fattu | फट्टू । मराठी भयकथा | Marathi Horror Story

LINK FOR Amazon E Book :-

https://amzn.in/d/1D3f0E7

Sample Of Story :-

 

 ………अशाच एका रात्री, आभाळ भरून आलं होतं. पाऊस कधीही कोसळेल अशी शक्यता. समशेर व त्याची आई सावीत्री दोघच घरात होते. त्याचे वडील  तेनसिंग अजून घरी आले नव्हते. आणि पाऊस सुरु झाला.  सुदैवाने समशेर झोपला होता. लाईट असतानाच. सावित्री त्याच्या जवळ बसली होती. अचानक वीज कडाडली कुठे तरी आसपास वीज पडली असावी. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. लाईट गेली आणि आईला धडकी भरली, ‘ आता हा उठला तर…. ‘

       ती पटकन उठली. कंदील लावला. बॅटरी शोधायला पुढच्या रूममध्ये गेली. बॅटरी घेतली ऑन केली पण होईना. – दोन तीनदा प्रयत्न केला पण व्यर्थ.

” सेल गेले वाटतं. ह्यांना सांगावं लागेल पण मग आता याच  काय करायचं ? “

  तिला काळजी वाटायला लागली. ती तशीच कंदील घेऊन समशेरच्या रूममध्ये गेली आणि चपापली. समशेर जागेवर नव्हता. त्याला आता चालता येत होतं. पण आई सोबत असली तर चालायचा, पडलो तर लागेल म्हणून घाबरायचा.

‘ मग हा गेला कुठे ?’        सावित्रीला काळजी वाटायला लागली. कंदिलाच्या प्रकाशात चारी बाजूला बघितलं आणि नजर एका बाजूला स्थिरावली. समोर खिडकी होती आणि खिडकीच्या ग्रीलला धरून समशेर उभा होता.

   बाहेर अंधारात पाहत होता. ‘ खिडकी कशी उघडली ? आपण तर बंद केली होती. हा तर नाही उघडणार ! ‘ तिला कळेना, काही गोष्टींची आपल्याला इतकी सवय झालेली असते कि तसं नाही झालं तर चांगलंच असतं, पण तरी आपल्याला खटकतं.

        सावित्रीचं तेच झालं. अंधारात समशेर शांत उभा होता . खिडकीतून पावसाचे फवारे अंगावर घेत तो एकटक कुठेतरी पाहत होता. सावित्रीला राहवेना, तिने दोनदा आवाज दिला. पण त्याने साधं वळूनही बघितलं नाही. ती खिडकीजवळ आली. समशेरला हात लावला. तो पूर्ण भिजला होता.

    ” बाळा चल इकडे आपण खिडकी बंद करू .”  तिने समशेरचे हात सोडवण्याचा प्रयत्न केला , हो प्रयत्न कारण तिला ते शक्य झालं नाही. जणू काही वज्र मूठ होती ती. तिला कळेना, एवढ्याशा पोरात एवढी ताकद ! ती घाबरली व खिडकी बंद करायला लागली पण व्यर्थ ! खिडकी बंद झाली नाही. व समशेरही जागेवरून हलला नाही.

     ….ती रडकुंडीला आली. एकतर पावसाचे फवारे आत येत होते. समशेर ओला झाला होता, होत होता. आता काय करायचं ? तिने एक चादर आडवी  खिडकीवर टाकली. जास्त नाही पण थोडा फरक पडला. तिने पुन्हा समशेरला आवाज दिला. पण तो तिच्याकडे पाहतही नव्हता. चादरीच्या आरपार त्याला काय दिसत होतं, कुणास ठाऊक ?

 वाऱ्याचा मोठा झोत आला. आणि चादर बाहेरच्या  बाजूला ओढली गेली . पुन्हा खिडकी मोकळी झाली. झाली ? की कुणी केली होती ! समशेरने ? की बाहेर कुणी होतं?

” बाळा काय आहे बाहेर ? काय पाहतोस ? ”   समशेर जणू काही वाटच पाहत होता. त्याने बाहेर अंधाराच्या दिशेने इशारा केला.

” मौछी  ! “

” काय ? “

 ” मौछी ! ” ‘ याला कोणती मावशी दिसली बाहेर ? ‘

 ” बाळा कुणी नाही बाहेर, चल बघू. “

   समशेरने परत इशारा केला.

 ” मौछी……मला जायचं ! ” व तो खिडकीचे गज हलवू लागला.

 ” नाही बेटा असं नाही करायचं, चल बघू. “

 ” नाही मला जायचं ! “

         तो गज हलवू लागला.  जोरजोरात. सावित्री घाबरली. ‘ हा काय प्रकार आहे. हा असं का करतोय ? ‘ ती एकटक समशेरकडे बघत राहिली आणि काही वेळात खिडकीचा एक गज खिडकीपासून वेगळा झाला. अशक्य ! एकदम अशक्य ! आपण हे काय बघतोय ? ते सावित्रीला कळेना.

    हळूहळू दुसरा गज सुद्धा खिडकीपासून वेगळा झाला. म्हणजे हा बाहेर जातो की काय ! बापरे ! आणि समशेर खिडकीत चढला. सावित्रीने भरपूर प्रयत्न केला त्याला थांबवण्याचा , पण व्यर्थ ! तो खिडकीतून बाहेर पळाला व अंधारात नाहीसा झाला.

           हे इतकं क्षणात घडलं कि सावित्रीची बुद्धी काम करत नव्हती. पुढच्या क्षणी ती दाराकडे पळाली.  अंधारात धडपडली पुन्हा उठली, दार उघडलं. बाहेर दारात कुणी होतं.

  ” अहो समशेर बाहेर गेला. “

 ” काय ? असा कसा बाहेर गेला ? “

” खिडकीतून बाहेर गेला ! “

   ” काय ?” पण सावित्रीला थांबायला वेळ नव्हता. ती बाहेर पावसात पळाली व तेनसिंग तिच्या मागे. ती खिडकीच्या दिशेने आली व तिथे शोधू लागली. पाठोपाठ तेनसिंगही आला.

  ” सावित्री काय झालं ? “

  “ अहो समशेर खिडकीचे गज काढून बाहेर पळाला. “

  “अगं कस शक्य आहे ? एवढंसं पोर ते , काहीही काय बरळते ! “

         तो खिडकीकडे पाहू लागला.  गज तर बरोबर होते.

 ” सावित्री हे बघ गज बरोबर आहे. “

  ” नाही त्याने गज काढले व बाहेर पळाला. ”

   तेनसिंगने खिडकितुन आत डोकावून पाहिलं, पलंगावर समशेर शांत झोपला होता.

  ” सावित्री चल घरात. “

   ” अहो असं काय करताय ? आपलं पोरगं  बाहेर गेलं आणि आपण आत जाऊन काय करायचं ? “

 ” तो बघ समशेर पलंगावर शांत झोपलाय. चल तू पण ना….. एकदम…….”

  तेनसिंगने शब्द आवरले. सावित्रीला समजेना कसं शक्य आहे ?

हा समशेर आहे मग आपण मगाशी बघितलं                                                    काय होतं ? मेंदूवरील ताण वाढला आणि ती तिथेच खाली पडली. तेनसिंगने

 बघितलं ती बेशुद्ध झाली.त्याने अलगद  उचललं व घरात नेली. 

काही वेळात ती शुद्धीवर आली पण काहीच बोलली नाही. आपण मगाशी पाहिलं ते खरं की आता पाहिलं ते खरं तिला समजत नव्हतं. सावित्री तिथेच बसून राहिली . तेनसिंगने कपडे बदलले . बाथरूममध्ये जाऊन हातपाय धुतले . रुमालाने खसखसून पुसले . व सावित्री जवळ आला .

   ” काही केलंय का ? “

   सावित्री गुपचूप उठली .जेवण गरम केलं . दोन ताटं वाढली . आणि दोघांनी कंदिलाच्या उजेडात जेवण केलं .

     बाहेर पाऊस कोसळत होता . आज थांबायची चिन्ह दिसेनात !  जेवणं झाली . सावित्रीने आवरासावर केली .व समशेरकडे आली . तो अजूनही शांत झोपला होता . ती तिथेच बसली त्याच्या डोक्यावर हात फिरवत . याचं डोकं तर कोरडं आहे . मग मघाशी ?….

    ” सावित्री ! चल ना ! ” ती केवढ्याने दचकली .

” काय झालं ? “

” चल ना !”

  “अहो , असं काय करताय ? लाईट नाहीये ! समशेर उठला तर रडत बसायचा . मी इथेच झोपते ! तुम्हीही जाऊन झोपा ! “

    ती समशेर च्या बाजूला आडवी झाली , आणि तेनसिंग तिच्या बाजूला ! तिने विरोध केला नाही . समशेरला थोडं सरकवून जागा केली . पाऊस कोसळत राहिला …..

    खिडकी उघडीच होती . काहीतरी होतं जे खिडकीतून आत डोकावत होतं . समशेरला जाग आली . त्याने आजूबाजूला पाहिलं ! अंधारात आई -बाबा काय करतायत त्याला कळत नव्हतं .

     पण अंतर्मनाने नोंद घेतली ! यांचं आपल्याकडे लक्ष नाही म्हणून ! तो उठला ! कधी आई बाबांकडे तर कधी खिडकीकडे पाहत राहिला . काही वेळात उठला आणि खिडकीकडे गेला . लुटूलुटू चालत !

   खिडकीचे गज धरून उभा होता . बाहेर कुणी होतं , जे त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होतं . अंधारातच ! काही वेळात तेनसिंग व सावित्री मोकळे झाले . आणि निपचीत पडले . सावित्रीचा हात समशेरच्या जागेवरून फिरला .

      समशेर जागेवर नव्हता . तिच्या काळजात धस्स झालं !

” अहो , हा कुठे गेला ?”

” ती घाबरून उठली व पटकन साडी गुंडाळली . तेनसिंगलाही कसं तरी वाटलं .’ याने आपल्याला बघितलं तर नसेल ? ‘ हातात जसे कपडे आले तसे घातले व कंदील लावला .

     लक्ष खिडकीकडे गेलं . समशेर खिडकी जवळ उभा होता ! गज हलवत ! तेनसिंगने आवाज दिला ,

 “बाळा ,चल ! इकडे ये ! “

  पण समशेर जागचा हलेना ! तेनसिंगने खिडकी लावली ,पण खिडकी पुन्हा खाड्कन उघडली गेली ! तो समशेरला उचलण्यासाठी वाकला ! आणि त्याला उचलायला लागला . पण तो जागेवरून हलेल तर शपथ !

    ” समशेर ,चल बेटा !”

 समशेरने बाहेर अंधारात इशारा केला .

 ” मौची ! मौची ! मला जायचं ! “

  तो पुन्हा  गज हलवायला लागला . तोवर सावित्री तिथे आली होती .

” हा असा काय करतोय ?”

 “अहो मघाशी असंच करत होता . आणि गज काढून बाहेर गेला ! “

 ” ए .शांत बस ! काहीही काय ? एवढासा पोरगा कसा काय गज काढणार ? “

     पण तोवर एक गज समशेरच्या हातात आला ! तेनसिंग पाहतच राहिला !

 ” हे तर आपल्याला ही शक्य नाही ! हा एवढासा पोरगा ! काहीतरी गडबड आहे ! “

  पण त्याला जास्त विचार करायला वेळ मिळाला नाही !समशेरने दुसरा ही  गज काढला !

 ” हा आता बाहेर जातो की  काय ? “

      तेनसिंग त्याला धरायला गेला . पण शक्य झालं नाही ! समशेर खिडकीतून बाहेर उडी मारून पळाला . तेनसिंग अविश्वासाने पाहतच राहिला . त्याची विचार शक्ती कुंठित झाली होती . एक दोन वर्षाचा मुलगा …. हे शक्य नाही ! पण घडलं होतं !

 सावित्री दरवाजाकडे पळाली . तेनसिंग भानावर आला . तो तिच्या मागे पळाला . दोघे मागच्या बाजूला खिडकीजवळ आले . त्यांना अपेक्षा होती मघासारखा समशेर मध्ये असेल म्हणून .पण खिडकीचे गज निघाले होते ! आणि समशेर मध्ये असणं शक्य नव्हतं . त्यानी आजूबाजूला पाहिलं .

    सावित्रीची नजर दूर अंधारात गेली . पाऊस कोसळत होता . जोरदार विजेचा कडकडाट झाला . लख्ख प्रकाश पडला .तिथे झाडाखाली कुणी होतं . त्यांच्या दिशेने पाहात होतं .आणि तिचा समशेर ? त्याच दिशेने चालला होता . एवढ्या पावसातही घाम फुटला !

      ती जोरात ओरडली . तसं तेनसिंगने तिच्याकडे बघितलं .

 ” सावित्री !”

    तिने हातानेच खूण केली . तेनसिंगने तिकडे बघितलं . त्यांचा समशेर जात होता तिकडे समोर झाडाखाली कुणी होतं ! जे कल्पनातित होतं ! ‘ 

हा एवढासा जीव भर पावसात तिकडे जातोय ? जातोय कि ओढला जातोय ? ‘ नाही !काहीतरी करावच लागेल ! नाहीतर पोरगं हातचं जाईल ! तो तिकडे पळाला ! सावित्री त्याच्या मागे !…..

 हे स्टोरी Sample आहे .जर तुम्हाला पूर्ण कथा वाचायची असेल तर वरील लिंक वर क्लिक करा आणि पूर्ण कथेचा आनंद घ्या . धन्यवाद !

 ALL RIGHTS REERVED AT YOGESH BORSE ,BGSM PRODUCTION ,BHUTATMA PUBLICATION ! 

BHUTATMA PUBLICATION

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top