-: परसातली हडळ :-
मराठी भयकथा :- लेखक :- श्री . योगेश वसंत बोरसे .
माझ्या आगामी कादंबरीचा एक भाग –


जुना जीर्ण झालेला वाडा ,बरचसा भाग पडलेला .. अगदी आत्ताच नाही ,बऱ्याच वर्षांपासून !
इतका की कुणाला नेमकं सांगता ही येत नव्हतं कि कुणाचा असावा . पण काही आख्यायिका मात्र प्रसिद्ध होत्या वाड्याबद्दल !
अर्थात कुप्रसिद्ध !
त्यामुळे कुणी त्याच्या आसपास ही फिरकायचं नाही !
तसं ही त्या गावातील बरीच शी घरे पडीक अवस्थेत होती . गाव हळूहळू ओस पडत चालला होता … गावाकडे फिरकायला ,लक्ष द्यायला कुणाकडे वेळ नव्हता ,मग एका विशिष्ट वाड्याकडे कोण लक्ष ठेवणार ?
पण आता त्या वाड्यात वर्दळ दिसायला लागली होती . वाडा कुणी तरी विकत घेतला होता . म्हणजे ती जागा विकत घेतली होती . त्यामुळे स्वाभाविकपणे वाड्याचं उर्वरित अवशेष पाडणं आलंच ….
वाड्याच्या आवारात एक जुनं ,विस्तीर्ण झाड होतं !
आंब्याचं !
हिरवं टंच !
चारी बाजूला सर्व रखरखीत असताना ही आंब्याचं झाड आपलं वैभव सांभाळून होतं ….
वाडा घेतला गेला आणि दोन चार दिवसात जीर्ण काम पाडायला दोन तीन कामगार आले . आणि कामाला सुरुवात केली ……
….. दुपार झाली तशी दोन घास खाण्यासाठी मंडळी आंब्याच्या त्या विस्तीर्ण झाडाखाली बसली ,विसावली … झाडाची सावली चारी बाजूला पसरली होती .
मोठा डेरेदार वृक्ष ! थकवा घालवण्यास समर्थ होता !
दोन घास पोटात पडले आणि त्या कामगारांना मोह आवरला नाही .. त्यांनी दाट सावलीत अंग टाकलं . पाठ टेकली .
मन ,आत्मा ,शरीर , तृप्त झालं होतं ….. कधी डोळा लागला कुणाला कळालं ही नाही ..
….कुणीतरी आपल्याकडे बघतंय ही जाणीव अगोदर सखाराम ला झाली . त्याला वाटलं मुकादम असेल .. आपण असं कामाच्या वेळात झोपलो ,त्याला आवडणार नाही ….
तो पटकन उठून बसला !
दचकला होता त्यामुळे धडधड वाढली होती … मुकादम आज आपले पैसे कापणार या विचाराने जीव घाबरायला लागला … त्याने आजूबाजूला बघितलं ….
कुणी नव्हतं !
मुकादम तर नव्हताच . त्याच्या जीवात जीव आला . पण जाणीव तीव्र होती . प्रखर होती . आणि नजर शरीराचा आरपार वेध घेत होती .
‘ काय प्रकार आहे ? ‘
” ए गज्या ,ए सोमा अरे उठा !… कुणीतरी आपल्यावर लक्ष ठेऊन ए …! “
दोघे झोपमोड झाल्याने चिडले होते पण वास्तवाचं भान आल्यावर उठून बसले आणि तडक उभे राहिले . तसा सखा घाबरला .
” का रे काय झालं अचानक उठून उभे राहिले …?”
” आरं बाबा आमी इथं कामाला येतु ,तुयासारखं झोपायला नाही येत ! “
” काय ? ” सखाराम ला कळेना .
‘ यांना आपण उठवलं आणि हे आपल्यावरच उलटले ….. ?’
” सखा तुझं काही खरं नाई आज , तो पाह्य मुकादम …. इकडेच येतोय ,त्याने बहुतेक तुला झोपलेलं पाहिलं असल ,लै खवळलंय जणू ते ….! “
सखाराम गडबडून उठला आणि आजू बाजूला पाहू लागला …..
कुणी ही नव्हतं ….
त्याला घाबरलेला पाहून या दोघाना हसू आलं ….. जोरजोरात हसायला लागले ….
” कुठेय मुकादम .. ? ”
सखा घाबरून बघतच राहिला ….
” आरं लेका किती घाबरशील ? मुकादम काय खातो का काय ..? “
” आरं बाबा एक वेळ मला खाल्लं तर चालल ,पन पैशे कापू नको म्हना …. “
” आरं सखा ,कोनी नाई ,चल …. “
” नाई रं गजा ,मजाक नाई ! कुणीतरी आपल्यावर लक्ष ठेऊन हाए …. “
सखा ला चैन पडत नव्हती . त्याचा जीव कासावीस झाला होता . त्याला ती भावनाच सहन होत नव्हती . ते कामाला लागले ,पण सखाचं कामात लक्ष नव्हतं .
” ए सखा , अरे हात चालाव की भरभर …तीन दिवसात काम संपवायचंय ….. “
सखा भेदरून आजूबाजूला पाहत होता …
” गज्या ,कुणीतरी बघतंय रं आपल्याकडं … “
” आरं तुला भास झाला असल ..”
” नाई गड्या ! भास नाई , नक्की कुणीतरी लक्ष ठेऊन हाये ! “
” आरं ज्यानं काम दिलं ना तो बघत असल …. “
” पन कुठून ? दिसाया तर पाहिजे ?’
” बरं एक काम कर ,मुकादम आला अन त्यानं जर इचारलं तर सांग ,माझ्याकडे कुणी पाहत होतं म्हणून काम नाई केलं …. “
” गज्या ही मजाक ची वेळ नाई … “
सोमा ला त्याची दया आली .
” सखा ,जाऊ दे तास दोन तास बाकी राहिले , भरभर हात चालवू अन दिवस मावळतीला आला की बाहेर जाऊन थांबू ,तवर मुकादम येईलच ,मग सांगू त्याला … “
….. सखाराम ने आभाळाकडे बघितलं ,सूर्य मावळतीकडे झुकला होता ,पण आकाशात मळभ दाटून आलं होतं . वातावरण भकास ,उदास नकोसं वाटत होतं ! त्यात घामाच्या धारा ,घाम आणि मनातली भीती ! ….
सखाराम ला अस्वस्थ वाटायला लागलं ..
‘ मला वाटतं ,वरचं काम पहिले करू …. त्यावरच्या खोल्या अशाही पडलेल्या आहेत ,बाकी राहिलेलं पाडू म्हणजे मुकादम ला आपलं काम दिसल .. सोमा आणि गज्या ला ही पटलं ,कारण मुकादम उलट्या खोपडीचा ,उलट्या काळजाचा होता ! त्याला कुणाशी काही घेणं देणं नव्हतं !
जास्त विचार न करता ते आतल्या बाजूला घुसले . वर जाण्यासाठी … आतल्या बाजूला अंधार वाटत होता ,
” च्या मारी , एवढ्या अंधारात पहले लोक कशे काय राहायचे काय माहित ? “
ते चाचपडत चाचपडत पुढे जात राहिले . दोन खोल्या पार केल्या ,अन जिन्याकडे वळाले , जिन्यातही अंधारच होता .
” नीट चाला ! पडाल ! “
इतका थंडगार आवाज ?
त्यांच्या सर्वांगातून थंडगार घाम वाहायला लागला . तिघे ही दचकले ….
….त्यांना कल्पनाच नव्हती की इथे कुणी असेल म्हणून ! आणि ते ही बाई माणूस !
त्यांची भीतीने गाळण उडाली !
थरथरत्या आवाजात एकाने विचारलं ,
“कोन ए ?…… “
उत्तर मिळालं नाही .
” सखा ,मला वाटतं आपण उद्या सकाळी सकाळी अगोदर वर जाऊ ! आता बाहेरचं काम आवरून घेऊ . चला … निघा इथून ! नाहीतर अजून दोन माणसं आणायला सांगू मुकादम ला .. नाहीतर ..काम सोडावं लागल …. “
तिघे घाबरले होते ,सखा तर रडकुंडी आला !
मुकादम पैसे कापेल ,या भावनेनेच त्याची बेचैनी वाढत होती ,कारण बराच वेळ गेला होता .
” न्हाई ! मी वर जातो …..”
” अरे येडाएस का , चल ! एकट्याचं काम नाही ते ! “
“अरे पन कोन बोललं ते तर कळायला पाहिजे ? आपल्याला सांगितलं वाडा रिकामा आहे . कुणी राहत नाही ! धडधड पाडा आणि मोकळे व्हा असं सांगितलं आपल्याला . अन इथं तर कुणी राहतंय !
मेलं बिलं कुनी तर कोन जबाबदार ?
मी तुम्हाला दुपारचा सांगतोय तर तुम्ही माझीच मजाक उडवली . आपण पडायला लागलो अन कुणाच्या अंगावर पडलं तर करणार ? एखादं हकनाक मरायचं !
बरं जेआवाज देतंय ते जिवंतय…. मेलेलं ते तर कळलं पाहिजे ? “
तिघांना चाहूल लागली होती लक्ष समोर गेलं ,
” कोन ए … ? “
जिन्यातील वरच्या पायरीवर कुणी बसलं होतं ….. बहुतेक बाईमाणुसच असावं !
म्हणजे आवाज तर मगाशी बाईचा वाटत होता…..
तेवढ्यात बाहेर मुकादमचा आवाज आला ,म्हणजे त्याच्या गाडीचा आवाज ! तशी गाडी पूर्ण गावात कुणाचीच नसेल !
एकदम खटारा ….. रॉकेलवर पळणारी …. तो त्यांना आवाज देत आत आला …
” काय रं ? …. काय टाईमपास लावलाय ? काम तुमचा बा करील का ? “
” दादा ,इथं कुणीतरी राहतंय …. “
सखा कळवळीने म्हणाला ,
“दादा तुमि सांगितलं की वाडा रिकामा आहे म्हणून !…. आमचं काम चालूच होतं !… ही बाई नसती तर आम्ही वर चाललो होतो ? “
” कोण बाई ? कुठलीबाई ? अन भोसडीच्यांनो ,मी तुम्हाला बाहेरचं काम पाडत पाडत मध्ये यायला सांगितलं होतं ना ? तुमि कशाला तुमची आई घालायला … “
” मुकादम ,तोंड आवरायचं ! तुझ्या बा चं खात न्हाई आमी … न्हायतर इथून जित्ता बाहेर जाणार न्हाईस ! सखा आम्हाला दुपारचा सांगतोय की कुणीतरी आपल्याला पाहताय म्हणून ! आम्हालाच पटत नव्हतं …. आत्ता पहिले आवाज आला म्हणून आम्ही इकडे आलो तर ती बाई समोर बसलेली …. ” गज्या कडाडला .
मुकादम हुशार होता ,यांना पाहू नंतर ! मला धमक्या देताय ! पण इथं ते तिघे होते आणि तो एकटा ! मारून इथं गाडलं असतं तरी कुणाला कळणार नव्हतं ..
त्याने नमतं घेतलं . माफी मागायची पद्धत नव्हतीच ,पण पुढे बोलताना सांभाळून बोलायचं होतं .
त्याने सभोवार बघितलं ,कुणी नव्हतं ,
” काय रं येडा समजतंय का काय ? कुणी नाई तिथं , चला लागा कामाला ! … “
महत्वाची गोष्ट अशी की आता यांना ही ती बाई दिसत नव्हती .
ही गेली कुठं ? गजाला राहवलं नाही .
” दादा , हे काहीतरी विपरीतच हाये … आत्ता तुमि आवाज दिला तेव्हा बाई होती ….. “
मुकादम ने यांचा अंदाज घेण्यासाठी पुढचं पाऊल टाकलं ,
” असं का ? मला वाटतं तुमच्याकडून काम होणार नाही . आरे मी तुम्हाला रोजगार मिळावा म्हणून मशीन बोलावली नाही ! नाहीतर आतापर्यंत वाडा दिसला बी नसता … तुमच्या नादात आता मला आठ दिवस मशीन भेटणार नाई ,मला दुसरे गडी आणावे लागतील …. तुमि निघा आता … “
एवढं बोलून तो निघून गेला . त्याने डाव टाकला होता . यांनी काम नाही केलं तर त्याची आजची मजुरी वाचणार होती . आणि जर केलं तर उद्या हि हेच काम करतील याची त्याला खात्री होती …
सखाराम म्हणाला ,
” मी काय म्हणतो ? ती बाई नाई आता … जेवढं काम होईल तेवढं करून घेऊ … नैतर आज चा रोज बुडेल ! “
पर्याय नव्हता ,वरचं काम पहिले केलं तर ते दिसणार होतं …
” आरं पन तो म्हनला ना ,पहले बाहेरचं सांगितलं होतं म्हणून … “
” गज्या किती दिवस झाले काम करतोयस ?”
” झाले असतील पाच सहा वर्ष … “
” हा ,ना ,आरं ,मी पाहून सांगू शकतो कि आपल्याला वरचं काम उरकायला अर्धा तास लै झाला . तेवढं करू ! आजची मजुरी घेऊ अन रामराम …. “
…. पर्याय नव्हता . तिघे जिन्याकडे आले ,जिना चढून वर गेले . सखारामला पुन्हा जाणवलं . कुणीतरी पाहतंय ! मागून पाहतंय … त्यांचं धाबं दणाणलं !
जिन्यात खालच्या पायरीवर कुणी होतं . त्यांच्याकडे पाहत होतं . आणि एक एक पायरीवर चढून वर येत होतं …. त्यांच्या दिशेने ….
” कोन ए …. ? ” सखाराम ने भीत भीत विचारलं ….
” मी …. ”
…आवाज बाई सारखा होता . तोच ….काही वेळापूर्वी आलेला …. थंडगार स्वर …. !
त्या आवाजाने सखाराम गर्भ गळीत झाला .
” पन तुम्ही हाये कोन ..? “
” … या वाड्याची मालकीण … ! माझा वाडा पडायला आलात ! बघतेच मी कसा पाडता ते … “
” अवो .आक्का बाई ,आमचं काम आहे ते ! आमची चूल पेटते त्याच्यावर . आमची लेकरं बाळं उपाशी राहतील . तो मुकादम आमची मजुरी देणार नाही ! “
सखाराम एकदम अजीजीने ,कळवळून बोलला .
” पण मग तुमि मुकादम ला का बोलले नाही ,तो तर आला होता …. “
” तुम्हाला काय वाटतं ? तुमच्या मुकादमला हे माहित नाही ? कि मी त्याला सांगितलं नाही ? काय वाटतं ? हा वाडा आपोआप पडलाय ? नाही ! या अगोदर दोन चारदा त्याने माणसं लावली आणि वाडा पाडायचा प्रयत्न केला . दोन माणसं दगावली ही ! “
” दगावली म्हनजे ?”
” मेली ! “
” काय ?”
” हो ! तुमची ती गत होऊ नये म्हणून सांगतेय निघा .. “
” नाई ,आम्ही आज तरी जानार नाई …. भले आमचा जीव का जाईना ….आमी आमच्या जीवासाठी घरच्यांना उपाशी मारू शकत नाई … “
” एक काम कराल का माझं ?”
” काय ..? “
” तुमच्या मुकादम ला माझ्या हवाली करा … “
” पन मग आत्ता तो तर आला होता … का सोडला त्याला …. “
एक धीर गंभीर हास्य वातावरणात दुमदुमलं ….
” तुमची बुद्धी खूपच शुल्लक आहे … ! “
” तू मघाशी काय करणार होतास ? त्याला मारणार होतास ना … ? मग का नाही मारला … ? “
…. गज्या विचार करून बोलला .
” कारण … हे दोघं पन गुंतले असते … “
” समजलं ..? आता जर तो मेला असता तर तुम्ही तिघे गुंतला असता …. तो लगेच का पळाला त्याला कारण तेच आहे … ! “
तिघांना एक अंदाज तर आला की समोर जे काही आहे ते आपल्यासाठी हानिकारक नाही ..
” मग काय करू म्हनता ? “
” त्याला इकडे आणू शकता ..? “
” कसा आणणार ? आणि …. बरं बाई तुमि समोर का येत नाई ? आमी तुमाला काय म्हणायचं ? “
काही क्षणात एक सौम्य आकृती समोर प्रकट झाली आणि हलत राहिली ..
” मी ..रेणुका सरपोतदार ! या वाड्याची मालकीण ! “
आवाजात एक प्रकारची धार होती , अभिमान होता .घरंदाज पणा होता ! आणि समोर प्रकट झालेलं अस्तित्व वयस्कर होतं ! कणखर होतं … ! भाषा अतिशय शुद्ध होती .
” आजी ,मी एक सांगू .. तुम्ही किंवा आपण या मुकादम ला संपवून विषय संपणार नाही ! हा मेला तर दुसरा कोणी येईलच …. ज्याने जागा घेतलीय तो का सोडेल ? “
” पण आम्ही जागा कुणाला ही विकलेली नाही ! …. “
” हे तुम्ही कसं सांगू शकता …. ? साहेबांनी विकली असेल तर … ? “
” नाही ! साहेबांचा इथे कधी विषयच नव्हता . या गावातील सगळं काम मी बघायची , शेतीवाडी असेल ,धंदा असेल ,हा वाडा असेल …. मजुरांचे ,नोकरांचे ,व्यवहार बघणं सगळं माझ्या अखत्यारीत होतं …. पण त्या दिवशी अचानक आग लागली ,लागली की कुणी लावली काय माहित ! पण माझा ठाम विश्वास आहे की लावली गेली … कारण सगळं काही तासात जळून खाक झालं ! अगदी माझ्यासकट ! “
” काय ?”
” हो … ?”
” पण मग साहेब ?”
” साहेब अगोदरच वारलेत …. “
” कधी ? “
To Be Continued ……….



