
भुकेला | A Truth Behind Human | Full Story
रणरणत्या उन्हात पावलं जागची हालत नव्हती आणि खाली टेकवत ही नव्हती. प्रचंड विरोधाभास !
उन्हाचा तडाखा इतका जबरदस्त होता की , ऊनच काय मातीही चटके देत होती !
अशातच… एक जण उन्हा तान्हात भटकत होता . पोटात भूकेचा आगडोंब उसळला होता ,शरीरात त्राण राहिलं नव्हतं. त्यामुळे एक एक पाऊल मोठ्या मुश्कीलिने पडत होतं. भूकेने व तहानेने जीव कासाविस झाला होता ,पायाला बसणाऱ्या चटक्यांनी शरीरातलं आहे नाही ते पाणी संपत चाललं होतं ,सावलीसाठी एखादं झाड़ शोधावं तर बाभळीशिवाय एकाही झाडाची या उन्हात तग धरायची हिम्मत नव्हती.
ज्या झाडांनी हिम्मत केली ,त्यांची मनुष्य प्राण्याने स्वकार्यासाठी किंवा सत्कार्यासाठी कत्तल केली, काटछाट केली.
अंगावरचे कपडे मळके ,घाणेरडे, जीर्ण झालेले. अंघोळ नसलेलं शरीर रोज फक्त घामानेच भिजत होतं, केसांना किती दिवसात तेलच काय ,साधा कंगवाही लागला नव्हता. दाढीचे खुट्टे डुकराच्या केसांसारखे ताठ वाढले होते. त्यांनाही याच्यासारखाच स्वाभिमान असावा.
पोटात भूक मावत नव्हती . शरीराची भूक ,मनाची भूक ,बुद्धीची भूक ,आत्म्याचि भूक ,शमत नव्हती.
देवाने नशिबात फक्त आणि फक्त भूकच दिली होती. देवाने जन्म देऊन तरी काय मिळवलं त्या देवालाच माहीत ,आणि जन्मं घेऊन याने काय केलं यालाच माहीत !
त्याला त्याचं नावही माहीत नसावं ,पण का कोण जाणे ?
त्याला आपलं नांव ‘योगेश’ आहे असं वाटायचं. लहानपणी कोणाच्या तोंडून कधी आपल्या बाबतीत उच्चार ऐकला असावा. पण त्याला हे नांव आपलं वाटायचं.
तसंही ,त्याचं नांव काहीही असतं तरी काय फरक पडणार होता ?
योगेशच्या आयुष्यात अठराविश्व दारिद्र्य जन्मताच होतं. काही सुदैवी तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात,पण हा दळभद्री प्रत्येक गोष्टीची वानवा घेऊन जन्माला आला होता.
जणू काही देवाने याला हातचं राखूनंच दिलं होतं ,किंवा याला काही मिळणार नाही ,याची पूर्ण काळजी घेतली होती. मनात प्रचंड असंतोष धुमसत होता. शरीर, मन,बुद्धी ,आत्मा सर्वं काही घुसमटत होतं ,जणू काही जीता जागता दारुगोळाच शरीरात भरला होता ,जो कधीही कुठेही फुटु शकत होता.
कदाचित म्हणूनच देवाने याला उपाशी ठेवलं असावं ,याला जर ऊर्जा मिळाली तर हा जग जाळत फिरेल !अशी भीति देवाला ही वाटली असावी !
पण जगण्याची प्रचंड इच्छाशक्ति व माघार न घेण्याची वृत्ती ,त्यामुळे तो सर्व सहन करत गेला ,धुमसत गेला.
त्याने मान वर करून आकाशाकडे पाहिलं …सूर्य आग ओकत होता. याची हिम्मत पाहून त्यालाही दया आली असावी. काही क्षण उगाच चटका कमी झाल्यासारखा वाटला. तहानेने व्याकुळ जीव ओठावरून जीभ फिरवत होता. पण जीभ ही कोरडीच,व ओठ ही कोरडेच !
सर्व आयुष्य जणू कोरडं ठणठणीत झालं होतं !
‘देव तारी त्याला कोण मारी ?’ असं म्हणतात ,पण ज्यावर देवच रुसला ,त्याला कोण तारणार ?
हं…. ! देव ! …
समोर नजर गेली तर काही अंतरावर एक मंदिर होतं. तिथे भर उन्हात ही गर्दी होती. बहुधा काही कार्यक्रम असावा. आतून, मनातून आवाज आला,
‘ योगेश काय ही दुनियादारी ? आपल्या सारखा उपाशी जीव रोज तहानेने,भूकेने तडफडतो, आपलेपणासाठी, प्रेमासाठी, दोन शब्दांसाठी जीव तुटतो. आणि लोक देवा पुढे नैवेद्य ठेवतात. ‘ अरे बाबांनो जो साऱ्या दुनियेला पोसतो त्याला तुम्ही आम्ही काय खाऊ घालणार ? जो खात नाही त्याला वाजत गाजत खाऊ घालायचं व ज्याला भूक आहे त्याला हाड हाड करायचं. ‘….
…. नकळतपणे ओठांवरून पुन्हा जीभ फिरली, पावलं थोड़ी अधिक वेगाने पडायला लागली. अन्नाच्या वासाने मंदिराजवळ पोहोचला. आत बहुधा अन्नदान असावं.
तेवढयात, कुणीतरी आवाज दिला. ” योगेश ” कुणीतरी बोलवत होतं. याला वाटलं आपल्यालाच बोलावतायेत. पण भ्रम दूर झाला.
जो अन्नदाता होता, त्याच्या मुलाचं नाव ही योगेश होतं. मनात विचार आला,
याचं ही नांव योगेश माझं ही नांव योगेश !
मग असा विरोधाभास का ? कशासाठी ? याच्या बापाजवळ पैसा आहे म्हणून हा अन्नदाता ?
आणि …. माझा बाप ….? मला तर बाप ही आठवत नाही….?
पण आपण आहोत तर बाप ही असणारचं !
त्याने फ़क्त जन्म दयायचं कर्तव्य केलं !
हं, हे कसलं कर्तव्य ? ती तर शरीराची भूक !
दोन अतृप्त शरीरांची भूक भागते तेव्हा नवीन जीव जन्म घेतो. जन्म दिला व वाऱ्यावर सोडलं…..
विचारांची श्रृंखला एका आवाजाने तुटली.
” ए बाबा, खायचं असेल तर बस की ! का उभं राहून खाणार आहेस ? त्याने चमकुन समोर बघितलं. आवाज देणारा तोच होता योगेश. जो स्वतःहून लोकांना जेवू घालत होता. आणि आपण भिकाऱ्यासारखे आलो इथे अन्नाचा वास घेत.
मनाचा उद्रेक झाला. शरीराची भूक हो म्हणत होती. मन व बुद्धि नाही म्हणत होतं. तो परत फिरला,
” ए बाबा अरे बस की !” तो उत्तरला,
” मला भूक नाही. “
” मग इथे कशाला आलास ? फ़क्त वास घ्यायला ? बस थोडं खाऊन घे. अन्नाला नाही म्हणू नये. “
एक योगेश दुसऱ्या योगशला सांगत होता, समजावत होता !
याला नाही म्हणता आलं नाही.
याने विचारलं,” ते वडील का ? “
” हो !”
” आणि आई कुठेय ? ”
“ती नाहीय.”
” म्हणजे ? “
” मी लहान असतानाच ती वारली. आज तिची पुण्यतिथि आहे. तिची आठवण म्हणून अन्नदान ठेवलायं.”
याला हसु आलं.
अन्नदात्याने विचारलं, ” हसायला काय झालं ? ”
हां म्हणाला, ” काही नाही. ”
” माझी आई वारलीय आणि तू हसतोस?. “
” नाही मी त्यामुळे नाही हसलो. “
” मग ? “
” तू ही योगेश, मी ही योगेश. ”
” काय ? ”
” हो. तू आईला शोधतोस, आठवण काढतोस आणि मी माझ्या आई – बापाला विसरण्याचा प्रयत्न करतोय. “
” का ? ”
” ते दोघं एकत्र नसते आले तर माझ्यासारखा दळभद्री, कमनशीबी, कमी जन्माला आला असता. ”
” आपल्या आई – वडिलांबद्दल असे बोलू नये. पाप लागतं ! “
“हं, पाप काय नी पुण्य काय ? जे आयुष्य मी जगतोय यापेक्षा नरक काय वेगळं असणार ! “
” का, तुझं कुणी नाही ? ”
” हो आहे ना, भूक आहे, तहान आहे, दारिद्र्य आहे, गरीबी आहे, लाचारी आहे, तडफड आहे, मनात असंतोष आहे. हे सर्व माझे जन्माचे सोबती आहे. आणि हे कमी की म्हणून काय, स्वाभिमान पण आहे ! “
” तुला रे कसला आला स्वाभिमान ? भिकाऱ्याला कसला आला स्वाभिमान ? “
” हं भिकारी !…. किती सहज बोलून गेलास, पण तू मला हे बोलायची हिम्मत केली कारण तुला वाटतयं हां आपलं काही करू शकत नाही.
पण मला सांग, तुझ्यात नी माझ्यात काय फरक आहे ? फ़क्त आपली भूक वेगळी आहे. म्हणून मी भिकारी पण तू सुद्धा याचक आहेस, हे सर्व जग याचक आहे. फ़क्त जागा बदलते, दार बदलतं, मी तुझ्याकडे जेवायला आलो कारण मला भूक होती. पण तुझं पोट भरलेलं असूनही तुला भूक आहे. कसली हे तुलाही माहीत नाही.
म्हणतात, जन्मदात्यापेक्षा अन्नदाता मोठा असतो. तू अन्नदाता झालास पण फ़क्त पैशाने श्रीमंत झालास , पण मनाने भिकारीच राहिलास . हा पैसाही तुझा नाही तुझ्या वडिलांचा आहे . माझ्या जवळ पैसे ही नाही , आणि खर्च करायला वडील ही नाहीत .
हा पैसा एका बाजूला राहू दे आणि माझ्या बरोबर चल . जे आयुष्य मी आज पर्यंत जगलोय ते एक दिवस जगून बघ . जगण्याची हिम्मत संपून जाईल . बोल आहे हिम्मत ? “
एवढं बोलून हा निघाला आणि अन्नदाता त्याच्या तोंडाकडे पहात राहिला. हा एवढा पद्धतशीर बोलतो भिकारी नक्कीच नाही !
” तू आहेस तरी कोण ? “
” म्हटलं तर मी सर्वस्व आहे, म्हटलं तर मी काहीच नाही !
म्हटलं तर मी चराचरात आहे , म्हटलं तर कशातच नाही !
म्हटलं तर मी समर्थ आहे, म्हटलं तर माझ्यासारखा दुबळा कुणी नाही !
म्हटलं तर मी भुकेला आहे , म्हटलं तर माझ्यासारखा तृप्त कुणी नाही !
मला कसला ही मोह नाही , मला कोणत्याही गोष्टीची भीती नाही , मी जन्मलो ही भिकारीच व मरेन ही भिकारीच !
पहिले ही भुकेला होतो आज ही भुकेला आहे. व शेवटपर्यंत भुकेला राहीन. कारण माझी भूक मोठी आहे जी तुझ्यासारख्यांना कळणार नाही आणि तुम्ही शमवू ही शकत नाही. “
एवढं बोलून तो न जेवताच निघाला . ओठांवरून जीभ फिरवून घोटभर पाणी प्याला. अन्नाला नमस्कार केला आणि तडक मंदिराबाहेर पडला.
अन्नदाता त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहीला …..
आज याच्या अहंकाराने, स्वाभिमानाने त्याला पुन्हा उपाशी ठेवला होता.
असा किती दिवस जगणार होता ?….
ओठांवरून जीभ फिरवली, सूर्याकडे नजर गेली. एकटक पाहात राहिला…. आणि …. चक्कर येऊन खाली पडला .
तसा अन्नदाता त्याच्याकडे धावला . हातात पाणी घेऊन …..
पण तोपर्यंत याची तहान मिटली होती . भूक शमली होती . त्याने त्याचा शब्द खरा केला !….
भुकेला आला आणि भुकेलाच परत गेला .
कधीही परत न येण्यासाठी ! ……
लेखक :योगेश वसंत बोरसे .
