ब्राम्ही | Bramhi | मराठी भयकथा | Marathi Horror Story | लेखक :- योगेश वसंत बोरसे |

   -: ब्राम्ही :

  मराठी भयकथा | Marathi Horror Story |

 लेखक :- योगेश वसंत बोरसे |

 

                                -: माझ्या आगामी कादंबरीचा पूर्वार्ध :- 

     खूप खूप वर्षांपूर्वी म्हणजे साधारण१०० ते १५० वर्षांपूर्वी ,जेव्हा भारतात परकीय सत्ता असल्याचा काळ ! 

स्त्री स्वातंत्र्य हा प्रकार तेव्हा नव्हता . स्त्री म्हटली की  चूल आणि मूल इतकंच तिचं आयुष्य आणि जबाबदारी . 

    जेव्हा एकाच कुटुंबात चार पाच मुलं , चार पाच मुली सहज असायच्या .कुणाची दोन कुटुंब , कुणाचं एकच मोठं कुटुंब . पसारा मोठा .

   असाच एक धनाढ्य व्यक्ती ! 

   गांव छोटंसं ,सुरंगी ! पण आजूबाजूच्या पंचक्रोशीत त्यांच्या तोलामोलाची व्यक्ती नव्हती . नाव पण वजनदार ! 

धनंजय कुलकर्णी !

पिढीजात श्रीमंती !

जोपासलेली !

साकारलेली !

कष्टाने त्यात भर घातलेली

! त्यामुळेच अमरवेलीसारखी फोफावलेली ! 

जमीन एवढी की कधी मोजायची वेळच आली नाही . 

 अशाच या धनाढ्य  व्यक्तीचे कुटुंबपण मोठे होते . दोन बायका ! 

 दोन का ?

 तर पहिलीला मुलबाळ होत नव्हतं म्हणून दुसरी केली . दुसरीला मुलगी झाली .

मुलगी सुंदर ! श्रीमंतांची पोर – जणू फुललेलं कमळच ! 

नांव ठेवण्यात आलं ,फुलासारखंच सुंदर –

ब्राम्ही ! 

ब्राम्ही सर्वांची लाडकी ! 

 बरं पायगुण एवढा चांगला की तिच्या जन्मानंतर तिच्या मोठ्या आईला ,शेवंती बाईला म्हणजेच धनंजय शेटच्या पहिल्या बायकोला पण मूल झालं !

 मूल सुंदर होतं ,पण दगावलं . शेवंतीबाईला हसावं की रडावं कळत नव्हतं .एका मागे एक तीन मुलं वारली . 

  धनंजयशेठ ची दुसरी बायको म्हणजे कृष्णाई ,तिला आणखी दोन मुलं झाली. ते  जेमतेमच होते दिसायला . 

  म्हणजे ब्राम्हीच्या खानदानी सौंदर्यापुढे ते तिचे भाऊ वाटत नव्हते . शेवंतीबाईला  सुरुवातीला काही वाटलं नाही . जो पर्यंत वय होतं ,तो पर्यंत आशा ही  होती की मुलं होतील ,वाचतील ,निदान एखादं तरी वाचेल !

 पण जसं वय वाढत गेलं तशी शक्यता मावळायला लागली आणि मनातील द्वेष चेहेऱ्यावर दिसायला लागला  फक्त वागण्यात अजून येत नव्हता . 

  त्यात ब्राम्ही जशी मोठी होत गेली ,तिचं सौंदर्य खुलत गेलं . पूर्ण पंचक्रोशीत तिच्या एवढी सुंदर मुलगी नव्हती ! ती तिच्या गावाचं भूषण होती ! बापाचा अभिमान होती ! 

 पण …. म्हणतात ना सौंदर्य शापित असतं ! सौंदर्याला नजर लागते . सुख जास्त वेळ एका जागी टिकत नाही . 

वयाच्या पंधराव्या वर्षी ब्राम्ही गेली . गेली म्हणजे देवाघरी गेली ! 

 कशी गेली ,कारण कळालं नाही नेमकं ! पण छोटंसं आजारपण निमित्त झालं ! कुणी काय बोलायचं ,कुणी काय बोलायचं ! 

   एवढी सुंदर ,धडधाकट पोरगी ,एवढ्याशा तापाने कशी जाईल ?

 काही तरी वेगळाच प्रकार आहे !

 आणि  जाणते अजाणते पणी शेवंतीबाईंचं नांव त्यात यायला लागलं . 

 धनंजय शेठ आणि ब्राम्हीची आई कृष्णाई यांच्यासाठी हा मोठा धक्का होता . ब्राम्ही त्यांचा गर्व होती . अभिमान होती . भूषण होती !

 तिच्या जाण्याने धनंजय कुटुंबाला अवकळा आली . 

 लोकांची कुजबुज धनंजय शेठच्या कानावर आली .त्यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केलं . पण रोज तेच कानावर यायला लागलं . तसं त्यांचं ही  मत परिवर्तन झालं . ते शेवंती बाई पासून दूर राहायला लागले .तिला हे सर्व असह्य झालं . आणि एक दिवस भडका उडाला ! 

   ” माझी  मुलं  मेली तेव्हा तुम्हाला काहीच वाटलं नाही . मग आता का एवढा विचार करताय ?

 लोक काहीही बोलतात . त्यांचं ऐकून मला दूर कराल तर मी ते सहन करणार नाही ! माझं नांव यात गोवलं गेलंय ,पण माझा यात काहीही संबंध नाही ! आणि तुम्हाला तसंच वाटत असेल तर मी काहीही करिन पण ब्राम्हीला परत आणीन ! “

  तिच्या बोलण्याने धनंजय शेठ विचारात पडले . ही  जर एवढं ठामपणे सांगतेय तर खरोखर हीच काही संबंध नसेल !

 आपणच मुलीची काळजी घेतली नाही . आपण त्यात कमी पडलो . पण तरीही नुसत्या तापाने एखादा जीव कसा जाईल ? 

  प्रश्न सुटत नव्हता . पेच वाढत होता .त्यात ही  ब्राम्हीला परत आणायला निघाली आहे . पण कसं शक्य आहे ?

गेलेली व्यक्ती कधी परत येते का ?

आपण या हातानी तिचा अंतिम संस्कार केला ! 

  तिच्या आठवणींनी धनंजय शेठ ला कळवळून आलं . त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं . आणि ते ढसाढसा रडायला लागले . शेवंतीबाई त्यांच्या जवळ गेल्या ,ते लहान मुलासारखे त्यांना बिलगले . आणि बराच वेळ रडत राहिले .

  शेवंतीबाई त्यांची पाठ थोपटत राहिल्या . सांत्वन करत राहिल्या . या दुःखाचा निचरा होणं गरजेचं होतं ! हे सर्व कृष्णाई समोर घडत होतं .पण त्या हतबल झाल्या होत्या ! 

  डोक्याएवढी पोर गेल्यावर त्यांना कशातच स्वारस्य नव्हतं. त्यात शेवंतीबाईंचं बोलणं ऐकून त्यांना ही  खरं वाटलं . ही  बाई आपल्या मुलीला का मारेल ?

 तिच्या डोळ्यात आसवांनी गर्दी केली . ती भिंतीला टेकून फुंदत राहिली . धनंजय शेठला कृष्णाईचा आवाज ऐकू आला तसे ते भानावर आले . त्यांनी डोळे पुसले आणि उद्विग्न मनाने काही न  सुचून ते कृष्णाई जवळ आले . तिच्या  डोक्यावरून मायेने हात फिरवला आणि हळूहळू खोलीच्या बाहेर पडले . 

  शेवंतीबाई कृष्णाई जवळ गेल्या  . तशी कृष्णाई त्यांना बिलगली. आतापर्यंत आसवानी घातलेला बांध फुटायला लागला आणि कृष्णाई रडायला लागली . 

“रडू नकोस ! दुःख आवर ! मी तुझ्या ब्राम्हीला परत आणीन ! ”

शेवंतीबाईने कृष्णाईला थोपटत सांगितलं . कृष्णाई म्हणाली ,

”  ताई असं कसं म्हणता ? ती तुमची पण मुलगी होती ! माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला जवळची होती ! “

 “म्हणूनच मी म्हणतेय ,धीर धर ! मी आपल्या ब्राम्हीला परत आणीन ! “

 “पण ताई ,ते कसं शक्य आहे ? एकदा गेलेली व्यक्ती परत येते का ? ”

 कृष्णाई समजूत काढत म्हणाली . 

  शेवंतीबाई शून्यात बघत होत्या लक्ष भलतीकडेच होतं  .डोक्यात वेगळेच विचार ,निर्धार घोळत होते आणि तो ठामपणाचेहेऱ्यावर दिसायला लागला आणि तोंडातून शब्द बाहेर पडले ,

 ” कृष्णाई ,या जगात अशक्य काहीही नाही . फक्त करायची तयारी हवी ! सामर्थ्य हवं ! इच्छाशक्ती हवी ! मी ब्राम्हीला परत आणीन ! तुला मदत करता आली तर कर ,आपण दोघी मिळून तिला परत आणू ! “

  “ताई  ,काहीही करा ,काहीही सांगा ,पण माझ्या ब्राम्हीला परत आणा हो ! “

  शेवंतीबाईंच्या डोळ्यात निर्धार होता ,चमक होती ,जसं  काही तिला माहित होतं की आपल्याला काय करायचं आहे ते ! किंवा तिला उत्तर सापडलं होतं … !  

   ” उठ , रडू नकोस।  बराच वेळ झाला ,पोरांना भूक लागली असेल ,त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नकोस ! सोन्यासारखी मुले आहेत , त्यांची काळजी घे ! त्यांना नीट  सांभाळ ! “

शेवन्तीबाईनी कृष्णाईला  थोपटलं  , शांत केलं . कृष्णाई लगबगीने  उठली स्नान गृहात गेली ,तोंडावर पाण्याचे सपके मारले .  पदराने तोंड पुसले आणि स्वयंपाकला लागली .  

शेवंतीबाई तिथेच मंचकावर बसल्या . डोळ्यात चमक तशीच होती . फक्त विचारपूर्वक पाऊल उचलणं गरजेचं होतं . मनातील विचार ठाम होता ब्राम्हीला परत आणण्याचा !

पण कसं …. ?

➣➣➣➣➣➣     

    धनंजय शेठ खोलीतून बाहेर पडले . आता ते बरेच सावरले होते . त्यांच्या मनातील किल्मिष थोडं फार का असेना दूर झाली होती . कामाकडे लक्ष देणं गरजेचं होतं . बरेच दिवस झाले कामं खोळंबली होती. त्यांनी गड्याला आवाज दिला . गडी आला . 

“काय मालक  ?”

“अरे जरा दिवाणांना बोलावलंय म्हणून सांग ! “

“जी धनी !”

काही वेळात दिवाण आले ते गंभीर मुद्रेने ! मान खाली घालून उभे राहिले ,

” सरकार ,आपण बोलावलंत ?”

“हो , बऱ्याच दिवसांची कामं  खोळंबली असतील ना ,ती उरकून घेऊ म्हटलं , या बसा ! “

 आणि दिवाण त्यांना धीर गंभीर आवाजात  सर्व कामाची माहिती देऊ लागले . बराच वेळ झाला ,जेवायची वेळ झाली होती तसा घरगडी कृष्णाईचा जेवायचं निरोप घेऊन आला ,

“मालक , जेवायला ….. “

“आलोच म्हणावं ..”

 काही वेळात दिवाणजींनी बोलणं आवरलं . 

” दिवाणजी .चला जेवायला !”

 ” सरकार ,आज उपवास आहे ! तुम्ही जेवण करून घ्या तोवर मी शेतावर जाऊन येतो . एका ठिकाणी विहिरीचं काम सुरु केलं आहे ते कुठवर आलं ते बघून येतो ! येऊ मी सरकार ? “

 “हो या ,नाहीतर असं करा थोडा वेळ थांबा ,जेवण झालं की सोबत जाऊ ! माझं ही बाहेर जाणं झालं नाही एवढ्यात ! “

“सरकार ,तुम्ही म्हणाल तसं ! ” 

 धनंजय शेठ जड  पावलांनी जेवणासाठी गेले . ब्राम्हीचा चेहेरा डोळ्यासमोरून हलत नव्हता . ती आपल्या आसपास आहे ,वावरते आहे असं भासत होतं ! ते स्वयंपाक घरात गेले . स्वयंपाक घर मोठं  होतं !

  एका बाजूला प्रशस्त टेबल जेवणासाठी ठेवला होता . आणि आजूबाजूला सागाच्या दमदार प्रशस्त खुर्च्या  होत्या . मुलं  त्यांचीच वाट बघत होती . त्यांची नजर मुलांवर गेली . मुलं  केविलवाणी होऊन त्यांच्याकडे बघत होती .

   ते मुलांजवळ गेले दोघांच्या डोक्यावरून ,पाठीवरून हात फिरवला ,तशी मुलं खुर्चीवरून उठून त्यांना बिलगली आणि रडायला लागली . स्पर्शामध्ये बापाचा आधार शोधायला लागली . त्यांची ही लाडकी बहीण गेली होती .त्यांना तर ते ही  समजत नव्हतं की  नुसता ताप येऊन ताई कुठे गेली ? 

  धनंजय शेठ ला गहिवरून आलं ,ब्राम्ही जाण्याच्या दुःखात आपण मुलांकडे दुर्लक्ष करतोय , हे योग्य नाही !   

त्यांना आपली चूक समजली . कृष्णाई कडे त्यांना पाहवेना . तिचा चेहेरा पांढरा फटक पडला होता ! 

‘ काय हिची अवस्था ?

हिला यातून बाहेर कसं काढणार ?

शेवंती नेमकं काय करणार ए  ?

ब्राम्हीला परत आणणं तर ब्रम्ह देवाला ही शक्य नाही ! मग ही … ‘

विचार करता करता ते जेवायला बसले .

 ‘बघू काय होईल ते …’

  जेवण उरकून धनंजय शेठ बाहेर आले . तर समोर शेवंतीबाई होत्या ,

” सरकार थोडं बोलायचं होतं ! “

 ” रात्री बोलू हं ! बरीच कामं उरकायची आहेत . जेवण करून घ्या दोघींनी  ! “

 एवढं बोलून ते निघून गेले !            

 जेवण उरकून शेवंतीबाई जरा विसावल्या होत्या . आज बऱ्याच दिवसाने मन आणि डोकं शांत होतं . त्यामुळे पडता क्षणीच डोळा लागला आणि गाढ झोप लागली . 

झोप इतकी गाढ लागली की  किती तास गेले समजलं ही  नाही . 

    तिन्ही सांजेची वेळ झाली . तशी कृष्णाई त्यांना उठवायला आली . त्यांच्या चेहेऱ्यावरील शांत भाव पाहून कृष्णाईला बरं वाटलं . किती दिवसांनी आज या शांत झोपल्या आहेत !

 पण आपल्या नशिबी हा शांत पणा नाही !

थोडासा डोळा लागला की ब्राम्ही समोर दिसते !

काही सांगायचा प्रयत्न करते ,पण आपल्याला कळत नाही !

काय म्हणणं असेल तिचं ?

या तिला परत आणायचं म्हणतायेत पण कसं ?

की  फक्त आपलं मन राखण्यासाठी सांत्वन करण्यासाठी ?

आणि समजा खरंच ब्राम्ही परत आली तर ?

ती कशी असेल ?

ती आपली ब्राम्ही नसेलच ! जिला आपण जन्म दिला ती तर … ‘

  शेवंतीबाई अलगद उठून बसल्या होत्या ! त्यांची झोप झाली असावी किंवा त्यांना कृष्णाईची चाहूल लागली असावी . 

” ये गं ! बस ! “

त्या मायेने म्हणाल्या . 

 ” ताई  , बसून चालणार नाही . दिवे लागणीची वेळ झालीय . हे कधी ही  घरी येतील . तुम्हाला उठवायला आले होते. बऱ्याच दिवसांनी एवढं शांत झोपलेलं पाहिलं . “

” हो ना ! मला ही  समजलं नाही गं , इतकी गाढ झोप कशी लागली ते ? पण आज प्रसन्न वाटतंय ! “

 “काही विशेष ?”

 ” हो ! खासच ! आपली ब्राम्ही स्वप्नात आली होती ! “

  ब्राम्हीचं नांव ऐकलं आणि कृष्णाई व्याकुळ झाली .   

तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले . तिने धीराने डोळे पुसले आणि म्हणाली ,

 ” ताई ,एक सांगू ? राग मानू नका !तुम्ही दुपारी जे म्हणालात ते मनावर घेऊ नका . ते शक्य नाही ! एकदा गेलेली व्यक्ती पुन्हा येणं निसर्ग नियमात बसत नाही ! “

” आणि आली तर ?”

 शेवंतीबाईंच्या थंड स्वराने कृष्णाई दचकली . तिने त्यांच्या डोळ्यात पाहिलं . 

‘ आपल्यापेक्षा जास्त धसका घेतलाय यांनी , ब्राम्ही जाण्याचा ! यांचा पोरीत जास्त जीव होता ‘ . कृष्णाई काही बोलत नाही म्हटल्यावर शेवंतीबाईने पुन्हा विचारलं ,

 ” आली तर ? तू तिला स्वीकारणार नाहीस ?”

  ” ताई  ,निसर्गाविरुद्ध गेल्यावर माणसाला त्याची शिक्षा भोगावी लागते ! किंमत मोजावी लागते !  आणि आपण ती मोजू शकतो का ,हा विचार अगोदर करायला हवा ! “

” म्हणजे ? ” शेवंतीबाईंनी विचारलं . 

” म्हणजे असं की  जिवाच्या बदल्यात जीव जाईल किंवा आणखी बरंच काही ! “

  कृष्णाईच्या बोलण्याने शेवंताबाई दचकल्या . 

” कृष्णा ,याचा अर्थ आपली ब्राम्ही अशीच गेली असेल ? कुणाचा जीव वाचवण्याकरिता आपल्या ब्राम्हीचा बळी दिला गेला असेल ? कारण तिच्या कुंडली प्रमाणे ती दीर्घायुषी होती !

 आणि चालती फिरती पोरगी एवढ्या शुल्लक आजाराने मरू शकत नाही ! आणि ती तर कधी आजारी पडलेली ही मला आठवत नाही ! नाजूक होती पण कणखर होती ! मग ताप येणं  ही … तो ही  विनाकारण … “

 कृष्णाईला आपल्या बोलण्याचं आश्चर्य वाटलं . हो असंच झालं असावं ! 

” पण ताई ? असं कोण करेल ? “

 तोच करू शकतो ज्याचा जीव धोक्यात असेल ! आणि ज्याला यातलं माहित असेल ! कळत असेल ! ज्ञान असेल !  “

 ” पण आपल्या आसपास असं कुणी आहे ? म्हणजे तुमच्या लक्षात आलंय  कुणी ?”

 “काही सांगता यायचं नाही ! यांच्याशी बोलावं लागेल ! ते ऐकणार नाहीत ,पण माहिती तर काढू शकतात ?”

    ➣➣➣➣➣➣➣

  रात्र झाली तसे धनंजय शेठ घरी आले . ते पण बरेच शांत वाटत होते . रात्रीची जेवणं उरकली तशी दोघींची नजरानजर झाली आणि त्यांनी धनंजय शेठ शी बोलण्यासाठी त्यांच्या शयन कक्षात प्रवेश केला . त्या दोघीना सोबत पाहून शेठला आश्चर्याचा धक्का बसला . त्यांच्या चेहेऱ्यावर कधी नव्हे ते स्मित हास्य तरळलं . 

” आज काय विशेष ? दोघी एकत्र  ? “

” सरकार ,थोडं बोलायचं होतं ! “

शेवंतीबाई म्हणाल्या . 

 तसे धनंजय शेठ मंचकाला टेकले . दोघी मंचकावर विसावल्या . 

 ” आम्हाला  वाटतं  की आपली ब्राम्ही मेली नाही तर मारली गेलीय ! “

 “काय ?”

 “हो ! “

“कुणी सांगितलं ?”

“नाही ! कुणी सांगितलं नाही . पण तुम्हीच सांगा तिचा मृत्यू तुम्हाला तरी मान्य आहे का ? ती दीर्घायुषी होती ,पंडितजींच्या म्हणण्याप्रमाणे ! नाजूक होती पण कणखर होती ! तुम्हाला ती कधी आजारी पडलेली आठवतेय ? 

 नाही ना ? मग एवढी धडधाकट पोरगी तापाने मृत्युमुखी पडावी ? आणि तिला ताप ही का यावा ? कुठे जाणं  नाही ,येणं  नाही !

 बरं पाळीही व्यवस्थित होती . थोडी कणकण वाटायची कधी कधी , पण एवढा ताप बीप आला नाही कधी ! बरं एखादी साथ म्हणावी तर तिच्या व्यतिरिक्त कुणी दगावलेलं आढळलं का तुम्हाला ?  “

 ” किंवा मग कुणाला वाचवण्या करीता …. “

” पण असं कोण करणार ए ?”

 ” तोच करू शकतो ,ज्याला यातील माहिती असेल , ज्ञान असेल , ज्याचा स्वतःचा किंवा त्याच्या आप्तेष्टाचा जीव धोक्यात असेल ? “

“पण असं कुणाचा जीव घेऊन कुणाचा जीव वाचवता येतो का ?”

” सरकार , हे आपलं मत झालं ! पण ज्यांना करायचे ते असले उद्योग करतातच ना ? “

 धनंजय शेठ चा चेहेरा गंभीर झाला . असल्या गोष्टींवर त्यांचा विश्वास असेल असं दोघीना वाटत नव्हतं . पण या एकाच विचारावर या दोघी जर ठाम असतील , एकत्र येत असतील तर त्यांना विरोध करण्याचं कारण नव्हतं .

 त्यामुळे या विषयावर लगेच प्रतिक्रिया देणं चुकीचं ठरलं असतं . कदाचित यांच्या म्हणण्यात तथ्य असू शकतं ! किंवा जशी आपली ब्राम्ही गेली तसं अजून कुणी जाऊ नये एवढी काळजी आपण घेऊच शकतो . या विचारावर येऊन ते थांबले . 

त्यांनी दीर्घ सुस्कारा सोडला . 

  “ठीक ए ! मी बघतो काय करायचं  ते ! तुम्ही काळजी करू नका ! ” एवढं बोलून ते उठले आणि तडक बाहेर निघाले . 

   त्यांची प्रतिक्रिया पाहून दोघींना आश्चर्य वाटलं . हे इतके झटपट पावलं उचलतील असं दोघींनाही वाटलं नव्हतं . त्यांच्यासाठी हा सुखद धक्का होता ! 

TO BE CONTINUED …. 

➣➣➣➣➣➣➣➣  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top