई ,तूच सांग काय करायचं ते ? “

“मी काय बोलणार जी ? पण माझं धनी तसलं वंगाळ काम करणार न्हाईत ! मी देवाची आन घेऊन सांगते .”

  ” अगं मग तो समोर का येत नाही ? मला ही वाटतंय की  त्याने काही केलं नसेल पण तो समोर तर आला पाहिजे . “

        आता जनाबाईला धीर आला . ती धीट पणे म्हणाली ,

 ” पण नेमकं काय झालंय जी ? मला तर काही बी कळत न्हाई ! “

 “काय सांगणार ? सांगायला जीभ धजत न्हाई !”

 त्यांनी पाटलीण बाईकडे इशारा केला ,जनाबाई समजली . आणि डोळ्याला पदर लावत पाटलीण  बाईकडे जायला लागली . पाटलीन बाई जागेवरून उठल्या व मधल्या खोलीकडे गेल्या . जनाबाई त्यांच्या मागे मागे गेली .

    त्यांनी हळू आवाजात तिला सर्व काही सांगितलं .तिच्या जीवाचा थरकाप झाला , आणि खात्रीही झाली की हे काम आपला नवरा करू शकत नाही म्हणून !

   पण मग यांचं नांव कुणी जोडलं ? आणि या लोकांनी कसं काय खरं मानलं ?

 आपल्या नवऱ्याच्या तीन पिढ्या यांच्या घरची चाकरी करण्यात गेल्या . त्यांची पाटलाकडे मान वर करून बघायची हिम्मत झाली नाही . ते असं काही करतील ?

  जनाबाई पाटलीण बाईला म्हणाली ,

 ” न्हाईजी ,हे काम माह्या दादल्याचं नाही , त्याची एवढी हिम्मत बी न्हाई ,अन स्वभाव बी न्हाई ! त्यांच्या तीन पिढ्या तुमच्या घरची चाकरी करण्यात गेल्या , ते असं घरातल्या बाई माणसावर हात टाकणार न्हाई ! “

    तेवढ्यात बाहेर गोंधळ ऐकू आला . तशा दोघी बाहेर आल्या . धोंडिबा सापडला होता !

 म्हणजे ,त्याचं  प्रेत सापडलं होतं  !

   हे समजल्यावर जनाबाई धाडकन खाली कोसळली . पाटलीण बाई व दोन तीन बायका तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागल्या . काही वेळाने ती शुद्धीवर आली , तिला काय करावं कळेना ?

   एकतर कुणीतरी धोंडिबाला मारलं होतं किंवा त्याने इज्जतीला घाबरून किंवा पाटलाच्या धाकाने जीव दिला होता . पण आता कसं कळणार ?

         आणि आता पाटील ही काय बोलणार होते ?

   ज्याच्यावर आळ होता तोच मेला होता . त्यांनाही वाईट वाटलं . आपण घाई केली त्यामुळे घाबरून धोंडिबाने जीव दिला याची त्यांना खात्री पटली .….

  पुढचं सर्व कार्य पार पडलं . पाटलाने दोघांचा अंतिम संस्कार स्वतः लक्ष घालून केला होता . त्यामुळे जनाबाईला काही बघायची गरज पडली नाही . ती तिच्या घरी गेली ……  

     मध्यरात्री  पाटलांच्या वाड्याची कडी वाजली , गड्याने जाऊन दरवाजा उघडला ,बाहेर पाहिलं ,दरवाजाबाहेर छोट्या मालकाचं प्रेत पडलेलं होतं !

 गड्याने जोरात आरोळी ठोकली .

” मालक ,मालक घात झाला ! “

 त्याच्या आवाजाने पाटील खडबडून जागे झाले आणि लगेच दाराजवळ पोहोचले .

 ”  तुक्या ,काय झालं ? “

मालक ,छोटं मालक गेलं !”

 ” काय ? “

  पाटलांसाठी हा मोठा धक्का होता . ते तिथेच जागेवर बसले . पाटलीण बाईंना कळत नव्हतं ,त्यांना आवरावं की स्वतःला सावरावं ?

 काही वेळापूर्वी सून मेली होती , घरातला गडी मेला ,आता पोटचा पोरगा ,तो पण एकुलता एक ,तो ही मेला होता , हा योगायोग नक्कीच नव्हता . काहीतरी भयंकर घडलं होतं ,घडत होतं आणि अजून घडणार होतं ….. 

Sample of Story :- 

BHUTATMA PUBLICATION

 ALL RIGHTS RESERVED AT YOGESH BORSE & BGSM PRODUCTION ,BHUTATMA PUBLICATION 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top